Marathi Bible Reading |Saturday 20th May 2023 | 6th Week of the Easter |

 पुनरुत्थान ६वा  सप्ताह 

शनिवार दि.२० मे २०२३ 

तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यामुळे तुमचा आनंद परिपूर्ण होईल.  
✝️



 सिएनाचा संत बर्नाडिन
•वर्तनसाक्षी (१३८०-१४४४)

२० मे १४४४ रोजी आपल्या मृत्यूशयेवर असताना त्यांनी पुढील शब्दांत आपला आत्मा देवाच्या हाती सोपविला. “पित्या, मी तुझे नाव प्रकट केलेले आहे, आता मी तुजजवळ परतत आहे.” अवघ्या ६ वर्षांनी १४५० साली त्यांना संतपद देण्यात आले.

चिंतन : आपल्या सर्व कृत्यांमध्ये प्रथम देवाला आणि त्याच्या राज्याला अग्रक्रम द्या. बंधुत्वाचे नाते दृढ करा. इतरांना जे शिकवायचे ते प्रथम आचरणात आणा. -संत बर्नाडिन


जीवनात संकटे व अपयश आले की सुख आणि दुःख एकत्र नांदू शकत नाही. तरीपण आनंद आणि दुःख एकत्र नांदू शकतात. पवित्र आत्म्याठायी मिळालेला आनंद संकटात आणि दुःखात सुद्धा माणसाला नवीनउमेद व उभारी देत असतो. म्हणूनच आनंदाचे वरदान मिळालेला माणूस दुःखातसुद्धा शांत व संयमी असतो. असाच चिरकाळ टिकणारा आनंद प्रभू येशूने आपल्या शिष्यांना दिला तो त्यांनी अनुभवला आणि आपल्या आचरणाद्वारे तो इतरांना वाटला. सुवार्ता घोषवितांना संकटे, आव्हाने, वेदना व दुःख सहन करण्यास त्यांना प्रेरणा मिळाली कारण पवित्र आत्म्याठायी  मिळणारा हा आनंद त्याच्यापासून कोणिही हिरावून घेणार नाही ह्याची त्यांना  खात्री होती.

पहिले वाचन  प्रेषितांचे कृत्ये १८:२३-२८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"येशू हाच ख्रिस्त आहे असे अपुल्लोने शास्त्रावरून दाखवले."

अंत्युखिया येथे काही दिवस राहून पौल निघाला आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत आणि फुगिया ह्यातील सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरला.
तेव्हा अपुल्लो नावाचा एक मोठा वक्ता आणि शास्त्रपारंगत आलेक्सांद्रियाकर यहुदी इफिस येथे आला. त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते आणि तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे. तरी त्याला केवळ योहानचा बाप्तिस्मा ठाऊक होता. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले आणि त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला. नंतर त्याने अखया •प्रांतात जाण्याचा बेत केला, तेव्हा बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी शिष्यांना लिहिले. तो येथे पोहचल्यावर ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले. कारण येशू हाच ख्रिस्त आहे, असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणाने सर्वासमक्ष यहुद्यांचे खंडण करीत असे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ४७:२-३,८-९,१०
प्रतिसाद : परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा आहे.

१ )अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा,
 उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा. 
कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे, 
तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.

२) देव सर्व पृथ्वीचा राजा आहे,
 तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा.
देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे,
देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे..

३) राष्ट्रांतले अधिपती जमले आहेत, 
आब्राहामच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे. 
पृथ्वीवरील सर्व राजे देवाचे आहेत, तो परमथोर आहे.

जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे, 
मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि 
माझी मेंढरे मला ओळखतात.
आलेलुया !

शुभवर्तमान योहान १६:२३-२८
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "पिता तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि विश्वास धरला आहे.' "
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला सत्य सांगतो, तुम्ही, पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हांला माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यामुळे तुमचा आनंद परिपूर्ण होईल. ह्या गोष्टी मी तुम्हांला अन्योक्तीने सांगितल्या आहेत. मी तुमच्याबरोबर अन्योक्तीने आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हांला उघड सांगेन अशी घटका येत आहे. त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन, असे मी तुम्हांला म्हणत नाही; कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे. मी पित्यापासून निघून जगात आलो आहे, पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन: स्वर्गीय पित्याच्या हृदयातील रहस्य प्रकट करण्यासाठी ख्रिस्त मानव होऊन आला. या रहस्याद्वारे स्वर्गीय पित्याकडे जाण्यासाठी तो प्रभावी मध्यस्थी बनला. मागा म्हणजे मिळेल हे शब्द आम्हाला खूप दिलासा देणारे आहेत. प्रभू ख्रिस्ताचे हे आश्वासन अखेरपर्यंत टिकून राहील. कारण हे शब्द देवपुत्राच्या हृदयातून भरलेल्या प्रेमातून व्यक्त झाले आहेत. ग्रीक लोकांना हे रहस्य समजावून सांगताना आपुल्लोच्या रूपाने एक मोठा सहकारी त्याला भेटला. तो ग्रीक भाषेत पारंगत होता. शास्त्र चांगल्यारीतीने जाणणारा होता. तो सभास्थानात निर्भिडपणे बोलू लागला. प्रेषित पौलसाठी ही मोलाची साथ लाभली होती...

प्रार्थना :  हे आनंदाच्या उगमा, तुझ्या आनंदात परिपूर्णतेचे जीवन आनुभवण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या