Marathi Bible Reading | 7th Sunday of the Easter | 21st May 2023 |

 पुनरुत्थान सातवा  रविवार 

दि. २१ मे  २०२३ 

प्रभूचे स्वर्गारोहण

“स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.




 पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.


 प्रभू येशूने शिष्यांना म्हटले, "तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा, त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या”. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना दिलेली सुवार्ता प्रसाराची आज्ञा त्यांनी अमलात आणली. श्रद्धेने प्रेरित होऊन शिष्यांनी आपले सुवार्ता प्रसाराचे कार्य चालू ठेवले कारण प्रभू येशूने शेवटी त्यांना म्हटले, “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे”. प्रभू येशू आजसुद्धा आपल्या सर्वांच्या बरोबर आहे. प्रभू येशूची सुवार्ता आणि शिकवण इतरांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक ख्रिस्ती माणसावर सोपविलेली आहे.
 प्रभू येशूकडे स्वर्गातील आणि पृथ्वीवरील अधिकार आहेत. आपण न डगमगता प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी व त्याच्या पुनरुत्थान व स्वर्गरोहणाची साक्ष देण्यासाठी विश्वासाने पुढाकार घेऊ या.पवित्र त्रैक्याच्या नावाने प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी आपल्या प्रत्येकाला पाचारण आहे.


  
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १:१-११
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन  
“त्यांच्या डोळ्यांदेखत येशू वर घेतला गेला." 
हे थियफिला, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्याद्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला, त्या दिवसांपर्यंत त्याने जे जे करायला आणि शिकवायला आरंभिले होते त्या सर्वांविषयी मी पहिल्या ग्रंथात लिहिले होते. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखवले. चाळीस दिवसपर्यंत येशू त्यांना दर्शन देत असे आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो आणि ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की, येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पाहा. कारण योहानने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल.
ह्यास्तव ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, "प्रभो, ह्याच काळात तुम्ही इस्राएलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय ?" तो त्यांना म्हणाला, "जे काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हांकडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुम्हांवर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल आणि येरुशलेमेत, सर्व यहुदियात, शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल." असे सांगितल्यावर त्याच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहात होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, "अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहात उभे राहिला? हा जो येशू तुम्हांपासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले, तसाच येईल."
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ४७: २-३,६-९
प्रतिसाद :   जयघोष होत असता देव वर गेला आहे.

१) अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा, 
उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा!
 कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे. 
तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.

२) जयघोष होत असता देव वर गेला आहे. 
कण्यांचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. 
देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा;
 आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा.

३) देव सर्व पृथ्वीचा राजा आहे, 
तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा.
 देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे; देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे.

दुसरे वाचन  इफिस १:१७-२३
वाचक :  पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
 “परमेश्वराने येशूला स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले."
आपला प्रभू येशू ख्रिस्त हाच देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हाला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंत:चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्याच्या सामर्थ्याने अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वावर मस्तक व्हावे असे म्हणून त्यांला मंडळीला दिले. हीच मंडळी त्याचे शरीर होय. हिच्याचद्वारे तो आपले कार्य सर्वत्र आणि सर्व प्रकारे पुरे करतो."
 प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष

आलेलुया, आलेलुया !
तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा;
युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.
आलेलुया !

शुभवर्तमान मत्तय २८:१६-२०
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. "

अकरा शिष्य गालिलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्यांनी येशूला तेथे पाहून नमन केले, तरी कित्येकांना संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. ह्यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन:आजच्या उपासनेतील सर्व वाचने (प्रे. कृ. १:१-११; इफिस १:१७-२३; मत्तय २८:१६-२०) स्वर्गात चढणाऱ्या येशूने आपल्यावर सोपविलेल्या महान मिशनकार्याची जाणीव करून देतात. हे मिशन कार्य करताना प्रेषितांनी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते येशू शिकवितो. 
अ. येशूचा अधिकार : स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार येशूला देण्यात आलेला आहे. त्याच्या प्रेषितकार्यात येशूने पृथ्वीवरील, निसर्गातील, आजारावरील, व्यंगांवरील, भूत-पिशाच्चावरील, मरणावरील व सर्व दुःखावरील अधिकार प्रकट केलेला होता. त्याच्या जन्माच्या वेळी देवदूतांनी गायन केलेले होते. त्याच्या मरणाच्या वेळी मृत माणसे जिवंत होऊन पवित्र भूमीत गेलेली होती. पुनरुत्थानसमयी स्वर्गातून देवदूत उतरला होता. आता त्याच्या स्वर्गारोहणाद्वारे येशू स्वर्गातील व पृथ्वीवरील आपला अधिकार अधोरेखित करतो. 
ब. शिष्यांचे प्रेषितकार्य : मत्तयच्या शुभवर्तमानात येशू सुरूवातीला आपले प्रेषितकार्य इस्राएलपुरता मर्यादित ठेवतो. (१५:२८). प्रेषितांनादेखील तो केवळ इस्राएलच्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठवतो (१०:५). मात्र त्याच्या स्वर्गारोहणाच्या वेळी तो शिष्यांचे प्रेषितकार्य व्यापक करतो. सर्व राष्ट्रांना शिष्य करून त्यांना आत्ता आपले प्रेषितकार्य पुढे सुरू ठेवायचे आहे. 
क. पवित्र त्रैक्याचा बाप्तिस्मा : बाप्तिस्मा ह्या अर्थ बुडवून काढणे. प्रेषितांनी आता सर्वांना देवपित्याच्या प्रेमात, देवपुत्राच्या कृपेत आणि पवित्र आत्म्याच्या एकोप्यात सहभागी करून घ्यावे अशी आज्ञा येशू देतो. 
ड. आज्ञापालनाची शिकवण : एक उत्तम गुरू म्हणून येशूने लोकसमुदायाला शिकवलेले होते. काही गोष्टी एकांती प्रेषितांना समजून सांगितलेल्या होत्या. आता येशू त्यांना इतरांना शिकविण्याची आज्ञा करतो. शिष्यांना एकाच वेळी शिक्षक आणि विद्यार्थी ह्या दोन्ही भूमिका पार पाडायच्या आहेत. 
इ. येशूची अखंड उपस्थिती : केवळ मत्तयच्या शुभवर्तमानात "इम्मानुएल (आम्हाबरोबर देव)” (१:२३) “जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतील तिथे मी त्यांच्यात हजर आहे" (१८:२०) अशा शब्दात येशूमधील देवाच्या उपस्थितीचे सूतोवाच करण्यात आले आहे. आत्ता स्वर्गात जाण्यापूर्वी येशू “मी युगाच्या समाप्तीपर्यंत सदैव तुमच्याबरोबर आहे. " असे वचन देतो.
 आत्मपरीक्षण : वरीलपैकी कोणता पैलू मला अधिक स्पर्शन जातो ? तो मी कशाप्रकारे कृतीत उतरविणार आहे ?
    
प्रार्थना : हे प्रभू येशू, स्वर्गराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यास व तुझी साक्ष जगाला देण्यास आम्हाला कृपा व सामर्थ्य दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या