Marathi Bible Reading |Monday 22nd May 2023 | 7th Week of the Easter |

 पुनरुत्थान ७वा  सप्ताह 

सोमवार  दि.२२ मे २०२३ 

जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे." 
✝️




कॅसियाची संत रिटा
-विधवा (१३८६-१४५६)

स्वत:च्या गरजा विसरणे, स्वतःविषयी मुळीच चिंता नसणे ह्यामुळे आपण इतरांप्रती संवेदनक्षम राहू शकतो. संत रिटा.


अंधाऱ्या रात्रीनंतर नवीन दिवसाची पहाट येते, म्हणुनच प्रभू येशू आज  आपल्या शिष्यांना सांगत आहे, 'जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे.' श्रद्धेने नीतिमत्वाचे आणि प्रामाणिक जीवन जगून सेवा करणाऱ्या ख्रिस्ती अनुयायांना आज सुद्धा अनेक संकटांना व अत्याचाराला  सामोरे जावे लागत आहे. आपल्या आजू-बाजूला धर्माच्या आणि जाती  व्यवस्थेच्या नावाखाली तसेच राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ख्रिस्ती  मंदिरांवर, संस्थांवर व सुवार्ता प्रचारकांवर हल्ले होत आहेत. अत्याचार व अन्यायाने धर्मगुरु आणि धर्मभगिनींना मारहाण केली जात आहे, ह्याची ताजी उदाहरणे आपल्या समोर आहेत. प्रभू येशू आज सर्वांना धीर देत म्हणत आहे,  'धीर धरा, मी जगाला जिंकले आहे.' आपण सर्वजण मृत्युंजय प्रभू येशू  ख्रिस्ताचे अनुयायी आहोत.


पहिले वाचन   प्रेषितांचे कृत्ये १९:१-८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
 “तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांस पवित्र आत्मा मिळाला काय ?"
अपुल्लो करिंथ येथे असता पौल वरच्या प्रांतांमधून जाऊन इफिस येथे पोहचला. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. त्यांना तो म्हणाला, "तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांस पवित्र आत्मा मिळाला काय ?" त्यांनी त्याला म्हटले, “पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही." तो त्यांना म्हणाला, "मग तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला ?" ते म्हणाले, “योहानचा बाप्तिस्मा" पौलने म्हटले, "योहान पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे, तो लोकांना सांगत असे की, माझ्यामागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा." हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला आणि पौलने त्यांच्यावर हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला; ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले आणि ईश्वरी संदेश देऊ लागले. ते सगळे सुमारे बारा पुरुष होते. नंतर तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत आणि प्रमाण पटवीत निर्भीडपणे तीन महिने बोलत गेला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ६८:२-७
प्रतिसाद : अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा.

१) देवाने उठावे, त्याच्या वैऱ्यांची दाणादाण होवो.
त्याचा द्वेष करणारे त्याच्यापुढून पळोत.
जसा धूर फाकतो तशी त्यांची फाकाफाक कर; 
जसे मेण अग्नीपुढे ठेवले असता वितळते 
तसे दुष्ट देवापुढे नष्ट होवोत.

२. )परंतु धार्मिक हर्षोत, देवापुढे आनंदोत्सव करोत, 
हर्षामुळे आनंद करोत. देवाचे गीत गा, 
त्याच्या नामाचे स्तवन करा. त्याच्यापुढे आनंदोत्सव करा.

३) पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी 
असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे. 
एकटे असलेल्यांना देव कुटुंबवत्सल करतो, 
बंदिवानांना बाहेर काढून भाग्यवान करतो.

जयघोष
आलेलुया, आलेलुया !
जा, सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हांबरोबर आहे.
आलेलुया !

शुभवर्तमान योहान १६:२९-३३
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 “धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. "
येशूचे शिष्य त्याला म्हणाले, "पाहा, आता आपण उघड बोलता, अन्योक्तीने काही सांगत नाही. आता आम्हांला कळले आहे की, आपल्याला सर्व काही कळते आणि कोणी आपणाला विचारावे ह्याची आपणाला गरज नाही; ह्यावरून आपण देवापासून आला आहा असा आम्ही विश्वास धरतो." येशूने त्यांना उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास धरता काय? पाहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे, की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपआपल्या घरी जाल आणि मला एकटे सोडाल; तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे. माझ्या ठायी तुम्हांला शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन: तीन वर्षे येशू समवेत राहून शिष्य त्याचे अलौकिक शब्द ऐकत होते व अद्भूत कार्य पहात होते. ख्रिस्ताठायी जीवनाचे रहस्य भरलेले आहे. यावर त्यांचा विश्वास बसू लागला होता. परंतु हे सर्व पुरेसे नव्हते. येशूला जेव्हा कपटाने कैद केले जाईल, जेव्हा त्याला मरणदंड दिला जाईल तेव्हाच त्यांच्या विश्वासाची खरी कसोटी लागणार होती. म्हणूनच तो त्यांना धीर देत आहे. “मी पुर्नरुजीवीत होणार आहे. यावर विश्वास ठेवा, दुःखाच्या अंधारातून प्रकाशाची वाट येणार आहे. आम्हा विश्वासूंना देखील ही वाट चालावी लागेल. हे प्रभु येशू, तुझ्या मध्येच आम्हाला शांतीचा अनुभव मिळणार आहे. तुझे वचन आमच्या नित्य स्मरणात राहू दे.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, धैर्याने व धीराने तुझी सुवार्ता परसविण्यास व सर्व प्रकारच्या आव्हानाना सामोरे जाण्यास आम्हाला सामर्थ्य व कृपा दे, आमेन.
                    पवित्र आत्म्याचा नोव्हेना प्रार्थना

हे माझ्या परमेश्वरा । पवित्र आत्म्या आम्ही तुला नमन करतो, आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाहीत, । हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो हे पवित्र आत्म्या । महान कैवारी, तू गरीबांचा पिता आहेस. तू उत्कृष्ट सांत्वनकर्ता आहेस आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त । ह्याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही हे पवित्र आत्म्या आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत । तू प्रभू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यांवर पेन्टेकॉस्टच्या दिवशी अवतरलास । व त्यांना तुझ्या दानांनी भरलेस! हे पवित्र आत्म्या त्याच दयेने व दानशूरतेने । त्या दानांचा आम्हावर वर्षाव कर आमच्या अंतःकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन तू वस्ती कर आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात व समजाव्यात म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने । उल्हसित कर. हे पवित्र आत्म्या । आमचे अंत:करण । तुझ्या शुध्द प्रेमाने भर । विविध बंधनात जखडून ठेवणाऱ्या आसक्ती आमच्या हृदयातून काढून टाक आम्हाला प्रभू येशूच्या प्रेमाने भर । परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावे । म्हणून पवित्र आशा-आकांक्षांनी जगण्यास आम्हाला प्रेरणा दे । नम्रता, विरक्ती, आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहापासून दूर राहण्याचा प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे. । आमेन!

आमच्या स्वर्गीय बापा व तीन नमो मरिया

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या