पुनरुत्थान ७वा सप्ताह
मंगळवार दि.२३ मे २०२३
जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते माझे आहे
✝️
संत जॉन बॅप्टिस्ट डी रॉस्सी
- वर्तनसाक्षी (१६९८- १७६४)
रोममधील कॅम्पो वॅक्सीनो येथे जमणाऱ्या धनगरांना आणि शेतकामगारांना भल्या पहाटे आणि रात्री उशीरा प्रवचने देऊन मार्गदर्शन करण्याचे काम जॉन बॅप्टिस्ट डी रॉस्सी मोठ्या आवडीने करीत असे. दिवसा तो जवळच्याच रूग्णालयातील आजाऱ्यांना भेटी देई. रात्री जिकडे तिकडे भटकणाऱ्या बेघरांना राहण्यासाठी त्याने संत गाला हॉस्पीटलजवळ एक घर बांधले होते.
तरुणपणी जॉनला अधूनमधून वाताचे झटके वा फिट्स यायच्या. त्यामुळे त्यांनी कुमसाराच्या प्रेषितकार्यापासून स्वतःला दूर ठेवलेले होते. मात्र त्याचे पावित्र्य पाहून स्थानिक बिशपांनी त्यांना तेही प्रेषितकार्य स्वीकारण्यास प्रेरणा दिली. फा. जॉनच्या कुमसार प्रेषितकार्यामुळे इतक्या झटपट लोकांची जीवने बदलू लागली की त्याच्या कुमसार ऐकण्याच्या अधिकाराची व्याप्ती साऱ्या रोम शहरापर्यंत वाढवून देण्यात आली. अशा प्रकारची परवानगी काही निवडक धर्मगुरूंनाच देण्यात येते.
धनगर, मेंढपाळ, शेतमजूर ह्यांचा सांभाळ करणाऱ्या फा. जॉन ह्यांच्यावर आता ही नवीन जबाबदारी आल्यामुळे ते कैदी, आजारी, गरीब, निरक्षर अशा लोकांची कुमसारे ऐकण्यासाठी हॉस्पीटलमध्ये लोकांच्या घरी आणि तुरूंगात जात असत.
संत जॉन बॅप्टिस्ट डी रॉस्सी हे २३ मार्च १७६४ रोजी मरण पावले आणि १८८१ साली त्यांना संतपद देण्यात आले.
चिंतन : पारादिसचा अनंतकालीन आनंद अनुभवायचा असेल तर आपण अखंडितपणे अहोरात्र कष्ट करायला हवेत. - संत जॉन बॅप्टिस्ट डी रॉस्सी
बायबल मधील देवाची वचने म्हणजे आपल्या सर्वांसाठी सार्वकालिक जीवनाचा अतिमौल्यवान खजिना आहे. आपण जेव्हा प्रभूची वचने ग्रहण करतो तेव्हा देव आपल्याबरोबर बोलत असतो. बायबल वाचनाद्वारे देवपित्याबरोबर व येशूबरोबर वारंवार आपण संवाद साधला पाहिजे. संत याकोब म्हणतो, 'खरे धर्माचरण, देवाचे वचन ऐकण्यात, चर्चा करण्यात व ते खऱ्या अर्थाने वागण्यात आहे' (याकोब १:२२-२५).
प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांसाठी सामर्थ्यशाली व तारणादायी वचने दिलेली आहेत. प्रभूची वचने म्हणजे आध्यात्मिक मेजवानी आहे. त्या वचनांद्वारे आपण ख्रिस्ताशी व देवपित्याशी ऐक्य साधत असतो. आपण पवित्र । शास्त्र (बायबल) उघडू या व प्रभूबरोबर बोलू या.
पहिले वाचन प्रे. कृ. २०: १७-२७
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
" मी माझी दौड आणि सुवार्ता सांगण्याची सेवा जी मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास नेली आहे. "
पौलने मिलेताहून इफिस येथे निरोप पाठवून मंडळींच्या वडीलजनांना बोलावून घेतले. ते त्याच्याजवळ आल्यावर त्याने त्यांस म्हटले :
“मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून तुम्हांबरोबर नेहमी कसा होतो, म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि यहुद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हांला ठाऊक आहे. जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चार लोकांत आणि घरोघर शिकवण्यात मी कसूर केली नाही. पश्चात्ताप करून देवाकडे वळणे आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहुदी आणि हेल्लेणी ह्यांना मी साक्ष देत होतो. पण आता पाहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन येरुशलेमात जात आहे, तेथे मला काय काय होईल ते माहीत नाही; केवळ इतके कळते की, बंधने आणि संकटे माझी वाट पाहत आहेत; ह्याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करीत नाही, ह्यासाठी मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी, आणि आता पाहा, ज्यांच्यामध्ये मी राज्याची घोषणा करीत फिरलो त्या तुम्हा कोणाच्याही दृष्टीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही, हे मला ठाऊक आहे. म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की, मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हांला सांगण्यास मी कसूर केली नाही.”
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ६८:१०-११,२०-२१
प्रतिसाद : पृथ्वीवरील राष्ट्रांनो, देवाचे गीत गा.
१) हे देवा, तू विपुल पाऊस पाठवून दिलास;
तुझे वतन कोमेजले होते
तेव्हा तू ते यथास्थित केले.
त्यात तुझी मंडळी राहिली;
हे देवा, तू आपल्या चांगुलपणाने दीनांसाठी बेगमी केली.
२) प्रभूचा धन्यवाद होवो,
तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो;
देव हा आमचे तारण आहे,
हा आमचा देव आम्हाला संकटातून मुक्त करणारा आहे
मृत्यूपासून सुटण्याचे मार्ग दाखवणे
हे प्रभू जो परमेश्वर त्याच्याकडे आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १७:१-११
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बापा, तू आपल्या पुत्राचा गौरव कर.'
येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, “हे माझ्या बापा, वेळ आली आहे; पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या पुत्राचा गौरव कर. जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू मनुष्यमात्रावर त्याला अधिकार दिला आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. तर आता हे माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्याजवळ होता त्याच्यायोगे तू आपणाजवळ माझा गौरव कर."
"जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले, ते तुझे होते आणि तू ते मला दिले आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की, जे काही तू मला दिले आहे ते सर्व तुझ्यापासून आहे. कारण जी वचने तू मला दिली ती मी त्यांना दिली आहेत, ती त्यांनी स्वीकारली; मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवले असा त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्यासाठी मी विनंती करतो. मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी करतो. कारण ते तुझे आहेत. जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते माझे आहे आणि त्यांच्या ठायी माझा गौरव झाला आहे. ह्यापुढे मी जगात नाही, मी आता तुझ्याकडे येत आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:
मरण डोळ्यासमोर दिसत असताना, प्रभू येशू आपल्या शिष्यांसाठी कळकळीने प्रार्थना करीत आहे. या प्रार्थनेत तो स्वर्गीय पित्याशी संपूर्णपणे समरस होत आहे. आपण अनुयायांची निवड पित्याच्या इच्छेनुसार केली होती याची येशूला खात्री होती. मी ज्यांना निवडले आहे ते माझ्याशी व शुभवर्तमानाशी इमान राखतील अशी आशा तो व्यक्त करीत आहे. शुभवर्तमानाचे साक्षी होण्यासाठी आमची देखील निवड झाली आहे. ती सार्थ ठरावी यासाठी प्रेषितांप्रमाणे आम्हाला प्रभूचा आधार हवा आहे.
“प्रभू मज तव आधार हवा रे,
साहायाविन तव जगू कसा रे.”
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, सर्वकालिक जीवन देणारी वचने जाणून तुला । ओळखण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला कृपा आमेन.
पवित्र आत्म्याचा नोव्हेना प्रार्थना
हे माझ्या परमेश्वरा । पवित्र आत्म्या आम्ही तुला नमन करतो, आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाहीत, । हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो हे पवित्र आत्म्या । महान कैवारी, तू गरीबांचा पिता आहेस. तू उत्कृष्ट सांत्वनकर्ता आहेस आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त । ह्याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही हे पवित्र आत्म्या आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत । तू प्रभू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यांवर पेन्टेकॉस्टच्या दिवशी अवतरलास । व त्यांना तुझ्या दानांनी भरलेस! हे पवित्र आत्म्या त्याच दयेने व दानशूरतेने । त्या दानांचा आम्हावर वर्षाव कर आमच्या अंतःकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन तू वस्ती कर आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात व समजाव्यात म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने । उल्हसित कर. हे पवित्र आत्म्या । आमचे अंत:करण । तुझ्या शुध्द प्रेमाने भर । विविध बंधनात जखडून ठेवणाऱ्या आसक्ती आमच्या हृदयातून काढून टाक आम्हाला प्रभू येशूच्या प्रेमाने भर । परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावे । म्हणून पवित्र आशा-आकांक्षांनी जगण्यास आम्हाला प्रेरणा दे । नम्रता, विरक्ती, आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहापासून दूर राहण्याचा प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे. । आमेन!
आमच्या स्वर्गीय बापा व तीन नमो मरिया
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या