पुनरुत्थान ७वा सप्ताह
बुधवार दि.२४ मे २०२३
मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले
✝️
पवित्र मारिया ख्रिस्तसभेची माता
आजचा सण 'पवित्र मरिया ख्रिस्तसभेची माता' हा असून २०१८ साली पोप फ्रान्सिस ह्यांनी पवित्र आत्म्याच्या सोहळ्यानंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी तो साजरा करण्यात यावा असे घोषित केले. पॅन्टेकोस्टच्या दिवशी पवित्र मरियेसह प्रेषितांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला
आपणा प्रत्येकाला सुवार्ता प्रसारासाठी पाचारण आहे, त्याच्या सेवेकार्यासाठी आपण नि:संकोचपणे होकार देऊ या कारण प्रभू आपल्याबरोबर आहे.
प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातील आजच्या पहिल्या वाचनात संत पौल इफिसकरांस मार्गदर्शनपर बोध करीत आहे. संत पौल म्हणतो, 'आता मी | तुम्हांस प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवितो. तो तुमची वाढकरावयास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हाला वचन द्यावयास समर्थ आहे.' प्रभू येशू प्रेषितगण आणि सर्व संत गणाच्या मध्यस्थीने आपल्या | सर्वांसाठी प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करु या.
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये २०:२८-३८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी तुम्हांस तुमची वाढ करावयास आणि तुम्हांला तुमचे वतन द्यावयास समर्थ असलेल्या प्रभूकडे सोपवतो."
पौलने इफिसच्या सभास्थानातील वडीलवर्गाला पुढील शब्दांनी उद्देशून म्हटले, "तुम्ही स्वतः कडे आणि ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हांला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतः करिता मिळवली तिचे पालन तुम्ही करावे. मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुम्हांमध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुम्हांपैकीही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. ह्यास्तव मी तीन वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळीत प्रत्येकाला बोध करण्यास खंड पडू दिला नाही, ही आठवण ठेवून सावध राहा. आता मी तुम्हांला प्रभूकडे आणि त्याच्या वचनाकडे सोपवतो. तो तुमची वाढ करायला आणि पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये वतन द्यायला समर्थ आहे. मी कोणाच्या सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्रांचा लोभ धरला नाही. माझ्या आणि माझ्या सोबत्यांच्या गरजा भागवण्याकरता ह्याच हातांनी श्रम केले, हे तुम्ही स्वत: जाणून आहा. सर्व गोष्टींत मी तुम्हांला कित्ता घालून दाखवले आहे की, तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे आणि “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे." असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.
असे बोलल्यावर त्याने गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली. तेव्हा ते सर्व फार रडले आणि त्यांनी पौलच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले. "माझे तोंड तुमच्या दृष्टीस ह्यापुढे पडणार नाही," असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दुःख झाले. मग त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहचवले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ६८:२९-३०,३३-३६
प्रतिसाद : पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा.
१) तू प्रबळ व्हावे असे तुझ्या देवाने आज्ञापिले आहे.
हे देवा, तू आम्हांसाठी जे केले आहे
ते दृढ कर येरुशलेमातील तुझ्या मंदिराकरिता
राजे तुला भेटी आणतील.
२) पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा
प्रभूची स्तोत्रे गा.
पुरातन आकाशांच्या आकाशावर
आरूढ होऊन जो स्वारी करतो,
त्याची स्तोत्रे गा. पाहा, तो आपला शब्द,
सामर्थ्याचा शब्द उच्चारतो.
देवाच्या बलाचे वर्णन करा.
३) इस्राएलवर त्याचे ऐश्वर्य आणि गगनमंडळात
त्याचे बल आहे. तुझ्या पवित्र स्थानातून कार्य करणारा देव
भयप्रद आहे.इस्राएलचा देव आपल्या लोकांना
बल आणि सामर्थ्य देतो.देवाचा धन्यवाद होवो।
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी देईल. अशासाठी की, त्याने तुम्हांबरोबर सदासर्वदा राहावे.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान १७:११-१९
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बापा, जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे."
येशूने स्वर्गाकडे दृष्टी लावून म्हटले, "हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे. जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले. मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय कोणाचा नाश झाला नाही; शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्याठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो. मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला समर्पित करतो."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:
सत्याचा आवाज दबला जातो. जे कुटील राजनीती करतात, ते या जगात मिरवत असतात. इतरांवर अन्याय करून ते भ्रष्ट जीवन जगतात. अशी माणसे ख्रिस्ताचा न्याय व शांतीचा मार्ग स्वीकारू शकत नाहीत. त्यांचे अंतरंग द्वेष व हिंसा यांनी मलीन होत असते. आपल्या शिष्यांनी सत्य व नीतीचा मार्ग धरावा यासाठी तो पित्यापाशी विनंती करीत आहे. आम्हालाही प्रभुच्या कृपेची गरज आहे. “आम्ही शिष्य प्रभूचे, आम्ही साक्षी नवजीवनाचे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आमचे रक्षण कर व तुझ्या ।सुवार्तेचे साधन बनव, . आमेन.
पवित्र आत्म्याचा नोव्हेना प्रार्थना
हे माझ्या परमेश्वरा । पवित्र आत्म्या आम्ही तुला नमन करतो, आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाहीत, । हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो हे पवित्र आत्म्या । महान कैवारी, तू गरीबांचा पिता आहेस. तू उत्कृष्ट सांत्वनकर्ता आहेस आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त । ह्याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही हे पवित्र आत्म्या आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत । तू प्रभू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यांवर पेन्टेकॉस्टच्या दिवशी अवतरलास । व त्यांना तुझ्या दानांनी भरलेस! हे पवित्र आत्म्या त्याच दयेने व दानशूरतेने । त्या दानांचा आम्हावर वर्षाव कर आमच्या अंतःकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन तू वस्ती कर आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात व समजाव्यात म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने । उल्हसित कर. हे पवित्र आत्म्या । आमचे अंत:करण । तुझ्या शुध्द प्रेमाने भर । विविध बंधनात जखडून ठेवणाऱ्या आसक्ती आमच्या हृदयातून काढून टाक आम्हाला प्रभू येशूच्या प्रेमाने भर । परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावे । म्हणून पवित्र आशा-आकांक्षांनी जगण्यास आम्हाला प्रेरणा दे । नम्रता, विरक्ती, आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहापासून दूर राहण्याचा प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे. । आमेन!
आमच्या स्वर्गीय बापा व तीन नमो मरिया
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या