पुनरुत्थान ७वा सप्ताह
गुरुवार दि.२५ मे २०२३
तू जे मला दिले आहे तसे त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे.
✝️
संत बीड
वर्तनसाक्षी, धर्मपंडित (६७३-७३५)
चिंतन: "जो आपल्या शेजाऱ्यावर शुद्ध अंतःकरणाने प्रेम करतो तोच उत्पन्न कर्त्या देवावर प्रेम करू शकतो." संत बीड
आपल्यातील दुर्गुणांमुळे आपण देवप्रीतिपासून आणि ख्रिस्तापासून बहकून दूर जातो. प्रीतिचा अंश आपल्यामध्ये सतत वाढावा म्हणून ख्रिस्ताच्या सहवासात जाणे गरजेचेआहे. प्रभूची वचने, त्याची शिकवण आपल्याला आत्मसात करावी लागेल. नम्रता, सौम्यता, विश्वासुपणा, चांगुलपणा, शांति, स्नेह, समंजसपणा अशा दैवी गुणांची वाढ आपल्यामध्ये होत राहीली पाहिजे. ह्या प्रीतिची सुरुवात आपण स्वतःपासून करावी. परमेश्वराच्या वचनांवर चिंतन करुन देवप्रीति व परस्पर प्रीतिच्या आज्ञांचे चिंतन करावे. विशेषतः आत्मपरीक्षण करावे. परमेश्वरच्या प्रेमाचा, अस्तित्वाचा आणि करुणेचा अनुभव सतत होत राहावा म्हणून आजच्या प्रभू प्रार्थनेत आपण सहभागी होऊ या. परमेश्वराच्या प्रीतिचा अविष्कार आपल्या जीवनात घडत राहावा म्हणून प्रार्थना करु या.
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये २२:३०,२३:६-११
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"आता तुला रोम शहरात साक्षी द्यावी लागेल."
यहुदी लोकांनी पौलवर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते. म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्याला मोकळे केले आणि मुख्य याजक आणि सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलला खाली आणून त्यांच्यापुढे उभे केले.
तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदुकी आणि एक भाग परुशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, "बंधुजनहो, मी परुशी आणि परुश्याचा पुत्र आहे, आमची आशा आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे." तो हे बोलत आहे तोच परुशी आणि सदुकी ह्यांच्यात भांडण लागून लोकांत फूट पडली. कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत आणि आत्माही नाही, असे सदुकी म्हणतात; परुशी तर ह्या दोन्ही गोष्टी मान्य करतात. तेव्हा मोठी गडबड उडाली आणि जे शास्त्री परुश्याच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काहीजण उठून तणतण करीत म्हणाले, "ह्या माणसाच्या ठायी आम्हाला काही वाईट दिसत नाही. जर आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे ?" असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता ते पौलला मारुन टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की, "खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून बराकीत आणावे."त्याच रात्री प्रभू पौलपुढे उभा राहून म्हणाला, "धार घर जशी तू येरुशलेममध्ये माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १६:१-२,५,७-११
प्रतिसाद : हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्या आश्रयाला आलो आहे.
१) हे देवा, माझे रक्षण कर, कारण
मी तुझ्या आश्रयाला आलो आहे.
परमेश्वर माझ्या वतनाचा आणि
प्याल्याचा वाटा आहे,
माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस.
२) परमेश्वराने मला बोध केला आहे,
त्याला मी धन्यवाद देतो.
माझे अंतर्यामही मला रात्री उपदेश करते.
मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे;
तो माझ्या उजवीकडे आहे,म्हणून मी ढळणार नाही.
३) यास्तव माझे हृदय आनंदित होते,
माझा आत्मा उल्हासतो;
माझा देहही सुरक्षित राहतो.
कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस,
तू आपल्या भक्ताला कुजण्याचा
अनुभव येऊ देणार नाहीस.
४) जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील,
तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे,
तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान १७:२०-२६
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बापा, त्या सर्वांनी एक होऊन पूर्ण व्हावे."
येशूने स्वर्गाकडे दृष्टी लावून म्हटले, "हे पवित्र बापा, मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक • व्हावे, कारण तू मला पाठवले असा विश्वास जगाने धरावा. तू जो गौरव मला दिला आहे तो मी त्यांना दिला आहे, जसे आपण एक आहो तसे त्यांनीही एक व्हावे; म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहे तसे त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे. जो माझा गौरव तू मला दिला आहे तो त्यांनी पाहावा; कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली. हे नीतिमान बापा, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे. मी तुझे नाव त्यांस कळवले आणि कळवीन. ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: योहानाच्या शुभवर्तमानात "प्रीति” चा सद्गुण मध्यवती आहे. ही प्रीती स्वर्गीय पित्याच्या हृदयातून प्रभू येशूच्या जीवनात प्रकट झाली. प्रभूच्या प्रेमामध्ये आम्ही एकरूप झालो तर स्वर्गीय पित्याबरोबर आमचे ऐक्य जोडले जाते. ख्रिस्ताच्या प्रेमापासून आम्ही दूर झालो तर देवाची प्रीती आम्हामध्ये राहाणार नाही. आमचे जीवन निरर्थक होईल. पॉलच्या शिकवणीमुळे यहुदी लोकांमध्ये फूट पडली आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवावा की नाही यावरून त्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला. प्रेषित फिलीप याला येशूने म्हटले, "माझ्यावर जो विश्वास ठेवतो तो स्वर्गीय पित्याला ओळखतो. "हे प्रभू येशू, सार्वकालिक जीवन तुझ्याठायी आहे. आणि हे जीवन तुझ्या प्रीतीमय जीवनातून व्यक्त होत आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, आमच्याद्वारे ख्रिस्त प्रीतिबिंवीत व्हावा म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन.
पवित्र आत्म्याचा नोव्हेना प्रार्थना
हे माझ्या परमेश्वरा । पवित्र आत्म्या आम्ही तुला नमन करतो, आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाहीत, । हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो हे पवित्र आत्म्या । महान कैवारी, तू गरीबांचा पिता आहेस. तू उत्कृष्ट सांत्वनकर्ता आहेस आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त । ह्याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही हे पवित्र आत्म्या आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत । तू प्रभू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यांवर पेन्टेकॉस्टच्या दिवशी अवतरलास । व त्यांना तुझ्या दानांनी भरलेस! हे पवित्र आत्म्या त्याच दयेने व दानशूरतेने । त्या दानांचा आम्हावर वर्षाव कर आमच्या अंतःकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन तू वस्ती कर आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात व समजाव्यात म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने । उल्हसित कर. हे पवित्र आत्म्या । आमचे अंत:करण । तुझ्या शुध्द प्रेमाने भर । विविध बंधनात जखडून ठेवणाऱ्या आसक्ती आमच्या हृदयातून काढून टाक आम्हाला प्रभू येशूच्या प्रेमाने भर । परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावे । म्हणून पवित्र आशा-आकांक्षांनी जगण्यास आम्हाला प्रेरणा दे । नम्रता, विरक्ती, आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहापासून दूर राहण्याचा प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे. । आमेन!
आमच्या स्वर्गीय बापा व तीन नमो मरिया
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या