सामान्यकाळातील ८वा सप्ताह
शुक्रवार २ जुन २०२३
माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील,"
✝️
डायक्लोशियन या क्रूर सम्राटाच्या काळात मार्सेलिनस नावाचे धर्मगुरू कार्य करीत होते. पीटर ह्याला दुष्टात्मा निवारणाचे अद्भुत सामर्थ्य लाभलेले होते. या दोघांना सम्राटाने त्यांच्या श्रद्धेपायी तुरुंगात टाकले होते. त्या तुरुंगात अनेक ख्रिस्ती लोक आपल्या श्रद्धेपायी दुःख वेदना सहन करीत होते. मार्सेलिनस आणि पीटर ह्यांनी तुरुंगातील लोकांना ख्रिस्ती शिकवणुकीचे धडे दिले. त्याचा परिणाम असा झाला की हे कैदी आनंदाने आपली शिक्षा भोगू लागले ते पाहून आर्थिमिऊस हा तुरुंगाधिकारीसुद्धा ख्रिस्ती झाला.
पीटर व मार्सेलिनस ह्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तुरुंगातील कैद्यांकडून प्रतिकार होऊ नये म्हणून दोघांना सिल्वा नायाग्रा नामक जंगलात नेण्यात आले. तिथे त्यांच्या मारेकऱ्यांनी त्यांच्या खाचा आधीच तयार ठेवलेल्या होत्या. कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तींना त्यांची थडगी मिळू नयेत म्हणून त्यांना गुपचूप खाचेत लोटून देण्यात आले व त्यावर माती टाकण्यात आली. मात्र पुढे एक मजेदार गोष्ट घडून आली. ह्या दोन रक्तसाक्ष्यांच्या मारेकऱ्यांचेच परिवर्तन होऊन ते ख्रिस्ती झाले व त्यांनीच ह्या खाचा सर्व ख्रिस्ती लोकांना दाखविल्या.
पुढे लुसिला आणि फर्मिना या दोन देवभक्त स्त्रियांनी त्यांचे अवशेष व्यवस्थितपणे जतन करून व्हिया लॅव्हिकाना येथे पुरले. कॉन्स्टन्टाईन राजाच्या परिवर्तनानंतर त्याने ह्या संतांच्या थडग्यांवर महामंदिर बांधले व आपली आई संत हेलेना (सण १८ ऑगस्ट) हिला त्यामध्ये पुरले.
पहिले वाचन बेन सिरा ४४:१,९-१३
वाचक : बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन
" आमचे पूर्वज अगदी उदार माणसे होती आणि त्यांचे नाव पिढ्यान्पिढ्या अमर आहे."
आता आपण पुण्य पुरुषांची, पिढ्यान्पिढ्या होऊन गेलेल्या आपल्या पूर्वजांची स्तुती करू या. असेही लोक होऊन गेले की, ज्याचे कुणाला स्मरण देखील राहिले नाही. ते अशा तऱ्हेने नष्ट झाले की जणू काही ते झालेच नव्हते. जणू काही ते जन्मालाच आलेच नव्हते अशी त्यांची गत झाली आणि त्याच्या पश्चात त्याच्या संतानांचीदेखील तीच गत झाली, परंतु आपले पूर्वज नीतिमान पुरुष होते, त्यांच्या सत्कृत्यांचे विस्मरण कोणाला झाले नाही; त्यांचा समृद्ध वारसा त्यांच्या वंशजांना मिळाला आणि त्यांची संपत्ती त्यांच्या कुटुंबात राहिली.
त्यांचे वंशज आणि त्यांच्यामुळे त्यांची मुलेसुद्धा कराराचे पालन करीत आहेत. त्यांचा वंश नेहमी वाढत राहील आणि त्यांची कीर्ती कधी लोप पावणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १५०:१-६,९
प्रतिसाद : प्रभू आपल्या लोकांवर प्रसन्न आहे.
१) नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा,
भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्रे गा.
इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो.
सियोनची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्हास पावोत.
२) ती नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करोत,
डफ आणि वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत.
कारण प्रभू आपल्या लोकांवर संतुष्ट आहे.
तो दीनांना तारणाने सुशोभित करतो..
३ )भक्त गौरवामुळे उल्हासतो,
ते आपल्या अंथरुणांवरून हर्षघोष करोत.
परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो;
हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल.
परमेश्वराचे स्तवन करा !
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, माझे नेत्र उघड,
म्हणजे तुझ्या धर्मशास्त्रातील अलौकिक गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क ११:११-२६
वाचक : मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील. देवावर विश्वास ठेवा."
येशू येरुशलेमला आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्व काही पाहिल्यावर संध्याकाळ झाली, म्हणून तो आपल्या बारा शिष्यांसह बेथानी येथे निघून गेला.
दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पानांनी डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो त्याकडे गेला. परंतु अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता म्हणून पानांवाचून त्याला काही आढळले नाही. तेव्हा तो उद्गारला, “कोणीही ह्यापुढे तुझे फळ कधीही न खावो.” त्याचे शिष्य हे ऐकत होते.
मग ते येरुशलेमला येऊन पोहचल्यावर तो मंदिरात गेला आणि मंदिरात क्रयविक्रय करणाऱ्यांना बाहेर घालवून देऊ लागला; त्याने व्यापाऱ्यांचे चौरंग आणि कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी उलथून टाकल्या, त्याने कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरामधून ने आण करू दिली नाही. मग तो त्यांना शिक्षण देऊ लागला आणि म्हणाला, "माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील," असा शास्त्रलेख आहे ना? पंरतु तुम्ही तर ही लुटारुंची गुहा करून टाकली आहे." मुख्य याजकांनी आणि शास्त्र्यांनी हे ऐकले आणि त्याचा घात कसा करावा ह्याविषयी ते युक्ती योजू लागले. कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाल्याकारणाने ते त्याला भीत होते.
रोज ते शहराच्या बाहेर जात असत. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्रला आठवण होऊन तो येशूला म्हणाला, "गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पाहा.” येशूने त्यांना उत्तर दिले, "देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हांला नक्की सांगतो की, जो कोणी ह्या डोंगराला 'तू उपटून समुद्रात टाकला जा,' असे म्हणेल आणि आपल्या अंत:करणात शंका न बाळगता, आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दांप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हांला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरूद्ध काही असेल तर त्यांची क्षमा करा; परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: येशूचे शिष्यत्व प्राप्त करणे म्हणजे व्यापारात जशी देवाणघेवाण करतो अशातला भाग नाही. खरा ख्रिस्त हा अंजिराच्या झाडाप्रमाणे नाही की जो दुसऱ्यांची भूक मिटवू शकत नाही. तर जो देवशब्दात आतापर्यंत रुजलेला व सर्वकाळात सतत फळ देणारा असावा. असा शिष्य काही मागण्यापूर्वीच गुरूला आनंद देत असतो. जर आपल्याला असे काही अनुभव आले असतील तर आपण येशूचे आभार मानूया व त्यांच्यावर आपला विश्वास ठेवूया. भजन व गीते गाऊन त्याची स्तुती करुया. आज आपल्या प्रभूसाठी एक गाणे आनंदाने गाऊया.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या प्रार्थना घराचा योग्यतो सन्मान करुन विश्वासाने जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या