सामान्यकाळातील ९वा सप्ताह
बुधवार ७ जुन २०२३
मेलेल्यातून उठल्यानंतर कोणी लग्न करून घेत नाहीत किंवा लग्न करून देतही नाहीत, तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात
✝️
' पुनरुत्थित प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याऱ्या सर्वांचे पुनरुत्थान आहे. मात्र त्या समयी ऐहिक जगातील नाते संबंध संपूष्टात आलेले असतील व सर्वजण जणू स्वर्गीय देवदूतासारखे असणार आहेत. मृत्यु हा जीवनाचा शेवट नाही तर मृत्यु नंतर नवीन जीवनाला सुरुवात होते. पुनरुत्थान हे ख्रिस्ती श्रद्धेचा मूळ पाया व आधारस्तंभ आहे. म्हणून प्रभू येशू म्हणत आहे, 'तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे'.
पहिले वाचन तोबीत ३:१-११,१६-१७
वाचक : तोबीत या पुस्तकातून घेतलेले वाचन
“थोर देवाच्या गौरवाच्या सान्निध्यात दोघांची प्रार्थना ऐकली गेली. "
माझ्या दुःखामध्ये मी तोबीत रडलो आणि देवाकडे क्लेशाने प्रार्थना केली की, “हे देवा, तू न्यायी आहेस. तुझी सर्व कृत्ये आणि तुझे सर्व मार्ग दयामय आणि सत्य आहेत आणि तू सदोदित सत्य आणि न्यायी निर्णय दृष्टीने पहा. माझ्या पापांबद्दल मला शिक्षा करू नकोस, माझ्या आणि माझ्या पूर्वजांकडून नकळत घडलेल्या अपराधांबद्दल आम्हाला क्षमा कर. त्यांनी तुझा आज्ञाभंग केल्यामुळे तू त्यांना लुटारू, बंदिवास आणि मृत्यू ह्यांच्या हाती सोपवलेस. ज्या राष्ट्रात तू आम्हाला पांगवलेले आहेस तेथे आम्ही अपमानित झालो आहोत आणि आता माझ्या आणि माझ्या पूर्वजांच्या पापांकरता केलेल्या दुःखदायक दंडाबद्दल तू दिलेले अनेक निर्णय सत्य आहेत. कारण आम्ही इमानदारीने चाललो नाही आणि आता तुझ्या इच्छेप्रमाणे तू माझ्याशी वर्तन कर. तू माझ्या आत्म्याला वर नेण्याची आज्ञा कर, म्हणजे मी तुझ्यापासून वेगळा होऊन मातीमोल होईन. माझ्यासाठी जिण्यावाचून मरणच चांगले आहे, कारण मी खोट्या लज्जास्पद गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि माझे अंतःकरण फार मोठ्या वेदनेने भरलेले आहे. आता अशी आज्ञा कर की, मी माझ्या सर्व विपत्तीतून सुटला जाऊन सार्वकालिक निवासस्थानी जावे; माझ्यापासून तुझा चेहरा लपवू नकोस.
त्याच दिवशी, मेदीया येथील एकबाटना येथे असे घडले की, रागुवेलची मुलगी सारा हिला तिच्या वडिलांच्या सेवकांनी दोष लावला, कारण तिच्या सात नवऱ्यांना असमोदीस या क्रूर सैतानाने, ती त्यांच्याजवळ पत्नी म्हणून नांदायला येण्यापूर्वी जिवे मारले. मग सेवक तिला म्हणाले की, “तू तुझ्या नवऱ्यांना गळे दाबून मारले हे तुला ठाऊक नाही का? तुला सात नवरे असताना त्यांपासून तुला संतती झाली नाही. तू आम्हाला का छळतेस ? जर ते मेले असतील तर त्यांच्याबरोबर जा. की ज्यामुळे तुझा पुत्र किंवा कन्या आमच्या दृष्टीस पडणार नाहीत!"ह्या गोष्टी ऐकून तिला खूप दुःख झाले आणि तिच्या मनात आत्महत्येचा विचार देखील आला. परंतु ती म्हणाली, "मी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, जर मी का आत्महत्या केली तर माझ्या वडिलांची अब्रू जाईल आणि म्हातारपणात ते दु:खाने मरतील." म्हणून ती आपल्या खिडकीपाशी जाऊन प्रार्थना करू लागली की, “हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू धन्य आहेस, तुझ्या पवित्र आणि आदरणीय नावाला सदासर्वदा धन्यवाद असो. तुझी सर्व कृत्ये सदासर्वदा तुझा महिमा गावोत. "
थोर देवाच्या गौरवाच्या सान्निध्यात दोघांची प्रार्थना ऐकली गेली आणि राफायल देवदूतांला दोघांना बरे करण्यास पाठवण्यात आले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र २५:१- ९
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावतो.
१) हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे,
माझी फजिती होऊ देऊ नकोस;
माझ्या वैच्यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस.
तुझी कास धरणारा कोणीही फजीत होत नाही,
निष्कारण कपट करणारे फजीत होतात.
२) हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव,
तुझ्या वाटा मला प्रकट कर.
तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव
मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस.
३) हे प्रभो, तुझ्या चांगुलपणास्तव साऱ्या दिवसभर
मी तुझी प्रतीक्षा करतो. हे परमेश्वरा,
तू आपला कळवळा आणि वात्सल्य आठव,
ती पुरातन काळापासून आहेत.
हे परमेश्वरा, माझी तारुण्यातील पापे
आणि माझे अपराध आठवू नकोस.
तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर.
४) परमेश्वर उत्तम आणि सरळ आहे.
तो पापी जनांना सन्मार्ग दाखवतो.
तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो;
तो दीनांना आपला मार्ग शिकवतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, तुझ्या नियमाने चालण्यास मला शिकव,
ते मनापासून पाळण्यास मला सुबुद्धी दे.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क १२:१८-२७
वाचक : मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन“
"तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे."
पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदूकी येशूकडे आले आणि ते त्याला विचारू लागले, “गुरुजी, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, कोणा एकाचा भाऊ मेला आणि त्याची बायको मागे राहिली आणि त्याला मूलबाळ झालेले नसेल तर त्याच्या भावाने त्या बायकोबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. कोणी सात भाऊ होते, त्यांच्यापैकी पहिल्या भावाने बायको केली आणि तो संतती न होता मेला. मग ती दुसऱ्याने केली तोही संतती न होता मेला आणि तशीच तिसऱ्याचीही गोष्ट झाली. ह्याप्रमाणे सातही जण संतती न होता मेले. सर्वांच्या शेवटी बायकोही मेली. तर पुनरुत्थानसमयी ते उठतील तेव्हा ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिला बायको करून घेतले होते.”येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्र आणि देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहा ना ? कारण मेलेल्यातून उठल्यानंतर कोणी लग्न करून घेत नाहीत किंवा लग्न करून देतही नाहीत, तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात. पण मेलेल्यांविषयी सांगावयाचे म्हणजे ते उठवले जातात ह्या मुद्यावर मोशेच्या ग्रंथात झुडुपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय की, देवाने मोशेला म्हटले, 'मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव आहे ? तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे; तुमचे अगदीच चुकत आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: शुभवर्तमानात सदुकी आणि येशू यांच्यात संघर्ष पाहात आहोत. येथे मुख्य विषय आहे धार्मिक विश्वासाबद्दल. एका बाजूला पुनरुत्थान व दुसऱ्या बाजूला मरणानंतरचे जीवन असा हा संघर्ष आहे. सदुकी मरणांतरच्या जीवनावर विश्वास ठेवित नाही. म्हणजेच त्यांच्यासाठी पुनरुत्थानाचा विषयच येत नाही, म्हणून ते येशूला प्रश्न करतात. असे केल्याने “मी पुनरुत्थान व जीवन आहे” अशी घोषणा करणाऱ्या येशूला नाकारले. आपल्या जीवनात देखील बऱ्याचवेळा आपण देखील मरणानंतरचे जीवन ते काय आणि कसे याबद्दल बोलण्यात गुंततो. याचा परिणाम आपण देखील सदुकी लोकांप्रमाणे उत्तरे देण्यात गुंततो. पृथ्वीवरील जीवन व स्वर्गीय जीवन हे सारखे नाही. आजच्या शुभवर्तमानात याची पूर्वकल्पना आपल्याला दिलेली आहे. आजच्या पहिल्या वाचनात तोबीत आणि सारा देवाला सांगतात की, आम्हाला मरण द्या म्हणजे या दुःखाचा अंत होईल. आम्हाला शिकवितो की, आपण पृथ्वीवर असताना असे जीवन जगा की, स्वर्गीय जीवनात त्याचा आपल्याला लाभ होईल. म्हणजे एका अर्थाने प्रभू आपल्याला तयार करण्याचे आमंत्रण देत आहे.
प्रार्थना : हे पुरुत्थित प्रभू, तुझ्या सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास आम्ही पात्र बनावेत म्हणून तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा व सामर्थ्य दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या