सामान्यकाळातील ९वा सप्ताह
मंगळवार ६ जुन २०२३
"कैसरचे ते कैसरला आणि देवाचे ते देवाला भरून द्या."
✝️
संत नॉर्बर्ट
- महागुरु, वर्तनसाक्षी , (१०८०-११३४)
चिंतन : संत नॉबर्ट हे एक उत्तम प्रवचनकार होते. प्रभुशब्दावर सखोल मननचिंतन करून ते प्रभावी असे प्रवचन देत असत. भारदस्त आवाज, सद्विचारांची पखरण, चांगुलपणाविषयी तळमळ व ज्ञान संपन्नता ही त्यांच्या प्रवचनांची खास वैशिष्ट्यह्य होती.
रोमी नाण्यावर कैसराची प्रतिमा होती म्हणून ते कैसराला देणे रास्त आहे. तर प्रत्येक मनुष्य देवाची प्रतिमा आहे. म्हणून प्रत्येक माणसाने देवासारखे होणे गरजेचे आहे. त्यासाठी देवाचे ते देवाला द्यायचे आहे. भक्ती, आज्ञाधारकपणा, प्रीति, परस्पर स्नेह भाव हे देवाकडून आले आहे, ते देवाला देणे गरजेचे आहे. देवाला आपल्याकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा आहे ह्यावर आज मनापासून चिंतन करु या. देवाचे ते देवाला भरुन दिल्यावर आपल्या जीवनातील सर्व गोष्टी स्थिरावतील.
पहिले वाचन तोबीत २:९-१४
वाचक : तोबीत या पुस्तकातून घेतलेले वाचन
"आंधळा झाला असतादेखील तोबीतने देवाविरुद्ध कुरकुर केली नाही."
मी, तोबीत आपल्या लोकांपैकी एकाचे मृत शरीर पुरून आलेलो असता फार थकलो होतो, म्हणून मी अंगणातील भिंतीशी टेकून झोपी गेलो. माझा चेहरा झाकलेला नव्हता. त्या भिंतीवर चिमण्या होत्या हे मला माहीत नव्हते. त्यांची ताजी विष्ठा माझ्या उघड्या डोळ्यांत पडली आणि सफेद पडदा माझ्या डोळ्यांवर आला. मी वैद्यांकडे गेलो, परंतु त्यांनी कोणताच उपचार केला नाही. अहेकारने एलेमास जाईपर्यंत माझी काळजी घेतली.
नंतर माझी बायको अन्ना नोकरी करू लागली. ती सर्व उत्पन्न आपल्या मालकाला पाठवत असे. एकदा त्यांनी एका लहानशा पिल्लासहित तिची मजुरी दिली असता, तिने ते पिल्लू माझ्याकडे आणले, ते आवाज करू लागले. मी म्हणालो, “तू हे पिल्लू कुठून आणले? हे चोरून तर आणले नाही ना ? ते त्याच्या मालकाला नेऊन दे. कारण जे चोरीचे असते ते खाण्यास योग्य नसते” आणि ती म्हणाली, " हे मला माझ्या मालकाने मजुरीसह बक्षीसादाखल दिलेले आहे.” पण मी तिच्यावर विश्वास न ठेवता तिला ते मालकाला परत करण्यास सांगितले आणि मी तिच्यावर गरम झालो. तेव्हा तिने मला उत्तर दिले, “तुझे परोपकार आणि धार्मिक कृत्ये कुठे आहेत? जसे काय तुला सगळेच माहीत आहे!”
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११२:१-२, ७- ९
प्रतिसाद : ज्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवते तो अढळ राहतो.
१ ) परमेश्वराचे स्तवन करा.
जो मनुष्य परमेश्वराचे भय बाळगतो
आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे
तो धन्य! त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल,
सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल.
२) तो वाईट बातमीला भिणार नाही,
त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते.
त्याचे मन स्थिर असते,
आपल्या शत्रूंची गत आपल्या इच्छेप्रमाणे
झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही.
३) त्याने सढळ हाताने गरिबांस दान दिले आहे.
त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील.
त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुझ्या आदेशांचे मार्ग मला समजावून दे,
म्हणजे मी तुझ्या अलौकिक कृत्यांचे मनन करीन.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क १२:१३-१७
वाचक : मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन“
"कैसरचे ते कैसरला आणि देवाचे ते देवाला भरून द्या.
प्रमुख याजक, शास्त्री आणि वडीलजन ह्यांनी येशूला बोलण्यात धरण्याकरता परुशी आणि हेरोदी ह्यांतील काहींना त्याच्याकडे पाठवले. ते येऊन त्याला म्हणाले, “गुरुजी, आपण खरे आहा आणि कोणाची भीडमुर्वत धरत नाही, आपण माणसांचे तोंड पाहून बोलत नसता, तर देवाचा मार्ग सात्त्विक भावाने शिकवत असता, हे आम्हाला ठाऊक आहे. कैसरला कर देणे रास्त आहे की नाही? आम्ही तो द्यावा की देऊ नये?" पण तो त्यांचे ढोंग ओळखून त्यांना म्हणाला, “माझी अशी परीक्षा का पाहता? एक नाणे घेऊन या, मला ते पाहू द्या." त्यांनी ते आणले तेव्हा त्याने त्यांना विचारले, "हा मुखवटा आणि हा लेख कोणाचा ?” ते त्याला म्हणाले, “कैसरचा.” येशू त्यांना म्हणाला, "कैसरचे ते कैसरला आणि देवाचे ते देवाला भरून द्या." तेव्हा त्यांना त्याच्याविषयी फार आश्चर्य वाटले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजच्या शुभवर्तमानात राजकिय अधिकारी (पृथ्वीवरील राजा) आणि दैवी अधिकारी (राजाचा राजा) येशू यामधील संघर्ष पाहतो. प्रश्न आहे निष्ठावान नागरीक की शिष्य. बऱ्याचवेळी आपल्याला देखील अशा पेच-प्रसंगाला सामोरे जावे लागते. एक दिनार उत्पादन करून परुशी व हेरोदियन लोकांनी दैवी अधिकार नाकारला. त्यांनी खरा “देवाचा पुत्र” नाकारला. कारण सम्राट म्हणून त्यांनी ज्याची प्रतिमा सम्राट “देवाचा पुत्र” असल्याची शिलालेखावर नाण्यावर कोरलेली आहे. जे नको होते, निषिद्ध मानले होते त्याला त्यांनी पसंती दर्शविली. कधी-कधी निष्ठेच्या बाबतीत आपण देखील अडकतो. आपण स्वतःला विचारूया, आपल्या हृदयावर कोणाची प्रतिमा कोरली आहे ? आपण पृथ्वीवरील आणि स्वर्गीय अशा दोन्ही राज्याचे चांगले नागरीक होण्यास शिकले पाहिजे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, माझे जीवन मी तुला समर्पित करतो, माझ्याद्वारे तुझी, सेवा करायास मला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या