Marathi Bible Reading | 9th week in ordinary Time| Monday 5th June 2023

 सामान्यकाळातील ९वा सप्ताह 

सोमवार ५ जुन २०२३ 

 जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला.  
✝️



संत बॉनिफस
- महागुरु, रक्तसाक्षी, (६७३-७५५)

संत बॉनिफेस ह्यांना “जर्मनीचा पॉल” अशा नावाने संबोधिले जाते. तो 'शिंप्यांचा आश्रयदाता संत' मानला जातो.

आपण मुक्या कुत्र्यांप्रमाणे नसावे. लांडग्याला पाहून पळणाऱ्या भेकडा प्रमाणेही नसावे तर अहोरात्र जागृत राहून चातुर्याने सैतानापासून आपला बचाव करीत रहावे.-संत बॉनिफेस

पहिले वाचन तोबीत  ८:४१-४३ 
वाचक : तोबीत या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 "तोबीत, राजापेक्षा परमेश्वराला अधिक भीत होता. "

तोबीतची कृत्ये हे पुस्तक लिहीणारा तोबीएलचा पुत्र अस्सिएल या कुळातील आणि नेफताल या टोळीतील होता. ज्याला अस्सिरियाचा राजा शलमनेस्सर याच्या काळात थिस्वे शहर इथे बंदिवासात ठेवले होते, ते शहर गालिलीयामध्ये अशरच्या वर कादेराच्या दक्षिणेस, नफताली इथे आहे. पवित्र आत्म्याच्या आगमनाचा जो सात आठवड्यांचा धार्मिक उत्सव असे, त्या सणानिमित्त माझ्यासाठी जेवण तयार केले असता मी जेवायला बसलो होतो. जेवणासाठी जास्त आहे असे दिसताच मी माझ्या मुलाला सांगितले, “जा आणि आपल्या वंशातील जेवढे गरीब बंधू, जे परमेश्वराला विसरत नाहीत अशांना घेऊन ये आणि तू येईपर्यंत मी इथे थांबतो." परंतु तो येऊन म्हणाला, "बाबा, आपल्यापैकी एकाला गळा दाबून मारले आणि बाजाराच्या जागेत फेकून दिले आहे." म्हणून मी काही खाण्याअगोदर त्या जागी उडी घेतली, ते शरीर काढले आणि सूर्यास्त होईपर्यंत ते मी एका सुरक्षित जागेत ठेवले आणि मी परतलो, मग हातपाय धुऊन दुःखी अवस्थेत ते जेवण केले. "तुमच्या सणांचा आनंद दुःखात मिळेल आणि सर्व मौजेचा शोकान्त होईल" असे आमोसने भविष्य सांगितले होते त्यांची मला आठवण झाली आणि मी रडलो..जेव्हा सूर्यास्त झाला तेव्हा मी जाऊन खड्डा खोदला आणि ते मृत शरीर पुरून घेतले. माझे शेजारी मला हसले आणि म्हणाले, “स्वतःला मारतील ह्याची भीती न बाळगता तो हेच काम करत आहे. एकदा तो पळून गेला आणि आता येथे तो पुन्हा मेलेल्यांना पुरू लागला आहे.”
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ११२: १-६
प्रतिसाद : जो मनुष्य परमेश्वराचे भय बाळगतो तो धन्य !

१ परमेश्वराचे स्तवन करा. 
जो मनुष्य परमेश्वराचे भय बाळगतो 
आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य ! 
त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, 
सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल.

२ धनसंपदा त्याच्या घरी असते, 
त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ टिकते. 
सरळ जनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो;
 त्याच्या ठायी कृपा, दया आणि न्याय ही आहेत.

३ जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो 
त्याचे कल्याण होते,
तो न्यायाने आपले व्यवसाय करील. 
तो कधीही ढळणार नाही;
नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
हे प्रभो, तू माझे नेत्र उघड, म्हणजे 
तुझ्या नियमशास्त्रातील अलौकिक
 गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
आलेलुया!

शुभवर्तमान  मार्क १२:१-१२

वाचक : मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन“

त्याने त्या प्रिय आवडत्या मुलाला धरून जिवे मारलेआणि द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले."येशू दाखले देऊन परुश्यांबरोबर बोलू लागला, “

एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, द्राक्षरसासाठी कुंड खणले, माळा बांधला आणि तो द्राक्षमळा माळ्यांना खंडाने देऊन आपण परदेशी निघून गेला. पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला माळ्यांकडून द्राक्षमळ्याच्या फळातून काही मिळावे म्हणून त्याने माळ्यांकडे एका नोकराला पाठवले. त्याला त्यांनी धरून मारहाण केली आणि रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने दुसऱ्या एका नोकराला त्याच्याकडे पाठवले, त्याचे तर डोके फोडून त्यांनी त्याचा अपमान केला. त्याने आणखी एकाला पाठवले, त्याला तर त्यांनी जिवे मारले आणि दुसऱ्या अनेकांना तसेच केले. म्हणजे त्यातून कित्येकांना त्यांनी मारहाण केली आणि कित्येकांचा जीव घेतला. अद्यापि त्याच्याजवळ एकजण ठरला होता, तो म्हणजे त्याचा प्रिय आवडता मुलगा. 'आपल्या मुलाची तरी ते भीड धरतील' असे म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठवले. परंतु ते माळी आपसांत म्हणाले, 'हा वारस आहे. चला, आपण ह्याला मारून टाकू, म्हणजे वतन आपले होईल.' मग त्यांनी त्याला धरून जिवे मारले आणि द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील बरे? तो येऊन त्या माळ्यांचा समूळ नाश करील आणि द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल. तुम्ही हा शास्त्रलेखही वाचला नाही काय की 'जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे."

तेव्हा ते त्याला धरायला पाहू लागले, परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली. कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले. मग ते त्याला सोडून निघून गेले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन: सामान्यकाळातील ९व्या आठवड्यातील वाचने (शुभवर्तमाने) दोन गटात संघर्षाची असणार आहेत. एका बाजूला शास्त्री, परुशी, वडिल वर्ग, मुख्य याजक हे जे मानवी अधिकाराचे नेतृत्व करतील तर दुसऱ्या बाजूला येशू हा दैवी अधिकाराने बोलताना दिसेल. पहिल्या वाचनात तोबित एक साधा माणूस प्रभूच्या मार्गाने चालतो व चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आजच्या शुभवर्तमानात येशू सरळपणे यहुदी अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थितीत करून त्यांच्यावर हल्ला करीत आहे. येशूचे विरोधक दैवी अधिकाराचा निषेध (विरोध) करतात. मालकाला त्याचा योग्य हिस्सा देण्यास नकार देऊन, भाडेकरूंनी स्वतःला बलाढ्य मालकाच्या विरोधात उभे केले आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपणही भाडेकरूंच्या मार्गावर जाण्याची प्रवृत्ती धारण करतो. अगदी थोड्या फायद्यासाठी मोठी गोष्ट गमावून बसतो. आपण विनाशाच्या वाटेवर चालत आहोत का ? दैवी अधिकार नाकारत आहोत का ? तोबित आपले सर्वस्व सोडतो व अनोळखी व्यक्तींची सेवा करतो. आपण भाडेकरूचे नेतृत्व करीत आहोत की तोबितप्रमाणे जीवन जगत आहोत ?

प्रार्थना :  हे प्रभू येशू, आमच्यातील दुष्ट प्रवृत्ती घालवून लाव आणि आम्हाला तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास कृपा दे, आमेन.
                 

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या