पवित्र त्रैक्याचा सण
रविवार
४ जून २०२३
“देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला,
पिता परमेश्वर पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ह्या त्रैक्यावर आपले जीवन उभारलेले आहे. ख्रिस्तसभा आज ह्याच महान रहस्य असलेल्या पवित्र त्रैक्याचा! सोहळा साजरा करीत आहे. ख्रिस्ती श्रद्धेचा गाभा असलेले पवित्र त्रैक्य आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. परमपित्याची तारणदायी योजना म्हणजेच मानवावरील बिनशर्त प्रेम. प्रभू येशू ख्रिस्ताच्या समर्पणामुळे मिळालेली कृपा अखंडितपणे सर्वांना प्राप्त व्हावी व ख्रिस्तसभेचे पवित्रीकरण व्हावे म्हणून पवित्र आत्म्याची सहभागिता आवश्यक आहे. आज सर्वत्र पवित्र आत्म्याद्वारे देवाचे महान कार्य सुरू आहे. पवित्र त्रैक्यानेच आपल्या प्रार्थनेची व उपासनेची सुरूवात आपण करीत असतो. पवित्र त्रैक्यातील ऐक्य अनुभवण्यासाठी आपणा प्रत्येकाने शांतपणाने आराधना करायला हवी.
संत पौलाने म्हटले आहे, 'प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवपित्याची प्रीति आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वासह असो' (२ करिंथ १ ३ : १४). ह्या पवित्र त्रैक्यावरील आपली श्रद्धा वृद्धिंगत व्हावी म्हणून परस्परांसाठी प्रार्थना करू या.
पहिले वाचन निर्गम ३४:४-६, ८, ९
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
"परमेश्वर, परमेश्वर, दयाळू आणि कृपाळू देव."
मोशेने सकाळीच उठून दोन दगडी पाट्या आपल्या हातात घेतल्या आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सिनाय पर्वतावर चढून गेला. तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला आणि तेथे त्याच्यापाशी उभा राहिला. परमेश्वराने त्याच्यासमोरून जाताना अशी घोषणा केली : “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू आणि कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर. ' तेव्हा मोशेने त्वरा करून भूमीपर्यंत लवून नमन केले आणि तो म्हणाला, “हे प्रभू, तुझी माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर प्रभूने आमच्याबरोबर चालावे. ते लोख ताठ मानेचे आहेत हे खरे, तरी आमचा अन्याय आणि पाप ह्यांची क्षमा कर आणि आम्हांला आपले वतन समजून आमचा अंगिकार कर.' "
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र दानिएल ३:५२-५६
प्रतिसाद : सर्वकाळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे.
१. हे प्रभो, आमच्या पूर्वजांच्या देवा, तू धन्य आहेस.
सर्वकाळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे.
तुझे वैभवशाली आणि पवित्र नाव धन्य.
त्याची मोठी स्तुती आणि सर्वकाळ प्रशंसा होवा
२. तुझ्या पवित्र वैभवाच्या मंदिरामध्ये तू धन्य.
त्याची वाखाणणी होवो, त्याचे सर्वकाळ पसरो
३. तुझ्या राज्याच्या सिंहासनारूढ असणाऱ्या, तू धन्य.
तुझी वाखाणणी आणि सर्वकाळ प्रशंसा होवो.
४. गर्तेतही दृष्टी टाकणाऱ्या, तू धन्य.
तुझी स्तुती आणि सर्वकाळ प्रशंसा होवो.
५. आकाशमंडलातील तू धन्य.
सर्वकाळ तुझी गीते गाईली जावोत आणि प्रशंसा होवो.
दुसरे वाचन : २ करिंथ१३:११-१३
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र
आत्म्याची सहभागिता. ' बंधुजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो, तुम्हांला पूर्णता लाभो, समाधान मिळो, तुम्ही एकचित्त व्हा, शांतीने राहा म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हांबरोबर राहील. पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करा. सर्व पवित्र जन तुम्हांला सलाम सांगतात.
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू देव जो आहे, जो होता आणि जो येणार आहे,
त्या पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो
आलेलुया!
शुभवर्तमान योहान ३:१६-१८
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"देवाने आपला पुत्र जगात अशासाठी पाठवला की, त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे. "
येशू निकदेमला म्हणाला, “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: प्रेम हा पवित्र त्रैक्याचा मुख्य गाभा होय. परमेश्वरपित्याने केवळ प्रेमापोटी मानवाला उत्पन्न केले. मानवावरील प्रेमापोटी त्याच्या पापांची क्षमा देण्यासाठी देवपुत्राने क्रुसावर आपले रक्त सांडले. प्रेम हे पवित्र आत्म्याचे प्रथम फळ आहे. संत ग्रेगरी म्हणतात, “जुना करार हा देवपित्याचा काळ, नवा करार हा देवपुत्राचा काळ तर आधुनिक काळ हा पवित्र आत्म्याचा काळ आहे.” ह्या तिन्ही त्रिकाळ परमेश्वराचे प्रेम अखंडितपणे वाहात आहे. आजची वाचने त्याच प्रेमाचे अनेकविध पैलू उलगडून सांगणारी आहेत.
अ. प्रेम हे त्रैक्यस्वरूप परमेश्वराचे अंगभूत वैशिष्ट्य आहे : खरे पाहता, मोशे परमेश्वराशी समोरासमोर कित्येकदा बोलला होता. त्यातून परमेश्वराला प्रथम डोळ्यांनी पाहण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. आजच्या पहिल्या वाचनात (निर्गम ३४:४ब ६, ८, ९) परमेश्वर स्वतःचे रूप प्रकट करताना म्हणतो, “परमेश्वर, परमेश्वर दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर. ”
ब. त्रैक्यस्वरूप परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारा समुदाय प्रीतीत मुळावलेला असतो : आजच्या दुसऱ्या वाचनात (२करिंथ १३:११-१३) संत पौल करिंथच्या लोकांना परस्परांशी प्रेमाने व शांतीने राहण्याचे आवाहन करतो. पवित्र त्रैक्यासाठी ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे त्यांचा मिळून जो समुदाय बनतो तो देवाच्या प्रेमात, येशूच्या कृपेत आणि पवित्र आत्म्याच्या एकोप्यात वाढत राहावा अशी मनोकामना संत पौल व्यक्त करतो.
क. प्रेम हे त्रैक्यस्वरूप परमेश्वराचे प्रभावी भावचिन्ह आहे : शुभवर्तमानात (योहान ३:१६-१८) येशूच्या मुखातील सर्वात लोकप्रिय वचन देण्यात आलेले आहे.(देवाने जगावर एवढी प्रीती केली की..."). मात्र देव हे प्रेम कोणावरही लादत नाही. “जो त्याच्यावर श्रद्धा ठेवतो...” ह्या शब्दांत मानवाचे व्यक्तिस्वातंत्र्य दडलेले आहे. श्रद्धा हा देवाच्या प्रेमाला दिलेला मनमोकळा प्रतिसाद असतो.
आत्मपरीक्षण : देवाच्या प्रेमाचा कोणता पैलू मी वारंवार अनुभवतो ? कोणता पैलू अनुभवण्यात अडचणी आहेत ?
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुझे प्रेम, तुझी दया व कृपा अनुभवण्यास व विश्वासाने तुजसमोर येण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या