सामान्य काळातील ७वा सप्ताह
सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५
जेव्हा येशू, पेत्र, याकोब आणि योहान यांच्यासमवेत शिष्यांजवळ आला तेव्हा त्यांच्याभोवती लोकसमुदाय आहे आणि त्यांच्याबरोबर शास्त्री वादविवाद करीत आहेत असे त्यांना दिसून आले. येशूला पाहताच सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला प्रणाम केला. त्याने त्यांना विचारले, “ह्यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे ?” तेव्हा समुदायातील एकाने उत्तर दिले, “गुरुजी, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो, ह्याला मुका आत्मा लागला आहे. तो जेथे जेथे ह्याला धरतो तेथे तेथे तो त्याला खाली आपटतो, मग हा तोंडाला फेस आणून कडकडा दात खातो आणि निपचित पडतो. त्याला बरे करावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतु त्यांना तो बरे करता येईना." ह्यावर तो म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर राहू ? कोठवर तुम्हाला वागवून घेऊ? त्याला माझ्याकडे आणा." त्यांनी त्याला त्याच्याजवळ आणले, तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच त्या मुलाला पिळून टाकले आणि तो मुलगा जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, “ह्याला असे होऊन किती काळ लोटला ?” तो म्हणाला, “बाळपणापासून. ह्याचा नाश करावा म्हणून त्याने ह्याला पुष्कळदा विस्तवात आणि पाण्यात टाकले, आपल्या हातून बरे काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा आणि आम्हाला साहाय्य करा.” येशू त्याला म्हणाला, “शक्य असेल तर असे कसे म्हणतोस ? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे.' लगेच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, “माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका!” तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्याबहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातून नीघ आणि पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नको." तेव्हा तो आत्मा ओरडून आणि त्याला फारच पिळून निघाला आणि तो मुलगा मेल्यासारखा झाला. “तो मेला आहे." असेच बहुतेक म्हणाले, पण येशूने त्याला हाताला धरून उठवले आणि तो उभा राहिला. मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकांती विचारले, “आम्हाला तो का काढता आला नाही?” येशू त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचून दुसऱ्या कशानेही निघणार नाही. "