सामान्यकाळातील १७ वा सप्ताह
मंगळवार दिनांक २९ जुलै २०२५
ख्रिस्तसभा आज बेथानी येथल्या लाझरस आणि मरिया ह्यांची बहीण मार्था हिचा सण साजरा करीत आहे. यहुदियात असताना आपला प्रभू येशू ख्रिस्त मार्थाच्या घरी पाहुणा म्हणून उतरला. मार्थाने त्याचे आपल्या घरी स्वागत केले इतकेच नव्हे तर त्याच्या स्वागताची व्यवस्थित तयारी व्हावी म्हणून ती दिवाणखान्यात पुष्कळ गोष्टीविषयी दगदग व काळजी करीत राहिली.
मार्था, मरिया व त्यांचा भाऊ लाझरस ह्यांच्यावर येशूचे विशेष प्रेम होते. त्यामुळे लाझरस मरण पावल्यावर मार्था त्याला म्हणाली, “प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.” ख्रिस्ताच्या केवळ उपस्थितीत जीवनाचा उगम आहे हेच मार्थाने आपल्या ह्या वाक्याद्वारे दर्शविलेले आहे. पुढे मार्थाच्याच आग्रहावरून ख्रिस्ताने उच्चारलेले, 'पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे' हे वाक्य इतिहासात अजरामर झाले आहे.
यहुद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था आणि मरिया ह्यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, “प्रभुजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, "तुझा भाऊ पुन्हा उठेल." मार्था त्याला म्हणाली, “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, माझ्यावर विश्वास ठेवणारा मेला असला तरी जगेल आणि माझ्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक जिवंत मनुष्य कधीही मरणार नाही, हे तू खरे मानतेस काय ?" ती त्याला म्हणाली, “होय, प्रभुजी, जगात येणारा देवाचा पुत्र ख्रिस्त आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.