सामान्यकाळातील १९ वा सप्ताह
गुरुवार दि. १४ ऑगस्ट २०२५
येशू त्याला म्हणाला, “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा."I do not say to you seven times, but seventy times seven.
मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे ह्यांचा जन्म पोलंड देशात ८ जाने. १८९४ रोजी झाला. आपल्या तारुण्यावस्थेतच तो 'फ्रायर्स मायनर कन्व्हेंच्युयल्स' नावाच्या एका व्रतस्थ धार्मिक संस्थेत दाखल झाला आणि इ.स. १९१८ साली रोम शहरात त्याला धर्मगुरुपदाची दीक्षा देण्यात आली.
फा. मॅक्सिमिलियन ह्यांचे धन्य कुमारी देवमाता मरिया हिच्यावर विशेष प्रेम होते. त्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या धर्मग्रामात 'निष्कलंक मरियेची फौज' (आर्मी ऑफ इमॅक्युलेट मेरी) नावाची संघटना सुरू केली. लवकरच या संघटनेचा प्रसार संपूर्ण पोलंड देशात आणि इतर देशांमध्ये झाला..
फा. मॅक्सिमिलियन पुढे जपान देशात मिशनरी म्हणून गेले तेथे त्यांनी धन्य कुमारी निष्कलंक मरिया हिच्या आश्रयाखाली आणि मार्गदर्शनाने ख्रिस्ती श्रद्धेचा प्रसार करण्यास सुरुवात केली. तेथून परतल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना 'कॉन्सेंट्रेशन कॅम्प'मध्ये बराच काळ पुष्कळ हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्याचवेळी एका प्रापंचिक गृहस्थाला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली होती. त्याला कुटुंब होते, बायकोमुले होती. फा. कोल्बे क्षणार्धात पुढे झाले. त्यांनी म्हटले, 'मी पोलंड देशातील एक कॅथलिक धर्मगुरू आहे. या माणसाला कुटुंब आहे. त्याला मुक्त करा. त्याच्या जागी मला ठार करा.' अशाप्रकारे आपल्या प्रभूच्या शिकवणुकीनुसार शेजारप्रीतीपायी त्यांनी आपला स्वतःचा प्राण दिला.
१४ ऑगस्ट १९४१ रोजी मरण पावलेल्या फा. मॅक्सिमिलियन कोल्बे ह्यांना पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी १० ऑक्टोबर १९८२ रोजी संतपदाचा बहुमान दिला.
चिंतन : जितक्या प्रमाणात आपण आत्म्याचे तारण करण्यासाठी धडपडू तितक्या प्रमाणात आपले पावित्र्य वाढत राहील. संत मॅक्सिमिलियन कोल्बे