4th October 2020

वाचन १ यशया ५:१-७

माझ्या मित्रासाठी (देवासाठी) गाणे गाईन. हे गाणे, माझ्या मित्राच्या द्राक्षमळ्याच्या (इस्राएलच्या) प्रेमासंबंधी असेल.माझ्या मित्राचा द्राक्षमळा अतिशय सुपीक जमिनीत होता. 
माझ्या मित्राने खणून जमीन साफसूफ केली. तिच्यामध्ये अतिशय उत्तम प्रतीच्या द्राक्षाची लागवड केली. त्याने मळ्याच्या मध्यभागी एक मनोरा बांधला. द्राक्षाचे उत्तम पीक येईल अशी त्याला आशा होती पण त्यातून निकृष्ट प्रतीचीच फळे आली. 
म्हणून देव म्हणाला, “यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनो व यहूदात राहणाऱ्या लोकांनो, माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा जरा विचार करा. 
माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी आणखी काय करू शकलो असतो? मला जे करणे शक्य होते ते सर्व मी केले मी चांगल्या पिकाची आशा केली पण पीक वाईट आले. असे का झाले? 
आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे ते तुम्हाला सांगतो.मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढून मी जाळून टाकीन. त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून दगड पायाने तुडवीन. 
मी माझा द्राक्षमळा उजाड करीन. कोणीही वेलीची काळजी घेणार नाही. कोणीही त्या मळ्यात काम करणार नाही. त्यात तण व काटेकुटे माजतील. तेथे पाऊस न पाडण्याची मी ढगांना आज्ञा करीन.” 
सर्वशक्तिमान परमेश्वराच्या मालकीचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएल हा देश होय. ज्या द्राक्षवेली परमेश्वराला प्रिय आहेत त्या म्हणजे यहुदी लोक होत.परमेश्वराने न्यायाची आशा केली पण तेथे फक्त हत्याच घडली. परमेश्वराने प्रामाणिकपणाची आशा धरली पण तेथे फक्त वाईट रितीने वागविलेल्या लोकांचे आक्रोश होते.
हा प्रभूचा शब्द आहे... 


स्तोत्र 

प्रतिसाद : परमेश्वराचा द्राक्षमाळा म्हणजे इस्रायलचे घराणे होय .

१)तू त्या “वेलीसाठी” जमीन तयार केलीस. त्या “वेलीची” मुळं जोमाने वाढावीत म्हणून प्रयत्न केलेस. थोड्याच अवधीत ती वेल सर्व देशभर पसरली. 

२)देवा, तुझ्या “वेलीचे” रक्षण करणाऱ्या भिंती तू का पाडून टाकल्यास? आता जो कोणी तिथून जातो तो तिची द्राक्षे तोडतो.रानडुकरे येऊन तुझ्या “वेलीवर” चालतात. रानटी पशू येतात आणि तिची पाने खातात. 

३)सर्वशाक्तिमान देवा, परत ये स्वर्गातून खाली तुझ्या “वेलीकडे” बघ आणि तिचे रक्षण कर.देवा, तू तुझ्या हाताने कापलेल्या’ ‘वेलीकडे” बघ. तू वाढवलेल्या तुझ्या लहान वेलाकडे बघ. 

४)तुझी “वेल” वाळलेल्या शेणाप्रामाणे (गोवरीप्रमाणे) आगीत जळून गेली तू तिच्यावर रागावला होतास आणि तू तिचा नाश केलास. सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आमच्याकडे परत ये. आमचा स्वीकार कर. आम्हाला वाचव.


वाचन फिलिप्पैकरांस ४:६-९

कशाचीही काळजी करु नका, तर प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंत्या उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा. 
जी शांति देवापासून येते, जी शांति सर्व मानवी समजबुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे अंत:करण व मन ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित ठेवील.
शेवटी, बंधूंनो, जे काही सत्य आहे, जे काही उदात्त आहे, जे काही योग्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही सुंदर आहे, जे काही प्रशंसनीय आहे, जर सदगुण आहे, आणि जर काही स्तुति आहे, या गोष्टींनी तुमची मने भरुन टाका.
जे काही तुम्ही शिकला आहात, जे तुम्हांला मिळाले आहे व जे माझ्याकडून ऐकले आहे आणि जे मी करताना तुम्ही पाहिले आहे, त्या गोष्टी करीत राहा. आणि देव जो शांतीचा उगम आहे तो तुमच्याबरोबर राहील.
हा प्रभूचा शब्द आहे... 


जयगोष                                                                       योहान  १७:१७

आलेलूया,आलेलूया !

हे प्रभो, तुझे वाचन हेच सत्य आहे,
तू आम्हाला सत्यात समर्पित कर. 

आलेलूया !


शुभवर्तमान 

मत्तय २१:३३-४३

ही बोधकथा ऐका : मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. शेताच्या भोवती त्याने एक भिंत बांधली आणि द्राक्षे कुस्करून रस गाळण्याकरिता खड्डा करून एक घाणा तयार केला. आणि टेहळाणी करण्यासाठी एक मनोरा (माळा) बांधला. मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना करायला खंडाने दिला. मग तो परत गेला.
जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही नोकर खंडकरी शेतकऱ्याकडे पाठविले.
परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या नोकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले.
मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा नोकर पाठविले. पहिल्यापेक्षा त्याने जास्त नोकर पाठविले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली.
नंतर, त्याने त्याच्या स्वत:च्या मुलाला त्यांच्याकडे पाठविले, तो म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील.’
पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले. हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्याला ठार करू व त्याचे वतन घेऊ.
त्यांनी त्याला धरले व मळ्याच्या बाहेर फेकले व त्याला ठार मारले.
मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?”
यहूदी मुख्य याजक आणि पुढारी म्हणाले, तो त्या लोकांना खात्रीने मरणदंड देईल. कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला मळा दुसऱ्यास खंडाने देईल. हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील, अशांना तो ते देईल.”
येशू त्यांना म्हणाला, तुम्ही पवित्र शास्त्रात वाचले असलेच की.‘बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे हे प्रभूने केले आणि आमच्यासाठी हे अदभुत आहे.’
म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल. देवाला आपल्या राज्यात पाहिजेत अशा गोष्टी जे लोक करतील, त्यांना ते देण्यात येईल.

प्रभूचे हे शुभवर्तमान 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या