Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | 9th November 2020

सामान्य काळातील

बत्तिसावा सप्ताह 

लॅटरन महामंदिराचे समर्पण 

सोमवार 

९ नोव्हेंबर २०२० 

"तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसात ते उभारीन." 

"मंदिर हे देवाचे वस्तीस्थान आहे, त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या उपासना, भक्ती आणि प्रार्थना करण्यासाठी प्रेरणा मिळत असते. म्हणूनच देवाचे! मंदिर पवित्र असते. अशा पवित्र स्थळी प्रत्येक माणसाने आदराने व सन्मानाने त्या मंदिरात प्रवेश करायला हवा. तिथे शांततामय प्रार्थनेचे वातावरण असायला हवे."

पहिले वाचन : यहेज्केल ४७:१-९.१२

वाचक :  यहेज्केल यातून घेतलेले वाचन.

देवदूताने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले, तो पाहा, मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता; मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. त्याने मला उत्तरद्वाराच्या वाटेने बाहेर नेले व बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरवून बाहेरल्या द्वाराकडे म्हणजे पूर्वाभिमूख असलेल्या द्वाराकडे नेले, तो पाहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत होते. मग तो पुरुष सर्व दिशेस चालला व त्याच्या हाती मापनसूत्र होते; त्याने एक हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालावयास सांगितले, तो तेथे पाणी घोट्यापर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालाव्यास सांगितले, तो तेथे पाणी कमरेपर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापले, तो त्या नदीतून माझ्याने चालवेना, कारण पाणी फार झाले; मला त्यातून पोहून जाता आहे असते; उतरून जाता आले नसते, एवढी ती नदी झाली. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहिले ना?" मग त्याने मला नदीतीराने माधारी नेले. परत येत असता नदीच्या दोन्ही तीरांवर बहुत झाडे असलेली मी पाहिली. तो मला म्हणाला, "हे पाणी पूर्वप्रदेशांकडे वाहत जाते आणि तेथून अराबात उतरून समुद्राकडे जाते; ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. ही महानदी जाईल तेथेतेथे तीत जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व तीत मासे विपुले होतील; कारण जेथेजेथे हे पाणी जाईल तेथेतेथे सर्व काही निरोगी होईल; जेथेजेथे ही नदी जाईल तेथेतेथे सर्व प्राणी जिवंत राहतील. नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हरत-हेची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत; त्यांच्या फळांचा बहर खुंटणार नाही; प्रतिमासी ती पक्क फळे देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्रस्थानातून निघाले आहे. त्या वृक्षांची फळे खाण्याजोगी व त्यांची पाने औषधी होतील."

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र ४६: २- ३, ५- ६

प्रतिसाद : नदीचे पाणी देवाच्या पवित्र निवासस्थानाला आनंदमय करते.


१)देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो . म्हणून पृथ्वी उलथीपालथी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले, सागराच्या लाटा गर्जून उसळल्या, त्यांच्या उचंबळ्याने पर्वत हालले, तरी आम्ही भिणार नाही.


२)त्या नगराच्या ठायी देव आहे ते ढळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्याला साहाय्य करील. राष्ट्रे खवळली, राज्य डळमळली, त्याने गर्जना केली तो पृथ्वी विरघळून गेली.


३)या परमेश्वराची कृत्ये पाहा. त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो, तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो, रथ अग्नीत जाळून टाकतो.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

प्रभू म्हणतो, माझे नाव त्या मंदिरात कायम राहावे म्हणून मी त्याची निवड केली आहे व ते समर्पित केले आहे.

आलेलूया !


दुसरे वाचन : १करिंथकरांस पत्र ३:९-११,१६-१७

वाचक :   पौलचे करिंथकरांस  पहिले पत्र यातून घेतलेले वाचन :

तुम्ही देवाची इमारत आहा. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिरीच्या पद्धतीप्रमाणे पायी घातला आणि दुसरा त्याच्यावर इमारत बांधत आहे तर त्याच्यावरचे बांधकाम आपण कसे करत आहो ह्याविषयी प्रत्येकाने जपावे. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्यावाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. ह्या पायावर कोणी सोने, रुपे. मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो. तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल, तो दिवस ते उघडकीस आणील. कारण तो अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल. तुम्ही देवाचे मंदिर आहा आणि तुम्हामध्ये आत्मा निवास करतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहा.

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


शुभवर्तमान 

योहान २:१३-२२

वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .

यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू यरुशलेमास गेला आणि मंदिरात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले. तेव्हा त्याने दोन्यांचा एक कोरडा करून मेंढरे आणि गुरे ह्या सर्वांस मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले आणि तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, "ही येथून काढून घ्या, माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका." तेव्हा तुझ्या मंदिराविषयींचा आवेश मला ग्रासून टाकील,” असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले. त्यावरून यहूदी त्याला म्हणाले, "तुम्ही हे करता तर आम्हाला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?" येशूने त्यांना उत्तर दिले, "तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसात ते उभारीन." ह्यावरून यहूदी म्हणाले, हे मंदिर बांधण्यास शेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय?" तो तर आपल्या शरीररुपी मंदिराविषयी बोलला होता. म्हणून तो असे म्हणत असे हे तो मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला.

प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
रोममधील लॅटेरन महामंदिर हे सर्वात महत्त्वाचे धर्ममंदिर आहे. ह्याच धर्ममंदिरात परमगुरुस्वामी वास्तव्य करतात. सम्राट कॉन्स्टंटाईन ह्याने हे बांधलेले धर्ममंदिर आहे. ख्रिस्तसभा आज या लॅटेरन महामंदिराच्या समर्पणाचा सोहळा साजरा करीत आहे. तिसऱ्या शतकातील कॉन्स्टंटाईन राजाची पत्नी फाऊस्ता हिने ख्रिस्त प्रेमाखातर आपला लॅटेरन राजवाडा पोपमहाशयांना दान केला.९ नोव्हेंबर ३२४ साली पोप सिल्वेस्टर यांनी सदर राजवाड्याला "तारणाऱ्याचे महामंदिर" म्हणून अभिषिक्त केले. मंदिर हे पित्याचे घर आहे. त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या उपासना, भक्ती आणि प्रार्थना करण्यासाठी प्रत्येकाला प्रेरणा मिळते. येशू मंदिरात प्रार्थना करण्यासाठी, शिकण्यासाठी आणि शिकविण्यासाठी नेहमीच जात असे. तेथेच तो पवित्रशास्त्र वाचून लोकांना समजावून सांगत असे. आपण प्रत्येकजण परमेश्वराचे मंदिर आहोत. ज्यात परमेश्वर वस्ती करतो, असे संत पॉल सांगतो. परमेश्वर प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक क्षणात आणि कणात आहे. त्याची जाण असणे आणि त्याला आपले जीवन समर्पण करणे हे ख्रिस्ती ह्या नात्याने आपले कर्तव्य आहे. आज आपण प्रत्येकजण अंतर्मुख बनून परमेश्वराच्या प्रेमाचा, शांतीचा, सहवासाचा स्पर्श आपल्याला अनुभवता यावा म्हणून पवित्र मंदिराचा योग्य तो सन्मान राखू या.

प्रार्थना -हे प्रभू येशू, पवित्र मंदिरात मला तुझ्या आस्तित्वाचा अनुभव घेण्यास माझे जीवन समृद्ध बनविण्यास कृपा दे, आमेन.