“पाहा, इस्राएलात अनेकांचे पडणे व पुन: उठणे होण्यासाठी ह्याला नेमले आहे,
✝️
पहिले वाचन : योहानचे पहिले पत्र २:३-११
वाचक : योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणांस कळून येते की, आपण त्याला ओळखतो. मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही तो लबाड आहे. त्याच्या ठायी सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्या ठायी आहो . मी त्याच्याठायी राहतो, असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वत:ही चालले पाहिजे.
प्रियजनहो, मी तुम्हांसाठी नवी आज्ञा लिहीत नाही, परंतु जी आज्ञा तुम्हांला प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच जुनी आज्ञा लिहितो. जे वचन तुम्ही ऐकले ते, ती जुनी आज्ञा होय. तरी पण एक प्रकारे मी तुम्हांसाठी नवी आज्ञा लिहितो. ती त्याच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशीच आहे. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आता प्रकाशत आहे. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या ठायी अडथळा नसतो. पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो, तो कोठे चालला आहे हे त्याचे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९६:१-३,५-६
प्रतिसाद : आकाश हर्ष करो. पृथ्वी उल्हासो.
१) एखादे नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा. पृथ्वीवर समस्त जनहो, प्रभूचे गुणगान करा. प्रभूचे गुणगान करा. त्याच्या नामाला धन्यवाद द्या.
२) त्याने केलेल्या उध्दाराची दिवसेंदिवस घोषणा करा. देशोदेशी त्याचा महिमा प्रकट करा. साऱ्या मानवजातीला त्याची अलौकिक कृत्ये जाहीर करा.
३) प्रभूने तर नभोमंडल निर्माण केले, शाही वैभवाने व तेजाने ते, मंडित आहे. त्याच्या गाभाऱ्यात सामर्थ्य आणि सौंदर्य वसते.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
शब्द देह झाला आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली, परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.
आलेलूया !
शुभवर्तमान
लुक २:२२-३५
वाचक : लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर योसेफ व मरिया हे येशूबाळाला वर येरुशलेम येथे घेऊन आले. त्याचे प्रभूला समर्पण करावे, म्हणजे 'प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोड़ा किंवा पारव्याची दोन पिल्ले ह्यांचा यज्ञ करावा म्हणून ते घेऊन आले.
तेव्हा पाहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य येरुशलेममध्ये होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्राएलच्या सांत्वनाची वाट पाहात होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले, तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाला धन्यवाद देत म्हटले :
“हे प्रभो, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे.
त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई ह्यास आश्चर्य वाटले. शिमोनने त्याला आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले,
“पाहा, इस्राएलात अनेकांचे पडणे व पुन: उठणे होण्यासाठी ह्याला नेमले आहे, ह्यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंत:करणातील विचार उघडकीस यावे. आणखी तुझ्या स्वत:च्याही हृदयातून तलवार भोसकून जाईल."
प्रभूचे हे शुभवर्तमान...

0 टिप्पण्या