Marathi Bible Reading | Wednesday 30th December 2020

 


बुधवार  

३० डिसेंबर २०२०
 
नाताळ सप्ताहातील रविवार
 संत सॅबिनसचा सण  ✝️ 
(महागुरू रक्तसाक्षी)
✝️

ते बाळ वाढत वाढत बलवान होत गेले व ज्ञानाने पूर्ण होत गेले. त्याच्यावर देवाची कृपा होती."

✝️

शुभवर्तमानात येशू  केवळ शरीराने बलवान  झाला किंवा जगातील ज्ञानाने पूर्ण झाला असे नसून देवाच्या कृपेच्या सामर्थ्यात वाढत गेला. देवाच्या ज्ञानात आणि शहाणपणात परिपूर्ण होत गेला. पवित्र आत्म्याठायी प्रभू परिपूर्णच होता, तरी तो कुटुंबात आपली आई मरिया व पिता जोसेफ ह्यांच्या आज्ञेत राहीला. 


पहिले वाचन : योहानचे पहिले पत्र  २:१२-१७

वाचक :  योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन २:१२-१७

मुलांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा झाली आहे. बापांनो, मी तुम्हांला लिहितो, जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण जो दुष्ट त्याला तुम्ही जिंकले आहे. मुलांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण तुम्ही पित्याला ओळखता. बापांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण तुम्ही बलवान आहा, तुमच्या ठायी देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे.

जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका, जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची पुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ९६:७-१०

प्रतिसाद :   आकाश हर्ष करो. पृथ्वी आनंदित होवो.

१) मानवकुलांनो प्रभूचे गुणगौरव करा. प्रभूचे गौरव व पराक्रम यांची महती वर्णन करा.प्रभूच्या नामाचा महिमा गा.

२)  अर्पण आणा आणि त्याच्या मंदिरातल्या चौकात या. मंगलस्वरूप प्रभूची आराधना. करा. सारी पृथ्वी त्याच्यापुढे थरथर कापो.

३)  सगळ्या राष्ट्रांना जाहीर करा, "प्रभू राजा आहे." तो मानवजातीचा यथार्थ न्याय करील.


जयघोष                                                                      

आलेलूया,आलेलूया !

आमच्यावर पवित्र दिवस उजाडला आहे. राष्ट्रांनो या, प्रभूला नमन करा. कारण आज जगावर महातेज पसरले आहे. 

आलेलूया !


शुभवर्तमान 

लुक  २:३६-४०

वाचक : लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

    हन्ना नावाची एक संदेष्टी होती. ती आशेरच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्यकाल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ सात वर्षे राहिली होती. आता ती चौऱ्याऐंशी वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करुन रात्रंदिवस सेवा करीत असे. तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे येरुशलेमच्या मुक्ततेची वाट पाहात होते त्या सर्वांना ती येशूविषयी सांगू लागली. नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पुरे केल्यावर योसेफ, मरिया व बाळ येशू गालिलात आपले गाव नाझरेथ येथे परत गेले.

ते बाळ वाढत वाढत बलवान होत गेले व ज्ञानाने पूर्ण होत गेले. त्याच्यावर देवाची कृपा होती.

प्रभूचे हे शुभवर्तमान...



चिंतन : परस्त्रीचा / परपुरूषाचा लोभ धरू नकोस ह्या आज्ञेवर चिंतन करण्यासाठी आजची वाचने प्रवृत्त करीत आहेत. देवावर निष्ठा ठेवणारा लिंगभेद आणि वासना यांना बळी पडत नाही. देवाच्या राज्यात सर्व समान आहेत. देहवासना ही जीवनाचा नाश करू शकते म्हणून जगातील गोष्टीवर प्रीती करण्यापेक्षा देवपित्यावर अंतःकरणापासून प्रीती करण्यासाठी पहिले वाचन सांगत आहे. कारण जग व वासना ही नश्वर आहेत तर देवाठायी सार्वकाळीन जीवन आहे. देवावर प्रीती करण्यासाठी वयाची अट नसते. शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे हन्ना संदेष्टी ही चौऱ्याऐशी वर्षाची असूनसुद्धा उपवास व प्रार्थना करीत होती. रात्रंदिवस मंदिरात सेवा करत होती. कारण ती खऱ्या अर्थाने देवावर प्रीती करीत होती. मी पवित्र मिस्सेमध्ये सहभागी असताना माझे मन वासनेमध्ये तर नसते ना? माझा पेहराव इतरांची वासना तर जागृत करीत नाही ना? मी करीत असलेल्या प्रीतीमध्ये वासना आहे का? मनन व चिंतन करू या..

प्रार्थना :   हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या प्रेमळ छायेत राहण्यास व तुझ्या ज्ञानात व शहाणपणात वाढत राहून खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे,


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या