“सर्वांना त्याने माणसे पाठवून ठार केले.”
✝️
पवित्र मिस्साबलिदान – आर्चबिशप फेलिक्स मच्याडो, वसई धर्मप्रांत
☝️मिस्सासाठी क्लिक करा
पहिले वाचन : योहानचे पहिले पत्र १:५-२ : २
वाचक : योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
जो संदेश आम्ही येशू ख्रिस्तापासून ऐकला आहे तो तुम्हांला जाहीर करतो. तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो, तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो, तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुध्द करते.
आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वत:ला फसवतो आणि आपल्याठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय आणि न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनीतीपासून शुध्द करील. आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्याठायी नाही.
अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केले, तर नीतिसंपत्र असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे, केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १२४ : २ ३, ४-५, ७ ब.८
प्रतिसाद : आमचा जीव पक्ष्याप्रमाणे पारध्याच्या पाशातून मुक्त झाला आहे.
१) लोक आमच्यावर उठले तेव्हा जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला त्यावेळी त्यांनी आम्हांला जिवंत गिळून टाकले असते.
२) जलांनी आम्हाला बुडवले असते, त्यांचा लोंढा आमच्या गळ्याशी आला असता, खवळलेले लोंढा आमच्या गळ्याशी आले असते.
३) खरोखर पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत. आकाश आणि पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता परमेश्वर त्याच्या नावामुळे आमचा उध्दार होतो.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
हे देवा, आम्ही तुझी स्तुती करतो,
तू प्रभू आहेस हे आम्ही मान्य करतो.
हे प्रभो, रक्तसाक्षींचे महान सैन्य तुझी स्तुती करते.
आलेलूया !
शुभवर्तमान
मत्तय २:१३-१८
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन २:१३-१८
ज्ञानी लोक गेल्यावर, पाहा, प्रभूचा दूत योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, "ऊठ, बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन इजिप्त देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे." मग तो उठला आणि बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात इजिप्त देशात निघून गेला आणि हेरोदच्या मरणापर्यंत तेथे राहिला. "मी आपल्या पुत्राला इजिप्त देशातून बोलावले आहे" हे जे प्रभूने संदेष्टयाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
तेव्हा ज्ञानी लोकांनी आपणाला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने ज्ञानी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे दोन वर्षाचे आणि त्याहून कमी वयाचे बाळक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून ठार केले. यिर्मया संदेष्टयाच्याद्वारे जे सांगितले होते, ते त्यासमयी पूर्ण झाले. ते असे "रामा येथे रडणे आणि मोठा आकांत ह्यांचा शब्द ऐकण्यात आला, राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून तिचे सांत्वन होत नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान...

0 टिप्पण्या