Marathi Bible Reading | Feast of Holy Family | Sunday 27th December 2020

    

रविवार   
 
२७ डिसेंबर २०२०
 
नाताळ सप्ताहातील रविवार

✝️पवित्र कुटुंबाचा सण✝️ 
(वर्तनसाक्षी)
संत योसेफ, मरिया व बाळ येशू ह्या पवित्र कुटुंबाचा आपण आज सण  साजरा करीत आहोत. संत जोसेफ, मरिया आणि येशू बाळ हे पवित्र व आदर्श कुटुंब आपल्यासमोर आहे. प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबाचा केंद्रबिंदू प्रभू येशू ख्रिस्त आहे.  ख्रिस्ती कुटुंबात प्रभू वचनांवर चिंतन करुन परस्पर सेवेचा आदर्श गिरवला पाहिजे. ख्रिस्ती कुटुंबात प्रेम, शांती, समेट व आनंद भरभरुन दिसून यायला  हवा. आपण ख्रिस्त प्रभूला अपेक्षित असे कौटुंबिक जीवन जगण्यासाठी प्रेरणा  मिळावी म्हणून बाळ येशू समोर नतमस्तक बनू या.

ते बालक शरीराने व ज्ञानाने वाढले.” 

✝️

पवित्र मिस्साबलिदान –  आर्चबिशप फेलिक्स मच्याडो, वसई धर्मप्रांत

☝️मिस्सासाठी क्लिक करा 

पहिले वाचन : बेनसिरा ३:२-६,१२-१४

वाचक :  बेनसिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन

प्रभूने बापाला मुलापेक्षा अधिक सन्मान दिला आहे आणि त्याने मुलाबरोबर आईच्या अधिकाराला महत्त्व दिले आहे. जो आपल्या बापाला मान देतो, तो आपल्या पापांची भरपाई करतो आणि जो आपल्या आईचा सन्मान करतो त्याची तुलना धनदौलत जमवणाऱ्याबरोबर करता येते. जो बापाला मान देतो, त्याला त्याची मुले आनंदित करतील आणि जेव्हा तो प्रार्थना करील तेव्हा ती ऐकली जाईल. बापाला मान देणाऱ्याचे आयुष्य दीर्घ होते. जो आईचे समाधान करतो तो परमेश्वराची आज्ञा पाळतो. हे मुला, तुझ्या बापाला त्याच्या म्हातारपणी आधार दे आणि तो जिवंत असेपर्यंत त्याला दुःख देऊ नकोस, त्याची समज कमी झाली तरी त्याला दया दाखव. तुझ्या सामर्थ्यात त्याचा तिरस्कार करू नकोस. बापाला दाखविलेली दया फुकट जाणार नाही. तर तुझ्या पापांच्या भरपाईसाठी तिचा उपयोग होईल.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १२८:१-५

प्रतिसाद : प्रभूच्या प्रेमाचे मी गुणगान गाईन

१) जो त्याच्याच मार्गानी चालतो. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील. तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.

२)तुझ्या घरात तुझी स्त्री जणू काय द्राक्षीच्या सफळ वेलीसारखी होईल. तुझी मुले तुझ्या मेजाभोवती जैतुनाच्या रोपासारखी होतील.

३) पाहा, परमेश्वराचे भय धरणारा पुरुष याप्रमाणे आशीर्वाद पावेल. परमेश्वर सियोनतून तुला आशीर्वाद देवो. आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस येरुशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो.

दुसरे वाचन :  कलस्सैकरांस पत्र १६:२५-२७

वाचक :  पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन

तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाहाणे असल्यास आपसांत क्षमा करा. प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंत:करणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे. तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंत:करणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा आणि बोलणे किंवा करणे जे काही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा, त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा. स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा.

पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका.

मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा. हे प्रभूला संतोषकारक आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका. असेल तर ती खिन्न होतील.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


जयगोष                                                                       

आलेलूया,आलेलूया !

खिस्ताची शांती तुमच्या हृदयात राज्य करो. ख्रिस्ताच्या संदेशाला तुम्हांमध्ये स्थान मिळो.

आलेलूया !

शुभवर्तमान 

लूक  २:२२-४०

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 


मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे येशूबाळ व मरिया ह्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर योसेफ व मरिया हे येशूबाळाला वर येरुशलेमला घेऊन आले. ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे. म्हणजे "प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा." असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिल्ले यांचा यज्ञ करावा. तेव्हा पाहा, (शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य येरुशलेम येथे होता, तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्राएलच्या तारणाची वाट पाहत होता. त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईवडील येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाला धन्यवाद देत म्हटले :

"हे प्रभो, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ दे. कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे."

त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचे वडील व त्याची आई यांना आश्चर्य वाटले. शिमोनने त्याला आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, “पाहा, पुष्कळ लोकांच्या अंत:करणातील विचार उघडकीस यावे, ह्यासाठी इस्राएलात अनेकांचे पतन आणि पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमले आहे." आणि पाहा, तुझ्या स्वत:च्या हृदयातून तरवार भोसकून पार जाईल.)

हन्ना नावाची एक संदेष्टी होती, ती आशेरच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्यकाल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ सात वर्षे राहिली होती. आता ती चौऱ्याऐंशी वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे. तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे येरुशलेमच्या मुक्ततेची वाट पाहात होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली. नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही पुरे केल्यावर योसेफ, मरिया व येशू गालिलात आपले गाव नाझरेथ येथे परत गेले. ते बाळ वाढत वाढत बलवान होत गेले व ज्ञानाने पूर्ण होत गेले आणि त्याच्यावर देवाची कृपा होती.

प्रभूचे हे शुभवर्तमान...



चिंतन :
ख्रिस्तसभा आज पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहे. आजची वाचने कुटुंबावर लक्ष केंद्रित करुन कौटुंबिक प्रेम व कौटुंबिक जबाबदारी याची जाणीव करुन देत आहे. देवाच्या चौथा आज्ञेप्रमाणे मुलांनी आई-बापांना मान दिला पाहिजे. त्यांची सेवा केली पाहिजे. मात्र आई बापांनी सुद्धा मुलांना प्रेम दिले पाहिजे. कुटुंब ही एक शाळा आहे. कुटुंबाचे संस्कार मुलांवर होतील तशीच मुले समाजात वावरतील. आपली ख्रिस्तसभा एक कुटुंब आहे. आपण देवाची निवडलेले लोक आहोत. ह्या कुटुंबात वेगवेगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. एकमेकांना क्षमा करुन प्रीतीच्या बंधनात राहण्यासाठी संत पौल सांगत आहे. सामाजिक बांधिलकी बरोबर आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी प्रार्थनेचे विशेष महत्व आहेत. मी ख्रिस्तसभेची एक कौटुंबिक जबाबदारी कशाप्रकारे पार पाडत आहे ? प्रत्येक रविवारी आणि कायदाच्या मिस्साबलिदानामध्ये मी एक कुटुंब म्हणून सहभागी होतो का?


प्रार्थना -  हे प्रभू येशू, तू आमच्या कुटुंबाचा राजा आहेस, आमच्या कुटुंबात वस्ती कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या