"बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे."
✝️
पहिले वाचन : प्रेषितांची कृत्ये ६ : ८-१०, ७ : ५४-८:१
वाचक : प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन
स्तेफान कृपा आणि सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकात मोठी अद्भुते आणि चिन्हे करत असे. तेव्हा लिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काहीजण तसेच कुरेनेकर आलेक्सांद्रियेकर आणि किलिकिया व आशिया ह्यातील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफानबरोबर वितंडवाद घालू लागले. पण तो ज्या ज्ञानाने आणि ज्या आत्म्याने बोलत होता त्याला त्यांच्याने तोंड देववेना. त्याचे हे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंत:करणाला इतके झोंबले की ते त्याचे दातओठ खाऊ लागले परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज आणि देवाच्या उजवीकडे येशु उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला आणि त्याने म्हटले, "पाहा, आकाश उघडलेले आणि मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे." तेव्हा ते मोठयाने ओरडून आणि कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली. ते दगडमार करत असता स्तेफान धावा करत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठयाने ओरडला, "हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस." असे बोलून तो झोपी गेला. शौलला तर त्याचा वध मान्य होता.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३१:३बक-४,६.८ अब, १७.२१अब
प्रतिसाद : प्रभो, मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो.
१) तू माझा आश्रयदाता पहाड हो, माझा बचाव करणारा दुर्ग हो आणि माझे रक्षण कर, कारण तूच माझा आश्रयदाता पहाड आणि दुर्ग आहेस. तुझ्या नावाच्या महिम्यासाठी मला मार्गदर्शन कर, माझा नेता हो.
२) मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. हे परमेश्वरा, सत्यस्वरूप देवा, तूच माझा उध्दार करशील. माझी तर प्रभूवर श्रध्दा आहे, तुझ्या वात्सल्यामुळे मला आनंदोत्सव होईल.
३) तू आपल्या सेवकावर आपला मुखप्रकाश पाड. तू आपल्या वात्सल्याने माझा बचाव कर. जे तुझ्यावर श्रध्दा ठेवतात त्यांना तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी मनुष्यांच्या कारस्थानांपासून लपवतोस.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
परमेश्वराच्या नामाने येणारा धन्य असो.
परमेश्वर आमचा प्रकाश आहे.
आलेलूया !
शुभवर्तमान
मत्तय १०:१७-२२
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू आपल्या प्रेषितांना म्हणाला, “माणसांच्या बाबतीत जपून राहा, कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हांला फटके मारतील आणि तुम्हांला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. जेव्हा तुम्हांला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेला तुम्हांला सुचवले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे. भाऊ भावाला आणि बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, मुले आईबापांवर उठून त्यांस ठार करतील आणि माझ्या नामामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तथापि जो शेवटपर्यंत टिकेल त्याचेच तारण होईल.
प्रभूचे हे शुभवर्तमान...
🎄
नाताळ गोठ्याजवळ करावयाची प्रार्थना
0 टिप्पण्या