Merry Christmas | 25th December 2020

 


शुक्रवार   
 
२५ डिसेंबर २०२०

आगमन काळातील 
चौथा सप्ताह 
आपण आनंद आणि उल्हास करु या कारण आता देवाचा शोध घेण्यासाठी आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही. आपले शरीर, मन, बुध्दी आणि अंत:करणाची प्रत्येक हालचाल, आपले विचार व कृती याद्वारे प्रभूचे अस्तित्व जाणण्याचा व अनुभवण्याचा प्रयत्न करु या. तो आहे, अगदी आपल्याबरोबर आणि आपल्यामध्ये आहे. आपल्या सर्वांच्या जीवनाशी तो एकरुप झाला आहे. तो आपल्या परस्परांच्या बोलण्यामध्ये आहे. तो आपल्या कामामध्ये आहे. तो आपल्याबरोबर सहभोजन करीत आहे. तो आपल्याबरोबर प्रवासात आहे. तो अनेकांमार्फत बोलत आहे. तो सर्वकाही ऐकत आहे. निरागस बालकांमध्ये तो दिसत आहे. निसर्गातील प्रत्येक हालचालीतून त्याची  चाहूल लागत आहे. तो आपल्या सुख-दुःखाशी एकरुप झाला आहे. अशा प्रकारे प्रभु येशूचे आपल्या मधीलअस्तित्व आपण अनुभवण्याचा आज प्रयत्न करु या.
आपल्याला प्रभू येशूच्या जन्मोत्सवाचा आनंद इतरांबरोबर वाटता यावा आणि त्याचे अस्तित्व अनुभवता यावे म्हणून सतत प्रयत्नशील राहू या.

"शब्द मनुष्य झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली."

✝️

पवित्र मिस्साबलिदान –  आर्चबिशप फेलिक्स मच्याडो, वसई धर्मप्रांत

☝️मिस्सासाठी क्लिक करा 

पहिले वाचन : यशया ५२:७-१०

वाचक :  यशयाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन

"अखिल जगात देवाने केलेले तारण दिसेल."

जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनला म्हणतो, त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. तुझ्या जागल्यांचा हा शब्द ऐक, ते एकदम उच्च स्वराने गात आहेत. कारण परमेश्वर सियोनला परत येत आहे हे ते प्रत्यक्ष पाहत आहेत. येरुशलेमच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंदघोष करा. सर्व मिळून गा. कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे. त्याने यरुशलेमला उद्धारले आहे. परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारली आहे. साऱ्या सृष्टीला आमच्या देवाने केलेले तारण दिसून येईल.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ९६:२-५,२७.२९

प्रतिसाद : सर्व दिशांनी देवाचे तारण पाहिले आहे

१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याच्या उजव्या हाताने, त्याच्या पवित्र बाहूने तारण साधले आहे.

२) परमेश्वराने स्वत: सिद्ध केलेले तारण प्रकट केले आहे. राष्ट्रासमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे. इस्राएलच्या घराण्यावरील आपली दया व सत्यता यांचे त्याने स्मरण केले आहे.

३)पृथ्वीच्या सर्व दिशांनी आमच्या देवाचे तारण पाहिले आहे. अहो, पृथ्वीवरील सर्व लोकहो, उच्च स्वराने, आनंदाने गा.

४)परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा. वीणेवर सुस्वर स्तोत्र वाजवा. कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा.

दुसरे वाचन : इब्री लोकांस १:१-६ 

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन

देव प्राचीन काळी अंशाअंशानी व प्रकाराप्रकारांनी व संदेष्ट्यांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्याद्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले हे त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे, आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. ज्या मानाने त्याला वारसाहक्काने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले :

"तू माझा पुत्र आहेस,

आज मी तुला जन्म दिला आहे?" आणि पुन्हा "मी त्याला पिता असा होईन आणि तो मला पुत्र असा होईल ?" आणि तो पुन्हा श्रेष्ठ पुत्राला जगात आणतो तेव्हा तो म्हणतो :

"देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


जयगोष                                                        

आलेलूया,आलेलूया !

आमच्यावर पवित्र दिवस उजाडला आहे. राष्ट्रांनो या, प्रभूला नमन करा. कारण आज जगावर महातेज पसरले आहे.

आलेलूया !


शुभवर्तमान 

योहान १:१-१८

वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

(प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्यावाचून झाले असे काहीच नाही. त्याच्याठायी जीवन होते व ते जीवन मनुष्यमात्रांचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही.) देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला. त्याचे नाव योहान. तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला, यासाठी की, त्याच्याद्वारे सर्वांनी श्रद्धा ठेवावी. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला होता. (जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात  होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. आपल्या स्वकीयांकडे तो आला तरी त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना म्हणजे त्याच्या नावावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा यांपासून झाला नाही, तर देवापासून झाला आणि शब्द मानव झाला, त्याने आम्हांमध्ये वस्ती केली व आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य त्यांनी परिपूर्ण होते.) त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि जाहीररीत्या म्हणतो : जो माझ्यामागून येतो तो माझ्यापुढे झाला आहे कारण तो माझ्यापूर्वी होता, असे ज्याच्या विषयी मी सांगितले, तो हाच आहे. कारण नियमशास्त्र मोशेद्वारे देण्यात आले होते. कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताद्वारे आली, देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे.

प्रभूचे हे शुभवर्तमान...



चिंतन :
प्राचीनकाळी देव संदेष्ट्यांद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला, नवीन करारात देव प्रत्यक्ष त्याच्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलत आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे देव केवळ शब्द बोलला आणि सर्वकाही निर्माण झाले. आज तोच देवाचा शब्द प्रत्यक्ष देहधारण करून आपल्या तारणासाठी आला आहे. मेंढपाळांना तेजस्वी प्रकाशाच्या रूपात देवदूतांचे दर्शन घडले कारण जन्माला आलेला प्रभूयेशू जगाचा प्रकाश आहे. अंधारावर विजय मिळविण्यासाठी आणि अंधारात अडकलेल्यांना प्रकाशात आणण्यासाठी तो आला आहे. म्हणूनच आजची वाचने पापांच्या अंधारातून येशूच्या प्रकाशाकडे येण्यासाठी खुणावत आहेत. प्रभूयेशू प्रत्यक्ष मानवदेह धारण करून आपल्या जीवनाशी एकरूप झाला. अशासाठी की आपणसुद्धा त्याच्यासारखे निर्मळ व शांतीस्वरूप बनून देवाच्या आज्ञेत राहावे. प्रभूयेशूचे दर्शन सर्वप्रथम मेंढपाळांना घडले कारण त्यांनी देवदूताच्या शब्दांवर विश्वास ठेवला. प्रभूच्या शब्दावर विश्वास ठेऊन मी नेहमी त्याच्या प्रकाशामध्ये राहीन असा निर्धार करते/ करतो.

प्रार्थना -  हे प्रभू परमेश्वर, आमच्या तारणासाठी तू आपल्या पुत्राला आम्हामध्ये  पाठविले. त्याचे अस्तित्व आणि प्रेम अनुभवण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

नाताळ  सणाच्या हार्दिक शुभेच्छा  -

🎄

नाताळ गोठ्याजवळ करावयाची प्रार्थना 

(click)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या