पुनरुत्थान त्रिदिन
आणि
आज्ञा गुरुवार
पवित्र तेलाचा (CHRISM) मिस्साबली
१ एप्रिल २०२१
✝️
✝️
ख्रिस्तसभा आज पवित्र गुरुवारी ख्रिस्त शरीर संस्काराची स्थापना, धर्मगुरुपदाची स्थापना आणि सेवा व्रत विधी असा तिहेरी सोहळा साजरा करीत आहे. ह्या अति पवित्र सोहळ्यात सहभागी होत असताना प्रभूच्या प्रेमाची सहभागिता अनुभवून सेवामय जीवन जगण्यासाठी प्रभूकडे कृपा मागू या.
✝️
"मी तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुझा वाटा नाही."
✝️
पहिले वाचन : यशया ६१:१-३ अ. ८ब-९
प्रतिसाद स्तोत्र ८९:२१-२२,२५.२७
दुसरे वाचन प्रकटीकरण १:५-८
शुभवर्तमान लूक ४:१६-२०
प्रभुभोजनाचा सायंकाळचा मिस्साबली
पहिले वाचन निर्गम १२:१-८.११-१४
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
परमेश्वराने इजिप्त देशात मोशे व अहरोन यांस सांगितले की, "हा महिना तुम्हांला आरंभीचा महिना व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्राएलच्या सर्व मंडळीला सांग की ह्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपआपल्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे एकाएका घराण्यामागे एकेक कोकरू घ्यावे आणि एक कोकरू खपावयाचे नाही इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसांना पुरेल याचा हिशोब करावा. कोकरू घ्यावयाचे ते निर्दोष असून तो एक वर्षाचा नर असावा, हा नर मेंढरातला किंवा बोकडातला तुम्हांला वाटेल तो घ्यावा, या महिन्याच्या चतुर्दशीपर्यंत ते राखून ठेवावे आणि संध्याकाळी इस्त्राएल मंडळीतील लोकांनी ते वधावे. त्याचे रक्त घेऊन ज्या घरात त्या कोकराचे मांस खाणार त्याच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला लावावे आणि त्यांनी त्याच रात्री मांस विस्तवावर भाजून ते बेखमीर भाकरीबरोबर आणि कडू भाजीबरोबर खावे. ते तुम्ही या रितीने खावे: तुमच्या कंबरा कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वल्हांडण सण होय. कारण या रात्री इजिप्त देशात फिरून त्यांतील मनुष्य व पशू या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि इजिप्तमधील सर्व देवांचे मी शासन करीन. मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असणार त्यावर ते रक्त तुम्हाप्रीत्यर्थ खूण होईल. मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हाला ओलाडून जाईन, इजिप्त देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुम्हांवर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावयाचा नाही.
हा दिवस तुम्हांला स्मारकादाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ मेळा भरवून सण पाळावा, पिढ्यान्पिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११६:१२-१३,१५-१६
प्रतिसाद : आपण आशीर्वादित करतो तो प्याला ख्रिस्तरक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे.
१) परमेश्वराने माझ्यावर केलेल्या उपकारांचा मी कसा उतराई होऊ? मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नामाचा धावा करीन.
२) परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे. हे परमेश्वरा, मी तुझा दास, मी खरोखर तुझा दास आहे, तू माझी बंधने सोडली आहेत.
३) मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पीन, मी परमेश्वराच्या नामाचा धावा करीन. परमेश्वराला नेलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन.
दुसरे वाचन १करिंथ ११:२३-२६
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
पौल म्हणतो, जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हांला सांगितले आहे. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, "हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा." मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, "हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत 39 घोषणा करता."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
प्रभू म्हणतो मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.
शुभवर्तमान योहान १३:१-१५
वाचक : योहानलिखित शुभवत्तमानातून घेतलेले वाचन
"येशूने त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रेम केले."
वल्हांडण सणापूर्वी येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनचा मुलगा यहुदा इस्कार्यात ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होतेवेळी येशु भोजनावरून उठला आणि त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन कमरेला बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्याला म्हणाला, "प्रभो, आपण माझे पाय धुता काय?" येशूने त्याला उत्तर दिले "मी जे करतो ते तुला आता कळणार नाही, ते तुला पुढे कळेल." पेत्र त्याला म्हणाला, "मी तुम्हांला माझे पाय कधीही धुवू देणार नाही." येशूने त्याला उत्तर दिले, "मी तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुझा वाटा नाही." शिमोन पेत्र त्याला म्हणाला, "प्रभो, माझे केवळ पाय धुऊ नका, तर हात व डोकेही धुवा !" येशूने त्याला म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. कारण तो सर्वांगी शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहा, पण सगळेजण नाही." कारण आपल्या धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता. म्हणून तो म्हणाला, "तुम्ही सगळेजण शुद्ध नाही."
मग त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, "मी तुम्हांला काय केले आहे हे तुम्हांला समजले काय? तुम्ही मला गुरू व प्रभू असे संबोधता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. ह्यास्तव मी प्रभू व गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हांला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :आजपासून पुढील तीन दिवस आपण पवित्र त्रिदिन पाळणार आहोत. आपल्या प्रायश्चित्तकालीन साधनेचा हा कळस असणार आहे. ह्या त्रिदिनात आपण जरी तीन घटना साजऱ्या करणार असू (येशूचे दुःखसहन, मरण व पुनरुत्थान) तरी हा एकच विधी आहे, हे दर्शविण्यासाठी ख्रिस्तसभा आजच्या उपासनेत प्रवेश गीत गाते परंतु अंतिम गीत गात नाही. उद्याच्या उपासनेत प्रवेश गीतही नसते व अंतिम गीतही नसते. इस्टर जागरणविधीत प्रवेशगीत नसते मात्र अंतिम गीत मोठ्या जल्लोषाने गाईले जाते. याचाच अर्थ पवित्र गुरुवारी सुरू झालेला विधी इस्टर जागरणविधीने संपतो. जीवनातही आपण दुःख, मरण व पुनरुत्थान ह्यांच्यातील नातेसंबंध पाहायला हवा. जीवनात कितीही दुःख असले, कितीही मरणप्राय यातना असल्या तरी पुनरुत्थानाची आशा मात्र आपण सतत अंतरी बाळणायला हवी. आजच्या उपासनेत तीन गोष्टी साजऱ्या केल्या जातात : पवित्र मिस्सेची प्रस्थापना, धर्मगुरूपदाची स्थापना आणि प्रेमाची नवी आज्ञा.
१) पवित्र मिस्सा-पाच पैलूः माडीवरच्या खोलीत आपल्या बारा प्रेषितांसमवेत येशूने अखेरचे भोजन घेतले. त्याद्वारे दुसऱ्या कालवरीच्या टेकडीवर जे चित्तथरारक शोकनाट्य घडणार होते, त्याची पूर्व सूचना येशूने आपल्या प्रेषितांना दिली. हे भोजन हीच पहिली पवित्र मिस्सा ठरली. ते भोजन ही येशूच्या दुःखसहन, मरण व पुनरुत्थानाची स्मृती होती, ते एक बलिदान होते, ते ख्रिस्ताच्या शाश्वत उपस्थितीचे चिन्ह होते, ते एक आभारप्रदर्शन किंवा तो एक स्तुतियज्ञ होता आणि जे ऐक्याचे प्रतीक होते. २) धर्मगुरू- प्रतिरिख्रिस्त : 'जो तुम्हाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो.' 'हे माझ्या स्मरणार्थ करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे' अशा विविध शब्दात प्रभूयेशूने आपल्या प्रेषितांचे धर्मगुरूपद सूचित केले. धर्मगुरूंच्या रूपाने ख्रिस्त आपल्यामध्ये हजर असतो.
३) प्रेमाची नवी आज्ञाः आपल्या प्रेषितांचे पाय धुवून येशूने आपल्या प्रेषितांना प्रीतीचा व सेवेचा मंत्र दिला. सेवेविना प्रीती हे ढोंग असू शकते. तर प्रेमाविना सेवा हे केवळ कर्तव्य ठरू शकते.
आत्मपरीक्षण : ह्या पवित्र त्रिदिनामध्ये मी अगदी मनापासून सहभागी झालेलो आहे का? पवित्र मिस्सा, धर्मगुरूपद आणि शेजारप्रीती याविषयी माझ्या मनात कोणत्या भावना आहेत? मननासाठी शास्त्रवाचन : घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे. घ्या आणि ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या महान संस्कारातील कृपा अनुभवण्यास व सेवामय जीवन जगण्यास आम्हाला कृपा व प्रेरणा दे, आमेन.


0 टिप्पण्या