Marathi Bible Reading | Wednesday of the Holy Week 31st March 2021

   

पवित्र आठवडा  


बुधवार 


३१ मार्च २०२१

✝️


मुरानोचे संत डॅनियल
- साधू (... १४११)



✝️

"परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो, त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार!"

✝️

देवाचा सेवक सर्वस्वी देवाच्या वचनावर आणि आश्वासनांवर अवलंबून असतो. कितीही अडथळे व आव्हाने समोर आली तरी त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, 'परमेश्वर माझा साहाय्यकर्ता आहे'. 
 देवाचा पुत्र व आपला तारणारा प्रभू ह्याच्या दुःखासहनाची सुरुवात शेवटल्या भोजनापासून होते त्याचा वृत्तांत आपण वाचत  आहोत.शिष्य यहुदा इस्कर्योत फितूरी करतो. मुख्य याजकांकडे जाऊन तीस रुपयाच्या नाण्यात तो आपल्या गुरुचा सौदा करतो. यहुदा इस्कय्योत  स्वार्थी, लोभी आणि विश्वासघातकी प्रवृत्तीचे दर्शन घडविणारे आहे.
यहुदा इस्कर्योत ह्या व्यक्तिमत्वावर आपण चिंतन करुया. 'मला काय  द्याल' असा माणूस जेव्हा स्वार्थी विचार करतो तेव्हा माणसातील ज्युदास जागा झालेला असतो. वरवरुन साधी आणि भोळी वाटणारी अशी अनेक माणसे विश्वास घातकी असू शकतात. आपल्यामध्ये असा ज्युदास कार्यरत असेल तर आपण ख्रिस्ती मुल्यांशी प्रामाणिक नाहीत. आपल्यातील स्वार्थी, अहंकारी आणि लोभी विचार काढून टाकून आपण ख्रिस्ताशी एकनिष्ठ बनण्यासाठी कृपा  मागू या..


✝️

पहिले वाचन : यशया ५०:४-९
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
यशया म्हणतो, शिणलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला शिष्यांची जिव्हा दिली आहे. तो रोजरोज सकाळी मला जागे करतो, शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडले आहेत. मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. मी मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणाच्यांपुढे मी आपले गाल केले. उपमर्द आणि छि: थू यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला साहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही. मी आपले तोंड गारगोटीसारखे केले. माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. मला नीतिमान ठरवणारा जवळ आहे. माझ्याबरोबर वाद कोण करणार ? आपण समोरासमोर उभे राहू. माझा प्रतिवादी कोण आहे ? त्याने माझ्यापुढे यावे. पाहा, प्रभू परमेश्वर माझा साहाय्यकर्ता आहे. मला दोषी कोण ठरवणार ?

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ६९:८-१०,२१-२२,३१,३३-३४

प्रतिसाद :हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून मला उत्तर दे.

१ तुझ्याकरिता मी निंदा सोशिली आहे, लज्जेने माझे मुख व्याप्त झाले आहे, मी आपल्या भावांना नवखा, माझ्या सहोदरांना परका असा झालो आहे. 

तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे,निंदा करणाऱ्यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे. 

२ निंदा होत असल्यामुळे माझे हृदय भग्न झाले आहे, मी अगदी बेजार झालो आहे. 

माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले, पण कोणी आढळला नाही, 

माझे कोणी समाधान करील म्हणून मी वाट पाहिली पण कोणी दिसला नाही.

त्यांनी मला अन्न म्हणून खायला विष दिले, तहान भागवायला मला आंब दिली. 

३) देवाच्या नावाचे मी गीत गाऊन स्तवन करीन, त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन. दीन हे पाहून हर्षतील,

 देवाचा शोध करणाऱ्यांनो, तुमच्या हृदयात नवजीवन येवो. कारण परमेश्वर गरिबांचे ऐकतो, बंदीत पडलेल्या आपल्या लोकांचा तो अव्हेर करत नाही.


जयघोष 

आपल्या राजाचा जयजयकार असो, पित्याचा तो आज्ञाधारक आहे,

ज्याप्रमाणे दीन कोकरू कत्तल करण्यासाठी नेतात, तसेच आपणास क्रुसावर देण्यासाठी चालवले आहे.


शुभवर्तमान  मत्तय २६:१४-२५

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
यहुदा इस्कय्योत नावाच्या बारातील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, "मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल?" त्यांनी त्याला तीस शेकेल मोजून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला.
नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “आपणांकरिता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?" त्याने म्हटले, "नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की, गुरुजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे; मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो." मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली.
संध्याकाळ झाल्यावर तो बारा शिष्यांसह भोजनाला बसला आणि ते भोजन करीत असताना त्याने म्हटले, "मी तुम्हांला सत्य सांगतो, तुमच्यातला एकजण मला धरून देईल." तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येकजण त्याला विचारू लागला, "प्रभो, मी तर नाही ना ?" त्याने उत्तर दिले "ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा; परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो, त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार! तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते." त्याला धरून देणारा यहुदा ह्याने विचारले, "गुरुजी, मी तर नाही ना ?" तो त्याला म्हणाला, "होय तूच."

प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन :जे शरीराचा वध करू पाहतात पण आत्म्याचा नाही अशांना भिऊ नका. शरीराचा घात करणारे आत्म्याला संपवू शकत नाहीत. मानवी शरीर धारण केलेला प्रभू येशू दुःखसहनाच्या एकूण प्रवासात स्वतःचे शरीर मारेकऱ्यांच्या स्वाधीन करतो मात्र आत्मा पित्याच्या हवाली करतो. या जगात असताना येशू आपल्या पित्याच्या सान्निध्यात असायचा. क्रुसावरील अंतिम घटकेपर्यंत तो आपल्या पित्याच्या आज्ञा व इच्छा जाणून घेत होता. मृत्युमुळे काही क्षणापुरता पित्याशी आपली ताटातूट होईल ह्याची येशूला काळजी वाटत होती. त्यामुळे स्वतःच्या शारीरिक क्लेशांपेक्षा पित्याबरोबरचा संवाद तुटेल ह्याचे आत्मक्लेश तो अनुभवीत होता. तरी त्याला नीतिमान ठरविणारा त्याच्याजवळ होता. तोच पिता त्याला धीर व बळ पुरवित होता. ते दुःख सहन करण्यासाठी. देवाचे कार्य करताना या जगाचे लोक सज्जनांना सतत त्रास देतात, त्यांची निंदा करतात, अपमान करतात. येशू आपल्याबरोबर आहे हा भरवसा देवाचे कार्य अशावेळी खुद्द करण्यास स्फूर्ती देते. कारण परमेश्वर माझा सहाय्यकर्ता आहे, तर मला दोष कोण लावणार ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्याशी प्रामाणिक राहण्यास व विश्वासाने तुला अनुसरण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या