Marathi Bible Reading | Tuesday of the Holy Week 30th March 2021

  

पवित्र आठवडा  


मंगळवार 


३० मार्च २०२१

✝️


संत जॉन क्लिमॅकूस
- मठाधिकारी, वर्तनसाक्षी (५२५-६०६)
जॉन क्लिमॅकूस ह्यांनी लिहिलेल्या साहित्यकृतीत "द लॅडर टू पॅराडाईस" (पारादिसकडे जाणारा महामार्ग) हे पुस्तक अजरामर ठरलेले आहे.

आपल्या प्रार्थनेसाठी मोठमोठ्या शब्दांची जंत्री जमविण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्या बालकाचे बोबडे बोलही परमेश्वर पित्याला स्पष्टपणे समजू शकतात. संत जॉन क्लिमिकूस

✝️

"माझ्यासाठी तू आपला प्राण देशील का?

✝️

अखिल मानवाच्या उद्धारासाठी प्रभू येशूचे बलिदान होणे ! अगत्याचे होते.
प्रभू आज आत्म्यात व्याकूळ झाला. आपले शिष्य सुद्धा आपल्याला नाकारणार ही गोष्ट मानवी दृष्टीकोनातून मनाला व्याकूळ करणारी होती ,  पापी मानवाच्या उद्धारासाठी प्रभू यशू दुःख सहन करण्यास व मृत्यु स्वीकारण्यास तयार होता, कारण त्या द्वारे देवपित्याचा गौरव होणार  होता. आज सुद्धा प्रभू येशू क्षणोक्षणी व्याकूळला आहे. आपण अनेकदा अगदी क्षुल्लक कारणांसाठी देवाला व ख्रिस्ताला नाकारतो. स्वार्थ, अहंकार, दुष्टपणा, मोह अशा अनेक प्रकारच्या प्रवृत्तीला बळी पडून आपण ख्रिस्ताला पुन्हा पुन्हा नाकारतो. अशाने देवाविरुद्ध आणि आपल्या बंधु-भगिनीविरुद्ध आपण पाप  करतो.
प्रभू येशू अगदी व्याकूळ होऊन आज आपणा सर्वांस प्रीतिने भरलेले  जीवन जगण्यासाठी आवाहन करीत आहे. आपल्या प्रत्येकाला त्याचा प्रकाश  होण्यासाठी व ह्या पवित्र आठवड्यात त्याचा दुःखात सहभागी होण्यासाठी   पाचारण करीत आहे.


✝️

पहिले वाचन : यशया ४९:१-६
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन


यशया म्हणतो, द्विपांनो, माझे ऐका; दूरदूरच्या राष्ट्रांनो, कान द्या. मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले, मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले. त्याने माझे मुख तीक्ष्ण तरवारीसारखे केले, त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवले; त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भात्यात गुप्त ठेवले. तो मला म्हणाला, "तू माझा सेवक आहेस; मला शोभा आणणारा तू इस्राएल आहेस." मी तर म्हणालो होतो. "मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच आणि निरर्थक वेचले; तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे. माझे प्रतिफळ  माझ्या देवाच्या हाती आहे."
मी याकोबला त्याच्याकडे परत आणावे, त्याच्याजवळ इस्राएल एकत्र जमवावे म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाशयात घडवले ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला आणि जो माझा देव माझे सामर्थ्य झाला तो परमेश्वर म्हणतो, "याकोबच्या वंशाचा उद्धार करावा, इस्राएलच्या रक्षिलेल्या लोकांना परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे यात काही मोठेसे नाही; तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्राचा प्रकाश असा नेमतो."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ७१:१-६,१५.१७

प्रतिसाद माझे मुख तुझ्या तारणाचे वर्णन करील.

१) हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे. मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस. तू आपल्या न्यायानुसार माझा उद्धार कर आणि मला मुक्त कर. माझ्याकडे आपला कान लाव आणि माझे तारण कर..

२) मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी संरक्षण निवासाचा खडक हो, माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहे, कारण तू माझा गड आणि दुर्ग आहेस, हे माझ्या देवा, दुर्जनांच्या हातातून मला मुक्त कर.

३) हे प्रभू परमेश्वरा, तू माझे आशास्थान आहेस, माझ्या तरुणपणापासून तू माझे श्रद्धास्थान आहेस. जन्मापासून तू माझा आधार आहेस, मातेच्या उदरातून निघाल्यापासून तू माझा कल्याणकर्ता आहेस.

४) माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि तू सिद्ध केलेल्या तारणाचे दिवसभर वर्णन करील, हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णिली आहेत.

जयघोष 

आपल्या राजाचा जयजयकार असो, पित्याचा तो आज्ञाधारक आहे, ज्याप्रमाणे दीन कोकरू कत्तल करण्यासाठी नेतात, तसेच आपणांला क्रुसावर देण्यासाठी चालवले आहे.


शुभवर्तमान  योहान १३:२१-३३,३६-३८

वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

आपल्या शिष्यांबरोबर भोजन घेत असता येशू आत्म्यात व्याकूळ झाला आणि निश्चितार्थनि म्हणाला, "मी तुम्हांला सत्य सांगतो, तुम्हांपैकी एक जण मला धरून देईल." तो कोणाविषयी बोलतो ह्या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यातील एकजण येशूच्या उराशी टेकलेला होता, ह्यास्तव "ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे आम्हांला सांग" असे पेत्रने त्याला खुणावून म्हटले. तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता मागे लवून त्याला म्हणाला, "प्रभो, तो कोण आहे?" येशूने उत्तर दिले, "मी ज्याला घास ताटात बुचकळून देईन तोच तो आहे." मग त्याने घास ताटात बुचकळून शिमोनाचा मुलगा यहुदा इस्कय्योत ह्याला दिला आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. मग येशूने त्याला म्हटले "तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक." पण त्याने त्याला असे कशासाठी सांगितले हे भोजनाला बसलेल्यांतील कोणाला समजले नाही. कारण, यहुदाजवळ पैशांची थैली होती म्हणून "सणासाठी आपल्याला ज्या पदार्थांची गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबांना काहीतरी द्यावे म्हणून येशू सांगतो आहे," असे कित्येकांना वाटले. मग घास घेतल्यावर तो लागलीच बाहेर गेला. त्यावेळी रात्र होती.

तो बाहेर गेल्यावर येशूने म्हटले, "आता मनुष्याच्या पुत्राचा गौरव झाला आहे आणि त्याच्या ठायी देवाचा गौरव झाला आहे. देव आपल्या ठायी त्याचा गौरव करील, तो त्याचा लवकर गौरव करील. मी अजून थोडा वेळ तुम्हांबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहुद्यांना सांगितले की, जेथे मी जातो तेथे तुम्हांला येता येणार नाही, तसे तुम्हांलाही आता सांगतो." शिमोन पेत्र त्याला म्हणाला, "प्रभो, आपण कोठे जाता ?" येशूने उत्तर दिले, "मी जेथे जातो तेथे तुला आता माझ्यामागे येता येणार नाही, तू नंतर येशील." पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, पण मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही ?" आपल्यासाठी मी माझा प्राण देईन. येशूने त्याला उत्तर दिले, "माझ्यासाठी तू आपला प्राण देशील का? मी तुला नक्की सांगतो, तू तीन वेळा मला नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.'

प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन :ज्यांच्यावर जिवापाड प्रेम केले, ज्यांच्यावर संपूर्ण भिस्त ठेवून मनातली गुपितं त्याच्या कानावर घातली, ज्याच्यावर स्वतःपेक्षा अधिक भरवसा ठेवला तीच आपल्या जिवाभावाची माणसे जेव्हा आपल्यावरच उलटतात, विश्वासघात करतात, प्रतारणा करतात तेव्हा मानवी दुःख परिसीमा गाठते व त्या दुःखाचा कडेलोट होतो. मैत्रीच्या निखळ नात्याच्या गळ्याला नख लावणारे ज्युदासचे विश्वासघातकी विखारी चुंबन, स्वतःचा जीव वाचविण्यासाठी आपल्या स्वामीची ओळख लपवून तीन वेळा नाकारणारा पेत्र आणि अंगावरची सर्व वस्त्र फाडून केलेली नग्न येशूची अव्हेलना हे येशूच्या दुःखसहनाच्या प्रवासातील परमोच्च आत्मक्लेशांचे क्षण. खरे पाहिले तर दुरदैवी क्षणच ते... इतर कुणी आपला अपमान केला, नुकसान केले, धोका दिला तर एकवेळ समजू शकतो. परंतु ज्यांच्यावर आपण उपकार करतो, अशी आपल्या रक्ताच्या नात्यातील माणसेच जेव्हा पाठीत खंजीर खुपसतात, आपल्याच ताटात हात घालून सुखाचे वाटेकरी होतात पण जेव्हा वेळ येते तेव्हा पळ काढतात तेव्हा अशा नात्यांची माती होते. एक माणूस म्हणून देवपुत्र येशूने मानवी स्वभावाची ही नीच व हीन अवस्था जवळून अनुभवली. मी अशा परिस्थितीत कसा वागतो?

प्रार्थना :- हे प्रभू येशू, आमच्यातील सर्व प्रकारचा दुष्टपणा दूर करुन आम्हाला तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास प्रेरणा व शक्ती दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या