Marathi Bible Reading | Monday of the Holy Week 29th March 2021

 

पवित्र आठवडा  


सोमवार 


२९ मार्च २०२१

✝️

संत रूपर्ट 
(महागुरू व वार्तांसाक्षी )

✝️

गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत; परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही."

✝️

बेथानी येथेच प्रभू येशू ख्रिस्ताने मार्था व मरिया ह्यांचा भाऊ लाजरस  ह्याला मृतातून जिवंत केले होते.  प्रभु येशूला ठार मारण्याचा  कट रचला जात असतानांच प्रभू येशू बेथानी येथे आला होता. जणू प्रभू मृत्युला  सामोरे जाण्यास सज्ज झाला होता.
जेवणावळी वेळी मरियेने प्रभू येशूचा तैलाभ्यंग केला. अत्यंत मौल्यवान असे सुगंधी तेल येशूच्या चरणाला लावले आणि नम्रतेने आपल्या केसांनी येशूचे चरण मरियेने पुसले. मरिया एकनिष्ठ व आपल्या जीवनाशी प्रामाणिक होती. मरिये सारखे उदार मन व समर्पित जीवन जगण्याची  इच्छा आपल्यामध्ये असेल तर ख्रिस्त प्रभू आपल्या सर्व पापांची क्षमा करणारा  परमेश्वर आहे.
आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाशी एकरुप होण्यासाठी आणि त्याला शरण जाण्यासाठी ह्या पवित्र आठवड्यामध्ये विशेष प्रयत्न करु या. प्रभूच्या दुःखसहनात सहभागी होत असताना त्याच्या पुनरुत्थानाचे सहभागिदार बनण्यास कृपा मागू या.


✝️

पहिले वाचन : यशया ४२:१-७
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
परमेश्वर म्हणतो, पाहा, हा माझा सेवक, याला मी आधार आहे; पाहा, हा माझा निवडलेला, याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; याच्याठायी मी आपला आत्मा घातला आहे, तो राष्ट्रांना न्याय प्राप्त करून देईल. तो गवगवा करणार नाही, तो आपला स्वर उच्च करणार नाही, तो रस्त्यातून पुकारा करणार नाही; चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करील . पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही व भंगणार नाही; द्वीपे त्याच्या धर्मशास्त्राची प्रतीक्षा करतात. आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा आणि तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकांत प्राण घालणारा आणि तिच्यावर संचार करणाऱ्यांना जीवित देणारा देव परमेश्वर असे म्हणतो, "मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलावले आहे, मी तुझा हात धरला आहे; तुला राखले आहे तू लोकांना करार आणि राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन; आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिशाळेतून बंदिवानांना आणि अंधारात बसलेल्यांना कारागृहांतून बाहेर काढावे म्हणून मी असे करीन."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  २७:१-३,१३-१४

प्रतिसाद परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे.

१) परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे; मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे; मी कोणाचे भय धरू?

२) माझे शत्रू माझे द्वेष्टे माझे मांस खाऊन टाकण्यास माझ्यावर चढाई करून आले, ते दुष्टकर्मी ठेच खाऊन पडले.

३) सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही. माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिम्मत धरुन राहीन.

४) ह्या इहलोकीच परमेश्वराची दया माझ्यावर होईल अशी माझी श्रद्धा आहे. परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर. परमेश्वराची प्रतीक्षा कर!

जयघोष 

आपल्या राजाचा जयजयकार असो! फक्त तूच आम्हावर दयादृष्टी दाखवतोस.


शुभवर्तमान  योहान १२:१-११

वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू  वल्हांडणाच्या  पूर्वी सहा दिवस बेथानी येथे आला; ज्या लाजरसला येशूने मेलेल्यातून उठवले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली; तेव्हा मार्था सेवा करीत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामांसीचे मौलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले; तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. मग त्याच्या शिष्यांतील एकजण यहुदा इस्कार्योत ( जो त्याला धरून देणार होता तो) म्हणाला, "हे सुगंधी तेल तीनशे शेकेलला विकून ते गरिबांना का दिले नाहीत?" त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही; तर तो लोभी असून त्याच्याजवळ पैशांची थैली होती आणि तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे म्हणाला. येशूने म्हटले, "तिला अडवू नका, माझ्या उत्तरकार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या. कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत; परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही."

तो तेथे आहे असे यहुद्यातील लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि केवळ येशूकरिता नाही तर ज्या लाजरसला त्याने मेलेल्यातून उठवले होते त्यालाही पाहण्याकरिता ते आले. मुख्य याजकांनी लाजरसलाही जिवे मारण्याचा निश्चय केला, कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते.

प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन :परमेश्वर पित्याला आपल्या पुत्रावर पूर्ण भरवसा आहे. जी जबाबदारी त्याने येशूवर सोपविली आहे ती तो परिपूर्णपणे पार पाडणार ह्याची त्याला खात्री आहे. म्हणूनच पित्याच्या मुखातून आपल्या लाडक्या पुत्राविषयीचे गौरवोद्गार निघतात. जीवनात पूर्णपणे नेस्तनाबूत होऊन उध्वस्त झालेले म्हणजेच चेपलेले बोरू, सर्वप्रकारचे प्रयत्न करूनही जीवनात अयशस्वी झालेले, निराशेमध्येही जगण्याची इच्छा व उमेद बालगणारे तरीही जीवन व मरण यामध्ये हेलकाव घेणारे म्हणजेच जणू मिणमिणत्या वाती येशू विझू देणार नाही, मृत्यूपंथास लागलेले म्हणजे चेपलेले बोरू तो मोड देणार नाही इतका आपल्या पुत्राबद्दलचा प्रचंड आत्मविश्वास प्रभू परमेश्वर आपणांस देत आहे. मृत लाझरस, याईराची कन्या, जन्मांध बार्तीमय, बेथसैदा तळ्याकाठचा पंगु मनुष्य, रक्तस्रावी स्त्री, भर गर्दीमध्ये छपरावरून खाली येशूच्या पुढयात सोडलेला लकवा मारलेला पुरुष अशी कितीतरी उदाहरणे आहेत की ज्यांचे जीवन एकतर संपुष्टात आले होते किंवा त्यांची जगण्याची, मुक्तीची आशाच संपली होती. अशा कित्येक अभाग्यांच्या जीवनाला येशूने स्पर्श केला आणि त्यांना नवजीवन मिळाले.

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुला शरण येण्यास व समर्पित जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या