पवित्र आत्म्याच्या आगमनाचा 

रविवार 

२३ मे २०२१ 



✝️

आजच्या पहिल्या वाचनात स्वर्गरोहणानंतर पेन्टेकॉस्टच्या दिवशी सर्व  शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला व त्याच्या सामर्थ्याने सर्व प्रेषितगण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले त्याचा वृत्तांत आहे. परमेश्वर पिता, देवपुत्र व पवित्र आत्म्याच्या नावाने प्रत्येक ख्रिस्ती माणसाला पवित्र आत्मा मिळाला आहे. प्रेषितांनी जसे प्रेरित होऊन प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देऊन सुवार्ता पसरविली तसेच आपल्या प्रत्येकाला सुवार्तेची साक्ष देण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.
संत पौल म्हणतो त्याप्रमाणे, ‘आपल्या सर्वांना विविध कृपादाने मिळाली आहेत', त्यानुसार आपण प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. एकच आत्मा, एकच प्रभू आणि एकच देव अशा ऐक्याचे अवयव असलेले आपण पवित्र आत्म्याठायी संचरित होऊन देवाचा गौरव करु या. 

पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने भयभीत झालेल्या शिष्यांना दर्शन दिले आणि आपले कार्य व जबाबदारी शिष्यांवर सोपविली. बंद दरवाज्यातून प्रभू आत आला, देवाची स्वर्गराज्याची सुवार्ता घोषविण्यास शिष्यांना व आपल्या प्रत्येकाला येशूने आज्ञापिले आहे. पवित्र  आत्म्याची कृपा प्रभूने त्यांना देत म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा” आणि  शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना पापांची क्षमा करण्याचा अधिकार दिला. ख्रिस्तसभेत आजसुद्धा प्रभू येशूचे कार्य त्यामुळेच सातत्याने फलदायी बनत आहे.  

✝️

"पवित्र आत्म्याचा स्वीकार करा."

✝️
             
पहिले वाचन प्रे. कृ.  २: १-११

वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन

“सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि बोलू लागले."

पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना, अकस्मात मोठ्या सुसाट्यासारखा वाऱ्याचा आकाशातून नाद झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या आणि प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले.
त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रांतील भक्तिमान यहुदी यरुशलेममध्ये राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोधंळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालिली ना ? तर आपण प्रत्येक जण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे ? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहुदीया , कप्पुदुकिया, पंत, आसियास, फ्रुगिया, पंफूलिया, इजिप्त आणि कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे, यहुदी आणि यहुदीयमतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपआपल्या भाषात देवाची महत्कृत्ये सांगतांना ऐकतो.”

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १०४:१.२४,२९-३०,३१,३४

प्रतिसाद : प्रभो, तू आपला आत्मा पाठव आणि पृथ्वीला नवजीवन दे.

१) हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर ! हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! तुझ्या संपत्तीने पृथ्वी परिपूर्ण आहे.

२) तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरून मातीत मिळतात. तू आपला आत्मा पाठवतोस तेव्हा ते उत्पन्न होतात आणि तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करतोस.

३) परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो ! परमेश्वराला आपल्या कृतीपासून आनंद होवो ! मी केलेले त्याचे मनन त्याला गोड वाटो. परमेश्वराच्या ठायी मला हर्ष होईल.

दुसरे वाचन :  १ करिंथ १२:३-७.१२-१३

वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे."

पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्यावाचून कोणालाही “येशू . हा प्रभू आहे" असे म्हणता येत नाही.
कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते.
कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेल्लेणी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

हे पवित्र आत्म्या, ये, तुझ्या श्रद्धांवतांची हृदये व्यापून टाक आणि तुझा प्रेमाग्नी त्यांच्या हृदयात प्रज्वलित कर. 

आलेलुया!

शुभवर्तमान  योहान  २०:१९-२३

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. "

त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती असो.” असे बोलून त्याने आपले हात आणि कूस दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो." असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, "पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन : ख्रिस्तसभा आज पवित्र आत्म्याच्या आगमनाचा सोहळा साजरा करीत आहे. तसे पाहता वल्हांडण सणाच्यानंतर येणाऱ्या पन्नासाव्या दिवशी पेन्टेकॉस्टचा सण यहुदी लोक पाळीत असत. त्याच दिवशी देवाने मोशेला दहा आज्ञा दिल्या असे ते मानीत. येशूने वल्हांडण सणाच्या दिवशी आपल्या प्रेषितांसह अखेरचे भोजन घेऊन क्रूसावर आपल्या प्राणाचे अर्पण केले त्यानंतर पन्नासाव्या दिवशी आपल्या शिष्यांवर पवित्र आत्मा पाठवला.
१) पेन्टेकॉस्ट - ख्रिस्तसभेचा वाढदिवसः प्रभू येशूचा जन्म झाला तो पवित्र आत्म्याच्या योगाने ख्रिस्तसभेचा जन्म झाला तोही पवित्र आत्म्याच्या योगाने. दोन्ही प्रसंगी पवित्र मरिया विशेष भूमिका बजावते. त्यामुळे ती ख्रिस्ताची तसेच ख्रिस्तसभेची माता म्हणून गौरविली गेलेली आहे. ख्रिस्ती व्यक्तीने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जीवन कसे जगावे ते शिकावे पवित्र मरियेकडून. 
२) पवित्र आत्मा पित्याची देणगी : कोणतीही व्यक्ती आपल्या अक्कल हुशारीने किंवा स्व-सामर्थ्याने पवित्र आत्मा मिळवू शकत नाही. ती पित्याने दिलेली देणगी असते. ती स्वीकारण्यासाठी आपल्या मनाची तयारी करणे एवढेच माणसाच्या हाती असते. एकदा का माणसाने मनापासून हा देणगीचा स्वीकार केला की आजच्या दुसऱ्या वाचनात सांगण्यात आलेली पवित्र आत्म्याची फळे त्याच्या जीवनात दिसू लागतात. 
३) पवित्र आत्म्याचे कार्य : आजच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे कैवारी म्हणून पवित्र आत्मा आपली बाजू घेऊन आपल्या गरजेत आपल्याला सहाय्य करतो, चिंता वाटत असेल तर आपल्याला सांत्वनपर स्पर्श करतो. सत्याचा आत्मा ह्या नात्याने आपल्याला मार्गदर्शन करतो. प्रार्थना कशी करावी, छळ प्रसंगी काय बोलावे, धैर्याने वचन कसे सांगावे, ईश्वरी प्रेरणा कशी ओळखावी या बाबतीत पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करीत असतो.

प्रार्थना : हे पवित्र आत्मा, ये आणि तुझ्या सामर्थ्याने आमच्याद्वारे देवाची सुवार्ता पसरविण्यास आम्हाला सामर्थ्य व कृपा दे, आमेन.