पुनरुत्थान
सातवा सप्ताह
शनिवार
२२ मे २०२१
कॅसियाची संत रिटा
-विधवा (१३८६-१४५६)
स्वत:च्या गरजा विसरणे, स्वतःविषयी मुळीच चिंता नसणे ह्यामुळे आपण इतरांप्रती संवेदनक्षम राहू शकतो. संत रिटा
✝️
ख्रिस्तासभेच्या प्रारंभीच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रेषितांनी ख्रिस्ताची सुवार्ता पसरविली. त्यांनी ख्रिस्ताचे अनुकरण करुन विश्वासाने व धैर्याने देवशब्द लोकांना दिला. आजच्या पहिल्या वाचनात प्रभू येशूचा सरदार बनलेल्या संत पौलाने रोमन राजवटीच्या दहशतीखाली आणि कट्टरवादी यहुद्यांच्या परिसरात धैर्याने देवराज्याची घोषणा केली.
आजच्या शुभवर्तमानात पेत्रावर प्रभूने ख्रिस्तमंडळाची संपूर्ण जबाबदारी सोपविली असतांना पेत्राच्या मनात योहानविषयी गोंधळ निर्माण झाला होता. परंतु ख्रिस्ताने त्याला म्हटले, 'तू माझ्या मागे ये.' प्रभूच्या मागे जाणे म्हणजे त्यागमय जीवन जगणे, देवाच्या इच्छेला प्राधान्य देणे, क्रुस व वेदनांना ' स्वीकारणे, प्रभुची वचने पाळून पवित्र जीवन जगणे आणि आपल्या जीवनाद्वारे देवाची सुवार्ता पसरविणे. येशू ख्रिस्ताच्या मागे चालत असताना आपल्या जीवनात अनेक संकटे, अडचणी व आव्हाने येणारच, मात्र त्यातून निभावून जाण्यासाठी प्रभू येशू आपल्याला धैर्याचा व सामर्थ्याचा आत्मा देत आहे.
प्रभू येशू आज आपल्या प्रत्येकाला त्याची देवराज्याची सुवार्ता घोषविण्यास बोलवित आहे. आपली तयारी करून मागे जाऊ या. दररोजच्या जीवनात अगदी छोट्याशा कृतिद्वारे देवराज्याची सुवार्ता पसरवू शकतो.
✝️
"तू माझ्या मागे ये."
✝️
पहिले वाचन प्रे. कृ. २८: १६-२०,३०-३१
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"पौल रोम शहरात राहिला. तेथे तो देवाच्या राज्याची घोषणा करीत असे."
आम्ही रोम शहरात गेल्यावर पौलला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली.
तीन दिवसानंतर पौलने यहुद्यांची जी मुख्य माणसे होती त्यांना एकत्र बोलावले. ते एकत्र जमल्यावर तो त्यांना म्हणाला, “बंधुजनहो, मी आपल्या लोकांविरूद्ध आणि पूर्वजांच्या संप्रदायाविरुद्ध काही केले नसता मला येरुशलेममध्ये बंदिवान करून रोमी लोकांच्या हाती देण्यात आले. त्यांनी चौकशी केल्यावर माझ्याकडे मरणदंडास पात्र असा काही गुन्हा नसल्यामुळे ते मला सोडू पाहत होते, परंतु यहुद्यांनी विरोध केल्यामुळे कैसराजवळ न्याय मागणे मला भाग पडले; तरी मला आपल्या राष्ट्रांवर काही दोषारोप करावयाचा होता असे नाही. ह्याकरता तुमची भेट घेऊन तुम्हांबरोबर भाषण करावे म्हणून तुम्हांला बोलावले, इस्त्राएलच्या आशेमुळे मी ह्या साखळीने बांधलेला आहे.” तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी दोन वर्षे राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११ :४-५,७
प्रतिसाद : हे प्रभो, सज्जनांना तुझे दर्शन होईल.
१) परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. परमेश्वराचे सिंहासन स्वर्गात आहे. त्याचे नेत्र मानवांना पाहतात. त्याच्या पापण्या त्यांना अजमावतात.
२) प्रभू सज्जनांची आणि दुर्जनांचीही परीक्षा करतो. पण अत्याचारी माणसांचा त्याला अगदी मनापासून वीट येतो.
३) परमेश्वर न्यायी आहे. त्याला धार्मिकता प्रिय आहे. सज्जनांना त्याचे दर्शन होईल.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान २१:२०-२५
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जो ह्या गोष्टींविषयी साक्ष देतो तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हांला माहित आहे."
पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लवून “प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे ?" असे म्हणाला होता त्याला त्याने मागे चालताना पाहिले. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, "प्रभू ह्याचे काय ?" येशूने त्याला म्हटले, "मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय ? तू माझ्या मागे ये." ह्यावरून तो शिष्य मरणार नाही अशी वाच्यता बंधुवर्गामध्ये पसरली; तरी तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते, तर मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय ?" असे म्हटले होते.
जो ह्या गोष्टींविषयी साक्ष देतो आणि ज्याने ह्या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- आपण नेहमी स्वतःची तुलना इतरांशी का करतो ? इतर आपल्यापेक्षा अधिक भाग्यशाली असल्यास माझ्या पोटात दुखते का ? मला त्यांचा हेवा वाटतो का? पेत्र येशूला योहानाच्या भविष्याविषयी प्रश्न विचारतो. येशूने पेत्राविषयी भाकीत केले होते की, ख्रिस्तावरील श्रद्धेमुळे त्याला रक्तसाक्षीत्वाचे मरण येईल. मग योहानाच्या जीवनात काय होईल ? योहान दीर्घकाळ जगेल असा येशूच्या बोलण्यातून अर्थ निघतो. वास्तविक योहान इतर प्रेषितापेक्षाही अधिक काळ जगेल. येशू म्हणतो, तुम्ही माझ्यामागे या, तुम्हाला विपुल जीवन मिळेल. येशूने पेत्र आणि योहान ह्या दोघांना त्याचे शिष्य होण्यासाठी बोलाविले होते. असे असले तरी, दोघांना निराळी कामगिरी आणि मिशन सोपविले होते. योहानाची मुख्य कामगिरी ही होती की, जगाला ख्रिस्ताची साक्ष देणे, त्याचा साक्षीदार होणे. योहानाला दीर्घायुष्य मिळाले त्याने शुभवर्तमान लिहून प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष दिली. योहान शुभवर्तमानाच्या शेवटी लिहीतो, येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कृत्य आहेत, ती सर्व एक एक लिहीली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाहीत, असे मला वाटते.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या आज्ञेप्रमाणे जीवन जगून तुला अनुसरण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.

0 टिप्पण्या