पुनरुत्थान
सातवा सप्ताह
शुक्रवार
२१ मे २०२१
संत क्रिस्तोफर मागलाने
व त्याचे सहकारी
रक्तसाक्षी
"I am innocent and I die innocent; I forgive the authors of my death from my heart andI ask God that my blood would serve to bring peace to divided Mexicans."
✝️
प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यगणातील सर्वात अनुभवी आणि श्रद्धावान व्यक्तीला पुनरुत्थानानंतर ख्रिस्त महान जबाबदारी स्वीकारण्यास सांगतो. 'तू माझ्यावर प्रीति करतोस काय?' हा प्रश्न ख्रिस्ताने पेत्राला तीन वेळा विचारला. हेतू पूर्वक विचारलेल्या त्या प्रश्नाला पेत्राने होकारार्थी उत्तर दिले आणि ख्रिस्ताने पेत्राला संपूर्ण ख्रिस्तसभेची (मेंढरे चार) काळजी घेण्याची जबाबदारी दिली. ख्रिस्तसभेचा प्रमुख म्हणून ख्रिस्ताच्या पुनरुत्थान व स्वर्गरोहणानंतर संत पेत्राने पहिले पोप म्हणून यशस्वीपणे धुरा वाहिली.
सर्व दीक्षीत धर्मगुरुंना विशिष्ट क्षेत्रात व परिसरात श्रद्धावंतांची आध्यात्मिक काळजी घेण्याची जबाबदारी दिलेली आहे. सर्वांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणे, ख्रिस्तीसंस्कार देणे आणि प्रबोधनात्मक प्रशिक्षण देणे हे कार्य ख्रिस्तसभेमार्फत चालते. देवापासून दूर गेलेल्यांना आणि अनीतिचा मार्ग अवलंबलेल्यांना ख्रिस्ताकडे आणणे व त्यांचे परिवर्तन घडविणे अशा अनेक कार्यासाठी धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिंनी कार्यरत आहेत. दुःखित, पीडित आणि समाजाने बहिष्कृत केलेल्या अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या अनेक ख्रिस्ती संस्था ख्रिस्तसभेमध्ये कार्यरत आहेत.
सद्या मूलगामी ख्रिस्ती समूह भावना वाढीस लागत असून धर्मग्राम आणि गावपरिवारात अनेक सेवकनेते आपापल्या परिसरात ख्रिस्ताचे सेवाकार्य करीत आहेत. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्याची संधी अशा प्रकारे अनेकांना लाभत आहे. ख्रिस्ताचे अनुकरण करुन त्याची सुवार्ता पसरविण्याच्या ह्या कार्यात सर्वांना सामर्थ्य, धैर्य व कृपा मिळवी म्हणून आज प्रार्थना करु या.
✝️
“योहानच्या पुत्रा शिमोन, माझ्यावर प्रीती करतोस काय ?"
✝️
पहिले वाचन प्रे. कृ. २५: १३-२१
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मृत झालेला येशू जिवंत आहे असे पौल म्हणतो.”
अग्रिप्पा राजा आणि बर्णीका ही दोघे कैसरियास येऊन फेस्ताला भेटली. तेथे ती पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलचे प्रकरण काढून म्हटले, "फेलिक्सने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे. मी येरुशलेममध्ये गेलो होतो तेव्हा त्याच्यावर यहुद्यांच्या मुख्य याजकांनी आणि वडिलांनी फिर्याद करून त्याच्याविरूद्ध ठराव व्हावा म्हणून विनंती केली. त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी आणि वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरिता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही. ह्यास्तव येथे आल्यावर काही उशीर न करता, दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणावयाचा हुकूम केला. वादी उभे असता ज्या वाईट गोष्टींचा त्याच्याविषयी माझ्या मनात संशय आला होता, त्याबाबत एकही आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला नाही; केवळ त्यांच्या धर्माविषयी आणि जो जिवंत आहे म्हणून पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू, ह्याच्याविषयी ह्याचा आणि त्यांचा वाद होता. तेव्हा ह्याची चौकशी कशी चालवावी हे मला सुचेनासे झाल्यामुळे मी त्याला विचारले, येरुशलेममध्ये जाऊन तेथे ह्या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय ? तेव्हा बादशहाच्या निकालासाठी मला ठेवावे अशी पौलने मागणी केल्यावरून मी हुकूम केला की, ह्याला कैसराकडे पाठवीपर्यंत कैदेत ठेवावे.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १०३ :१-२,११-१२,१९-२०
प्रतिसाद : परमेश्वराने आपले सिंहासन आकाशात स्थापले आहे.
१) हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको.
२) कारण जसे पृथ्वीच्यावर आकाश फार उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आम्हांपासून दूर केले आहेत.
३) परमेश्वराने आपले सिंहासन आकाशात स्थापले आहे. त्याचे राज्य सर्वांवर आहे. अहो परमेश्वराच्या दिव्यदूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहा आणि त्याचे आज्ञावचन ऐकून त्याप्रमाणे करता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही. मी जात आहे पण पुन्हा तुम्हांकडे येईन आणि तुमची हृदये आनंदाने परिपूर्ण होतील.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान २१:१५-१९
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझी कोकरे चार, माझी मेंढरे चार. "
न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्रला म्हटले, “योहानच्या पुत्रा शिमोन, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय ?" तो त्याला म्हणाला "होय, प्रभू, आपणांवर मी प्रेम करतो, हे आपणांला ठाऊक आहे." त्याने त्याला म्हटले, “माझी कोकरे चार." पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, “योहानच्या पुत्रा शिमोन, माझ्यावर प्रीती करतोस काय ?" तो त्याला म्हणाला, "होय प्रभू, मी आपणांवर प्रेम करतो, हे आपणांला ठाऊक आहे." त्याने त्याला म्हटले, "माझी मेंढरे पाळ.” तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, “योहानच्या पुत्रा शिमोन, माझ्यावर प्रेम करतोस काय?" असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, “प्रभू आपणांला सर्व ठाऊक आहे, मी आपणांवर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे." येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार. मी तुला सत्य सांगतो. तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात होतास. परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि दुसरा माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल. (तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करील हे सुचविण्याकरिता तो हे बोलला) आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, “माझ्या मागे ये."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू पेत्राला आणि सर्वांना एक वैयक्तिक प्रश्न विचारतो, तुम्हाला अतिप्रिय असलेल्या कोणत्याही व्यक्ती अथवा वस्तूपेक्षा, तुम्ही माझ्यावर अधिक प्रेम करता का? प्रभू येशूचे प्रेम आकर्षक आणि मौल्यवान कसे आहे ? आपल्या शिष्यांसह बोलताना येशू वारंवार म्हणतो की, देवाचे प्रेम हे अकल्पनीय आहे. १ योहान ४:१६ म्हणते, देव प्रेम आहे. कारण खऱ्या प्रेमाचा निर्माता आणि उगम हा खुद्द देव आहे. देवाचे प्रेम विनाशर्त आणि अमर्यादित असून ते आपण विकत घेऊ शकत नाही. कमवू शकत नाही, त्याची मागणी करू शकत नाही. प्रेम हे देवाचे शुद्ध दान आहे, देव ते आपणांस मुक्तपणे देतो आणि मुक्तहस्ते आपण ते स्वीकारतो. प्रभू येशू आपणांस दाखवून देतो की, प्रेम ही वैयक्तिक निवड आणि मुक्तपणे दिलेले दान आहे. एकाने दुसऱ्यांवर दाखविलेले प्रेम निःस्वार्थी प्रेम हे प्रेम इतरांच्या चांगुलपणा आणि भल्यासाठी असते. सुवार्तिक योहान आपणास सांगतो की, देवाने जगावर एवढे प्रेम केले की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. ज्याने आपल्या तारणासाठी देह धारण केला आणि क्रुसावर बलिदान दिले. आपणांस पापाच्या शक्तीपासून सोडवून त्याने सार्वकालिक जीवन आणि देवासह शांती मिळविली. देवाचे प्रेम आपणांस आरोग्य देते. आपले परिवर्तन करते. आपणांस भीती, स्वार्थीपणा लोभ यापासून मुक्त करते. देवाचे प्रेम आपणास त्याच्या काळजाकडे नेते. हे प्रेम आपल्यात जे चांगले आहे ते देवाला देण्यास भाग पाडते. आपली दाने, वेळ, कलाकौशल्य आणि साधन संपत्ती, निष्ठा आणि आपले जीवन.
प्रार्थना : हे प्रभू येशू, ख्रिस्तसभेतील आमचे परमगुरूस्वामी, महागुरूस्वामी, धर्मगुरू, धर्मबंधु, धर्मभगिनी व सर्व प्रापंचिक सेवकनेते यांस कार्य करण्यास विशेष कृपा दे, आमेन.

0 टिप्पण्या