पुनरुत्थान
सातवा सप्ताह
गुरुवार
२० मे २०२१
(सिएनाची संत बर्नडीन)
आपल्या सर्व कृत्यांमध्ये प्रथम देवाला आणि त्याच्या राज्याला अग्रक्रम द्या. बंधुत्वाचे नाते दृढ करा. इतरांना जे शिकवायचे ते प्रथम आचरणात आणा.
संत बर्नाडिन
✝️
देवप्रीतिचे दैवी गुण आपणासर्वांमध्ये असावेत म्हणून प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात देवपित्याकडे आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करीत आहे. प्रभू येशू विशेष करुन आज देवपित्याला सांगतो की, 'जी प्रीति तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये (आपल्या सर्वांमध्ये) असावी'. म्हणजे, आपल्या विचारात, आपल्या बोलण्यात, आपल्या कृतीत म्हणजेच आचरणात ख्रिस्ताची प्रीति व ख्रिस्ताची वचने सदैव असावित, प्रीति म्हणजेच दया, क्षमा, सेवा, परोपकार. देवाची प्रीति आपल्याद्वारे इतरापर्यंत पोहाचावी म्हणूच प्रभू येशू आपल्यासर्वांसाठी देवपित्याकडे प्रार्थना करीत आहे.
प्रभूची वचने, त्याची शिकवण आपल्याला आत्मसात करावी लागेल, नम्रता, सौम्यता, विश्वासुपणा, चांगुलपणा, शांति, स्नेह, समंजसपणा अशा दैवी गुणांची वाढआपल्यामध्ये होत राहीली पाहिजे. ह्या प्रीतीची सुरुवात आपण स्वतापासून करावी. आपण स्वतःवर प्रीती केली पाहिजे म्हणजेच आपण जसे आहोत तसे सद्गुण-दुर्गुणांसह स्वत: ला स्वीकारावे. परमेश्वराच्या वचनांवर चिंतन करुन देवप्रीति व परस्पर प्रीतिच्या आज्ञाचे चिंतन करावे. विशेषतः आत्मपरीक्षण करावे. परस्परसंबंधाने आपले आचरण कसे आहे ते तपासून पाहावे तरच आपले जीवन परमेश्वरकृपेत वाढत राहील.
परमेश्वरच्या प्रेमाचा, अस्तित्वाचा आणि करुणेचा अनुभव सतत होत राहावा म्हणून आजच्या प्रभू प्रार्थनेत आपण सहभागी होऊ या. परमेश्वराच्या प्रीतिचा अविष्कार आपल्या जीवनात घडत राहावा म्हणून प्रार्थना करु या.
✝️
हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक 'व्हावे,
✝️
पहिले वाचन प्रे. कृ. २२: ३०, २३: ६-११
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"आता तुला रोम शहरात साक्षी द्यावी लागेल."
यहुदी लोकांनी पौलवर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते. म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्याला मोकळे केले आणि मुख्य याजक आणि सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलला खाली आणून त्यांच्यापुढे उभे केले.
तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदुकी आणि एक भाग परुशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, "बंधुजनहो, मी परुशी आणि परुश्याचा पुत्र आहे, आमची आशा आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे." तो हे बोलत आहे तोच परुशी आणि सदुकी ह्यांच्यात भांडण लागून लोकांत फूट पडली. कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत आणि आत्माही नाही, असे सदुकी म्हणतात; परुशी तर ह्या दोन्ही गोष्टी मान्य करतात. तेव्हा मोठी गडबड उडाली आणि जे शास्त्री परुश्याच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काहीजण उठून तणतण करीत म्हणाले, "ह्या माणसाच्या ठायी आम्हाला काही वाईट दिसत नाही. जर आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे?" असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता ते पौलला मारुन टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की, “खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून बराकीत आणावे."त्याच रात्री प्रभू पौलपुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर, जशी तू येरुशलेममध्ये माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १६:१-२,५,७-११
प्रतिसाद : हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्या आश्रयाला आलो आहे.
१) हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. परमेश्वर माझ्या वतनाचा आणि प्याल्याचा वाटा आहे, माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस.
२) परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याला मी धन्यवाद देतो. माझे अंतर्यामही मला रात्री उपदेश करते. मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे; तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.
३) यास्तव माझे हृदय आनंदित होते, माझा आत्मा उल्हासतो; माझा देहही सुरक्षित राहतो. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्ताला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.
४) जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १७:२०-२६
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बापा, त्या सर्वांनी एक होऊन पूर्ण व्हावे."
येशूने स्वर्गाकडे दृष्टी लावून म्हटले, “हे पवित्र बापा, मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक 'व्हावे, कारण तू मला पाठवले असा विश्वास जगाने धरावा. तू जो गौरव मला दिला आहे तो मी त्यांना दिला आहे, जसे आपण एक आहो तसे त्यांनीही एक व्हावे; म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली.. हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहे तसे त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे. जो माझा गौरव तू मला दिला आहे तो त्यांनी पाहावा; कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली. हे नीतिमान बापा, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे. मी तुझे नाव त्यांस कळवले आणि कळवीन. ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- आपणास देवाने का निर्माण केले, हे तुम्हांला ठाऊक आहे का ? त्याने आपणावर कोणते मिशन सोपविले आहे त्यासाठी, त्याची काय योजना आहे? येशूसाठी स्वर्गीय पित्याची योजना आणि मिशन म्हणजे स्वर्गीय पित्याचा गौरव करणे. येशूचे शब्द आणि कृती ही पित्याला गौरव देणारी होती. क्रुसावरील बलिदान पूर्वसंध्येला शेवटच्या भोजनावेळी येशूने आपल्या शिष्यांच्या उपस्थितीत महायाजकाची प्रार्थना केली; हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख. जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. येशूने शिष्यांच्या ऐक्यासाठी तसेच येशूवर विश्वास ठेवणाऱ्या अनुयायांसाठी प्रार्थना केली. येशूची त्याच्या लोकांसाठी प्रार्थना हीच की, पवित्र आत्म्याद्वारे पिता व पुत्रासह एक होऊन ख्रिस्ताच्या शरीराचे सभासद म्हणून आपण एकत्रित असावेत. जगाच्या पापक्षमेसाठी क्रुसावर प्राणार्पण करण्यासाठी येशूला काय आणि कोणी प्रेरित केले तर प्रेम. स्वर्गीयपित्यावरील प्रेम, देवाची प्रतिमा आणि प्रतिरुपासारखे बनलेल्या आपणा प्रत्येकावरील प्रेम. ह्याच एका हेतूने स्वर्गीय पित्याने येशूला जगात पाठविले होते. येशूसाठी पित्याची आज्ञा पाळणे हाच मोठा गौरव होता. क्रुसाला नाकारण्याचा मोह येशूच्या मनात घोळत असतानाच येशू स्वर्गीय पित्याचा शब्द प्रमाण मानतो. येशू पित्याची योजना पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या मानवी बुद्धी आणि शक्तीवर अवलंबून राहिला नाही. तर सर्वस्वी स्वर्गीय पित्याच्या सामर्थ्यांवर.
प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, आमच्याद्वारे ख्रिस्त प्रीतिबिबित व्हावा म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन.

0 टिप्पण्या