पुनरुत्थान
सातवा सप्ताह
मंगळवार
१८ मे २०२१
प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात आपल्या सर्व शिष्यगणांसाठी प्रार्थना करीत आहे. प्रभू म्हणत आहे, 'तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.' जरी शिष्य प्रभूबरोबर होते तरी त्यांनी येशूला पूर्णपणे जाणणे व ओळखणे गरजेचे होते कारण, देवाला ओळखणे म्हणजे पूर्णतया प्रभूची वचने आत्मसात करणे.
प्रभू येशूला व देवपित्याला ओळखण्यासाठी प्रभूच्या वचनांवर चिंतन करणे गरजेचे आहे, कारण प्रभू म्हणतो, 'जी वचने तू (पित्या) मला दिली ती मी त्यांना दिली आहेत.' परमेश्वर पित्याशी प्रभू एकरुप झालेला देवपुत्र होता. पवित्र शास्त्रात म्हटले आहे की, 'देव आपल्या पुत्राच्याद्वारे आपल्याशी बोलला आहे' (इब्री १:२) .बायबल मधील देवाची वचने म्हणजे आपल्या सर्वासाठी सार्वकालिक जीवनाचा अतिमौल्यवान खजिना आहे. बायबल वाचनाद्वारे देवपित्याबरोबर व येशूबरोबर वारंवार आपण संवाद साधला पाहिजे. संत याकोब म्हणतो, ‘खरे धर्माचरण, देवाचे वचन ऐकण्यात, चर्चा करण्यात व ते खऱ्या अर्थाने वागण्यात आहे' (याकोब १:२२-२५).
प्रभूची वचने म्हणजे आध्यात्मिक मेजवानी आहे. त्या वचनांद्वारे आपण ख्रिस्ताशी व देवपित्याशी ऐक्य साधत असतो. आपण पवित्र शास्त्र (बायबल) उघडू या व प्रभूबरोबर बोलू या.
✝️
"जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते माझे आहे "
✝️
पहिले वाचन प्रे. कृ. २०: १७-२७
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
" मी माझी दौड आणि सुवार्ता सांगण्याची सेवा जी मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास नेली आहे. "
पौलने मिलेताहून इफिस येथे निरोप पाठवून मंडळींच्या वडीलजनांना बोलावून घेतले. ते त्याच्याजवळ आल्यावर त्याने त्यांस म्हटले :
“मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून तुम्हांबरोबर नेहमी कसा होतो, म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि यहुद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हांला ठाऊक आहे. जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चार लोकांत आणि घरोघर शिकवण्यात मी कसूर केली नाही. पश्चात्ताप करून देवाकडे वळणे आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहुदी आणि हेल्लेणी ह्यांना मी साक्ष देत होतो. पण आता पाहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन येरुशलेमात जात आहे, तेथे मला काय काय होईल ते माहीत नाही; केवळ इतके कळते की, बंधने आणि संकटे माझी वाट पाहत आहेत; ह्याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करीत नाही, ह्यासाठी मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी, आणि आता पाहा, ज्यांच्यामध्ये मी राज्याची घोषणा करीत फिरलो त्या तुम्हा कोणाच्याही दृष्टीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही, हे मला ठाऊक आहे. म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की, मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हांला सांगण्यास मी कसूर केली नाही.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ६८:१०-११,२०-२१
प्रतिसाद : पृथ्वीवरील राष्ट्रांनो, देवाचे गीत गा.
१) हे देवा, तू विपुल पाऊस पाठवून दिलास;
तुझे वतन कोमेजले होते तेव्हा तू ते यथास्थित केले. त्यात तुझी मंडळी राहिली; हे देवा, तू आपल्या चांगुलपणाने दीनांसाठी बेगमी केली.
२) प्रभूचा धन्यवाद होवो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो; देव हा आमचे तारण आहे, हा आमचा देव आम्हाला संकटातून मुक्त करणारा आहे मृत्यूपासून सुटण्याचे मार्ग दाखवणे हे प्रभू जो परमेश्वर त्याच्याकडे आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १७:१-११
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बापा, तू आपल्या पुत्राचा गौरव कर.'
येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, “हे माझ्या बापा, वेळ आली आहे; पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या पुत्राचा गौरव कर. जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू मनुष्यमात्रावर त्याला अधिकार दिला आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. तर आता हे माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्याजवळ होता त्याच्यायोगे तू आपणाजवळ माझा गौरव कर."
"जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले, ते तुझे होते आणि तू ते मला दिले आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की, जे काही तू मला दिले आहे ते सर्व तुझ्यापासून आहे. कारण जी वचने तू मला दिली ती मी त्यांना दिली आहेत, ती त्यांनी स्वीकारली; मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवले असा त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्यासाठी मी विनंती करतो. मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी करतो. कारण ते तुझे आहेत. जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते माझे आहे आणि त्यांच्या ठायी माझा गौरव झाला आहे. ह्यापुढे मी जगात नाही, मी आता तुझ्याकडे येत आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- शेवटच्या भोजनप्रसंगी येशू आपल्या भाषणात त्याच्या व पित्याच्या गौरवाविषयी सांगतो. हा गौरव काय आहे? येथे येशू क्रुसाविषयी सांगत असून, त्याने क्रूसावर आपल्यासाठी त्याचं जीवन समर्पित केले. क्रुसातून देवाचा गौरव कसा प्रकट होतो ? पापी मनुष्यासाठी, देवाच्या हृदयाची रुंदी आणि येशूच्या तारणदायी बलिदानाचे सामर्थ्य कुसातून तो प्रकट रतो. क्रुसावर बलिदान समर्पित करून येशू मरणापर्यंत आज्ञाधारी झाला. त्याद्वारे त्याने स्वर्गीय पित्याचा सर्वोच्च गौरव केला. सर्वात मोठा सन्मान हा बचावाच्या वेळी संघर्ष करणाऱ्यांचा अथवा आणि त्यातून जीव वाचलेल्यांचा नव्हे तर ज्यांनी आपल्या लोकांसाठी स्वतःच्या जीवनाचा सर्वोच्च त्याग केला, त्यांना मिळतो. आपल्यावरील प्रेमामुळे प्रभू येशूने स्वेच्छेने आणि मोकळ्या मनाने पित्याच्या आज्ञेत राहून क्रुसावर बलिदान दिले. ख्रिस्ताच्या क्रुसाने पवित्र आत्म्याठायी आपणासाठी क्षमा, स्वातंत्र्य आणि नवीन जीवन मिळविले आहे. ह्या पृथ्वीवरील माणसाच्या जीवनात प्रभू येशूच्या क्रुसाशिवाय देवाच्या प्रेमाचा पुरावा मिळणार नाही. क्रुसामध्ये आपणास प्रेमाचा नवा मार्ग दिसतो. क्रुसाचे प्रेम, दयाळू, त्यागी आणि मोजमापापलीकडे असलेले उदार प्रेम होय.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, सर्वकालिक जीवन देणारी वचने जाणून तुला ओळखण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.

0 टिप्पण्या