पुनरुत्थान
सातवा सप्ताह
सोमवार
१७ मे २०२१
संत पास्काल बेलॉन
वर्तनसाक्षी (१५४०-१५९२)
स्पेनमध्ये पेन्टेकॉस्ट या दिवसाला पवित्र आत्म्याचा “पास्का" असे म्हणतात. त्याच दिवशी जन्म झाल्यामुळे एका शेतकऱ्याच्या मुलाला पास्काल असे नाव देण्यात आले. त्याला अगदी बालपणापासून पवित्र मिस्साविषयी विलक्षण आदर वाटत असे. तो अल्कान्ताराच्या सुधारणावादी परंतु अत्यंत शिस्तप्रिय संस्थेमध्ये प्रापंचिक धर्मबंधू म्हणून शिक्षण घेऊ लागला. या संस्थेच्या स्पेनमधील विविध शाखांमध्ये त्याने नम्रपणे द्वारपालक म्हणून काम केले. गोरगरीब व अभागी बंधुभगिनी ह्यांच्याविषयी त्याच्या मनात कमालीची कळकळ होती. अतिपवित्र साक्रामेंतासमोर तो बऱ्याचदा तासन्तास बसलेला आढळत असे. पास्काल १७ मे १५९२ रोजी देवाघरी गेला. पोप आलेक्झांडर आठवे यांनी इ. स. १६९० साली त्याला संतपद बहाल केले आणि १८९७ साली त्याला ख्रिस्तशरीर संमेलनांचा आश्रयदाता संत म्हणून घोषित करण्यात आले.
✝️
इफिस येथील योहान बाप्तिस्ताच्या शिष्यांना संत पौलाने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बोध केला आणि पवित्र आत्म्यानी ओळख करुन दिली. बारा जणांवर हात ठेवून संत पौलाने त्यांचा अभिषेक केला आणि ते सर्व पवित्र आत्म्याठायी परिपूर्ण होऊन प्रभूची सुवार्ता प्रभावीपणे सांगू लागले,
अंधाऱ्या रात्रीनंतर नवीन दिवसाची पहाट येते,
श्रद्धेने नीतिमत्वाचे आणि प्रामाणिक जीवन जगून सेवा करणाऱ्या ख्रिस्ती अनुयायांना आज सुद्धा अनेक संकटांना व अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. आपल्या आजू-बाजूला धर्माच्या आणि जाती व्यवस्थेच्या नावाखाली तसेच राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ख्रिस्ती मंदिरांवर, संस्थांवर व सुवार्ता प्रचारकांवर हल्ले होत आहेत. अत्याचार व अन्यायाने धर्मगुरु आणि धर्मभगिनींना मारहाण केली जात आहे, ह्याची ताजी उदाहरणे आपल्या समोर आहेत.
आपण सर्वजण मृत्युंजय प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. प्रभू येशूने म्हटले आहे. 'पाहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे' (मत्तय २८:२०). म्हणूनच जगाची भीती आपण बाळगू नये. आज प्रभू येशू जणू आपल्या प्रत्येकाला सांगत आहे, 'माझ्यामुळे लोक तुमची नींदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य" (मत्तय ५:११)
✝️
“जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे."
✝️
पहिले वाचन प्रे. कृ. १९: १-८
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांस पवित्र आत्मा मिळाला काय ?"
अपुल्लो करिंथ येथे असता पौल वरच्या प्रांतांमधून जाऊन इफिस येथे पोहचला. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. त्यांना तो म्हणाला, “तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांस पवित्र आत्मा मिळाला काय ?" त्यांनी त्याला म्हटले, “पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही.” तो त्यांना म्हणाला, “मग तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला?" ते म्हणाले, “योहानचा बाप्तिस्मा" पौलने म्हटले, “योहान पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे, तो लोकांना सांगत असे की, माझ्यामागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा.” हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला आणि पौलने त्यांच्यावर हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला; ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले आणि ईश्वरी संदेश देऊ लागले. ते सगळे सुमारे बारा पुरुष होते. नंतर तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत आणि प्रमाण पटवीत निर्भीडपणे तीन महिने बोलत गेला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ६८:२-७
प्रतिसाद : अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा.
१ )देवाने उठावे, त्याच्या वैऱ्यांची दाणादाण होवो. त्याचा द्वेष करणारे त्याच्यापुढून पळोत.जसा धूर फाकतो तशी त्यांची फाकाफाक कर; जसे मेण अग्नीपुढे ठेवले असता वितळते. तसे दुष्ट देवापुढे नष्ट होवोत.
२) परंतु धार्मिक हर्षोत, देवापुढे आनंदोत्सव करोत, हर्षामुळे आनंद करोत. देवाचे गीत गा, त्याच्या नामाचे स्तवन करा. त्याच्यापुढे आनंदोत्सव करा.
३) पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे. एकटे असलेल्यांना देव कुटुंबवत्सल करतो, बंदिवानांना बाहेर काढून भाग्यवान करतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
जा, सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा.
युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हांबरोबर आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १६:२९-३३
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १६:२९-३३
"धीर धरा, मी जगाला जिंकले आहे."
येशूचे शिष्य त्याला म्हणाले, “पाहा, आता आपण उघड बोलता, अन्योक्तीने काही सांगत नाही. आता आम्हांला कळले आहे की, आपल्याला सर्व काही कळते आणि कोणी आपणाला विचारावे ह्याची आपणाला गरज नाही; ह्यावरून आपण देवापासून आला आहा असा आम्ही विश्वास धरतो." येशूने त्यांना उत्तर दिले, "आता तुम्ही विश्वास धरता काय ? पाहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे, की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपआपल्या घरी जाल आणि मला एकटे सोडाल; तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे. माझ्या ठायी तुम्हांला शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- येशू हा देवाचा पुत्र असून त्याला स्वर्गीय पित्याने पाठवले आहे, यावर शिष्यांचा विश्वास कसा बसला? येशू बहुतेक वेळा शिष्यांना दाखल्यांद्वारे शिकवितो, लघुकथा, ज्वलंत प्रतिमा, आणि चित्रभाषेचा उपयोग करून देवराज्याचा उलगडा करीत असे. आपणा प्रत्येकाचे जीवन देवाच्या सामर्थ्याने परिवर्तीत होऊन, आपण त्याच्यासारखे होऊ शकतो. याविषयी येशू त्यांना सांगतो. ह्या लघुकथांचा हेतू हाच की, त्याच्या शिष्यांनी आंतरिक आध्यात्मिक सत्य समजून घेऊन त्यावर चिंतन करावे व त्याचा स्वीकार करावा. येशू आपल्या शिष्यांना त्याचे मिशन व त्याचा या जगात येण्याचा हेतू स्पष्टपणे सांगतो. तो जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पित्याने त्याला ह्या जगात पाठविले. येशू खरोखरच देवापासून आला आहे आणि त्याला देवाचे पूर्ण ज्ञान आहे, असा शिष्यांनी विश्वास व्यक्त केला. येशूच्या प्रतिसादावरून असे दिसून आले की, तो शिष्यांना पूर्णपणे ओळखत होता व त्यांच्याविषयी त्याला पूर्ण समज होती. येशूला त्यांची बलस्थाने आणि दुर्बलस्थानेही माहीत होती. शिष्यांनी येशूवर विश्वास ठेवला तर येशू त्यांना इशारा देतो की, त्यांच्या विश्वासाची परीक्षा होईल, आणि कदाचित ते त्या परीक्षेत अपयशी होतील. जेव्हा तुम्ही परीक्षेत पडता तेव्हा तुम्ही येशूला शोधता का? येशूला कोठे शोधता ? त्याच्या मदतीवर व दयेवर तुम्ही भरवसा ठेवता का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, धैर्याने व धीराने तुझी सुवार्ता परसविण्यास व सर्व प्रकारच्या आव्हानाना सामोरे जाण्यास आम्हाला सामर्थ्य व कृपा दे, आमेन.

0 टिप्पण्या