Marathi Bible Reading | 7th Sunday of the Easter | Ascension of the Lord 16th May 2021

  

पुनरुत्थान 

सातवा रविवार  

१६ मे  २०२१ 



(प्रभू येशूचे स्वर्गरोहण-सोहळा)

✝️


पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्त चाळीस दिवस आपल्या शिष्यांबरोबर त्यांना दर्शन देत देवराज्याच्या गोष्टी सांगत असे (प्र. कृ. १३).  आपल्या शिष्यांची जडण घडण झाल्यानंतर प्रभू येशूने त्यांना पवित्र आत्म्याच्या  देणगीचे आश्वासन दिले. प्रभू त्यांना म्हणाला, 'पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी  व्हाल. '
 आज प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला पवित्र आत्म्याच्या कृपादानाचे  आश्वासन देऊन त्याची अखरेची आज्ञा पाळण्याचे आवाहन करीत आहे. खरे पाहता आपल्या सर्वांना त्यामुळे स्वर्ग राज्याचे आश्वासना मिळाले आहे. संत  पौल आजच्या दुसऱ्या वाचनात सांगत आहे, ‘सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य,  धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेहि नाव घ्या त्या सर्वाहून उंच करुन त्याला (येशूला) स्वर्गात आपल्या उजवीकडे (देवपित्याने) बसविले आहे.'
प्रभू येशूच्या स्वर्गरोहणामुळे आपल्या प्रत्येकाची सार्वकालिक जीवनाची आशा दृढ झाली आहे. मात्र प्रभूची सुवार्ता जगभर पसरविण्याची  जबाबदारी प्रभू येशूने आपल्या प्रत्येकावर सोपविलेली आहे. आपल्या  विचारांनी, शब्दानी आणि कृतीने ख्रिस्ताची सुवार्ता परसवू या आणि प्रभू येशूचे  साक्षीदार बनू या.
✝️

“सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.' 
✝️
             
पहिले वाचन प्रे. कृ.  १: १-११

वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन

 “त्यांच्या डोळ्यांदेखत येशू वर घेतला गेला.”

हे थियफिला, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्याद्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला, त्या दिवसांपर्यंत त्याने जे जे करायला आणि शिकवायला आरंभिले होते त्या सर्वांविषयी मी पहिल्या ग्रंथात लिहिले होते. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखवले. चाळीस दिवसपर्यंत येशू त्यांना दर्शन देत असे आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो आणि ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की, येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पाहा. कारण योहानने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल.
ह्यास्तव ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, “प्रभो, ह्याच काळात तुम्ही इस्राएलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?" तो त्यांना म्हणाला, "जे काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हांकडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुम्हांवर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल आणि येरुशलेमेत, सर्व यहुदियात, शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल." असे सांगितल्यावर त्याच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहात होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, “अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहात उभे राहिला? हा जो येशू तुम्हांपासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले, तसाच येईल."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ४७:२-३,६-९

प्रतिसाद : जयघोष होत असता देव वर गेला आहे.

१) अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा, 
उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा ! 
कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे, 
तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.

२) जयघोष होत असता देव वर गेला आहे,
 कर्ण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. 
देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा; 
आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा.

३) देव सर्व पृथ्वीचा राजा आहे, 
तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा. 
देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे; 
देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे.


दुसरे वाचन इफिसकरांस पत्र  १:१७-२३ 

वाचक  : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"परमेश्वराने येशूला स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. "

आपला प्रभू येशू ख्रिस्त हाच देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हाला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा; म्हणजे त्यामुळे तुमचे अंत:चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्याच्या सामर्थ्याने अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे असे म्हणून त्यांला मंडळीला दिले. हीच मंडळी त्याचे शरीर होय. हिच्याचद्वारे तो आपले कार्य सर्वत्र आणि सर्व प्रकारे पुरे करतो.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.
आलेलुया!

शुभवर्तमान मार्क  १६:१५-२०

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "प्रभू येशू वर स्वगीत घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला आहे."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असतील : ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्यानव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील आणि कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही; त्यांनी दुखणाईतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.” ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजवीकडे बसला. त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होता आणि घडणाऱ्या चिन्हांच्या द्वारे वचनाचे समर्थन करीत होता.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :ख्रिस्तसभा आज येशूच्या स्वर्गारोहणाचा सोहळा साजरा करीत आहे. येशूचे स्वर्गारोहण व मरियेचे स्वर्गनयन यांमध्ये फरक आहे. येशू स्वर्गाच चढला तो स्वतःच्या सामर्थ्याने. पवित्र मरिया स्वर्गात घेतली गेली ते देवाच्या सामर्थ्याने. प्रभू येशूचे स्वर्गारोहण आपल्याला पाच सत्ये सादर करते. १) येशू हा संपूर्ण विश्वाचा स्वामी आहे : दुसऱ्या वाचनात सांगितल्याप्रमाणे त्याच्या मृत्यूनंतर येशू अधोलोकात उतरला. त्याच्या पुनरुत्थानानंतर तो जेरुसलेम व गालीलात फिरत राहिला. आता तो स्वर्गात चढतो  म्हणजेच स्वर्गात, पृथ्वीवर आणि अधोलोकात त्याला सर्व अधिकार देण्यात आलेला आहे. 
२) येशू युगाच्या शेवटी पुन्हा येईल : आजच्या पहिल्या वाचनात येशू स्वर्गात गेल्यावर दोन शुभ्र वस्त्रधारी पुरुष गालीलकरांच्या दृष्टीस पडले. त्यांनी त्यांना येशूच्या पुनरागमनाची वार्ता सांगितले. 
३) लवकरच पवित्र आत्मा अवतरेल : येशूने आपल्या प्रेषितांना सांगितले की जेरुसलेम सोडून जाऊ नका तर पित्याने देऊ केलेली देणगी (पवित्र आत्मा) मिळेपर्यंत येथेच राहा. आपल्या निरोपाच्या भाषणातदेखील येशू शिष्यांना सांगतो, 'मी जर गेलो नाही तर कैवारी तुम्हांवर येणार नाही. 
४) येशू सर्व स्थळ - काळाच्या पलीकडे गेला : चाळीस दिवसपर्यंत येशू गालील आणि जेरुसलेम परिसरात प्रेषितांना दर्शन देत असे. परंतु त्याच्या स्वर्गारोहणानंतर तो संपूर्ण जगात कुठेही कोणालाही दिसू शकतो. तो सर्वत्र उपस्थित आहे. 
५) आपले अंतिम निवासस्थान स्वर्ग आहे : जर ख्रिस्तसभा हे ख्रिस्ताचे शरीर असेल व ख्रिस्त त्या शरीराचे मस्तक असेल तर जिथे आज मस्तक असलेला ख्रिस्त जाऊन पोहोचला आहे तिथे एक दिवस त्याचे शरीर असलेली ख्रिस्तसभा जाऊन पोहोचेल. याचा अर्थ, ख्रिस्तसभा ही यात्रेकरू ख्रिस्तसभा आहे आणि ती स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

आत्मरीक्षण: ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाचा माझ्या विचारसरणीवर व जीवनशैलीवर कोणता प्रभाव पडलेला आहे ? प्रभूच्या पुनरागमनाची तयारी मी कशा प्रकारे करीत आहे! माझ्या जीवनाची वाटचाल स्वर्गाच्या दिशेने होत आहे का ?

प्रार्थना : हे आनंदाच्या उगमा, तुझ्या आनंदात परिपूर्णतेचे जीवन आनुभवण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या