सामान्य काळातील
३०वा सप्ताह
मंगळवार
२६ ऑक्टोबर २०२१
“देवाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे व खामिरासारखे आहे.."
संत एव्हरेस्ट
- परमगुरू, रक्तसाक्षी (१०५)
✝️
प्रभू येशूने देवराज्याविषयी स्पष्टीकरण करताना व्यवहारातील व निसर्गातील अनेक उदाहरणे आपल्यासमोर ठेवली आहेत. मोहरीचा दाणा म्हणजे सकारात्मक रूपाने देवाच्या वचनाची आपल्याला झालेली जाणीव. प्रभू येशूच्या एका वचनाने सुद्धा आपल्या जीवनाचा कायापालट होऊ शकतो. प्रभूचे वचन अंतःकरणात जोपासून त्याची वाढ होण्यासाठी प्रयत्नशील बनले पाहिजे.
दुसरे उदाहरण- ज्याप्रमाणे खमिरामुळे पीठ फुगते त्याप्रमाणे प्रभूच्या एका वचनामुळे माणसाच्या जीवनाला प्रफुल्लता प्राप्त होऊ शकते. परमेश्वराचे वचन आपल्या सर्वांच्या जीवनाचे परिवर्तन करुन महान कार्य करण्यास समर्थ आहे.
श्रद्धेने आपण प्रभूचा शब्द स्वीकारावा, आपल्या अंत:करणात खोल रुजवावा आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा. आपले जीवन समृद्ध प्रीतिने भरलेले व कृपेने बहरलेले आपल्याला दिसून येईल. आपण आज निश्चय करु या की, दररोज बायबल वाचन, चिंतन मनन करुन आपण आपले सर्वस्व देवाठायी समर्पित करु या.
✝️
पहिले वाचन : रोम ८:१८-२५
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"सृष्टी, देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे."
आपल्यासाठी जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. कारण सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करण्याऱ्यामुळे. तरीपण सृष्टी देखील स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते. आपल्याला ठाऊक आहे की, सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे आणि वेदना भोग आहे, इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपणाला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठायी कण्हत आहो. कारण आपण आशा धरून तारण पावलो. जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील? पण अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करीत असतो.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १२६: १-६
प्रतिसाद : परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.
१) सियोनातून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा
परमेश्वराने परत आणले तेव्हा आम्ही स्वप्नात आहो
असे आम्हाला वाटले.
तेव्हा आमचे मुख हास्याने आमची
जीभ जयघोषाने भरली.
२) अन्य राष्ट्रांतील लोक म्हणू लागले की,
“परमेश्वराने ह्यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.
"परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.
त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे.
३) हे परमेश्वरा, नेगेब येथील ओढ्याप्रमाणे
आम्हाला बंदिवासातून परत आण.
जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हषीने कापणी करतील.
जे पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतात
ते खात्रीने आनंद करत आपल्या पेंढ्या घेऊन येतील.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे, तू आम्हाला सत्यात समर्पित कर.
शुभवर्तमान लूक १३:१८-२१
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तो दाणा वाढून त्याचे झाड झाले.
येशू म्हणाला, "देवाचे राज्य कशासारखे आहे? मी त्याला कशाची उपमा देऊ? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात पेरला, मग तो वाढून त्याचे झाड झाले आणि आकाशातील पाखरे त्याच्या फाद्यांत राहूलागले ?
तो आणखी म्हणाला, “मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ ? ते खमिरासारखे आहे, ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:आजचे दोन्ही दाखले परमेश्वराच्या राज्याबद्दल संकेत देत आहेत. संदेश हाच आहे की, छोट्या छोट्या कृतींचा परिणाम अतिशय मोठा किंवा अफाट होऊ शकतो. असेच देव राज्याची सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींद्वारेहोणार. मोहरीचा दाणा हा अतिशय लहान आहे परंतु मोहरीच्या झाडाची लागवड आठ ते नऊ फुट उंच होत असते. देव राज्याचेही असेच होईल. सुरूवात छोटी असेल पण शेवटचा प्रभाव गौरवपूर्ण असेल. खमिराचा दाखलासुद्धा हाच संदेश देत आहे की, सुरूवात लहान होईल पण परिणाम मोठा असेल. खमिराप्रमाणे देवराज्य सामर्थ्यवान व अपूर्ण असेल. ज्याप्रमाणे बी एका मोठ्या झुडपामध्ये वाढते त्याप्रमाणे देवाचे राज्य परमेश्वराच्या सर्व वैभवात येईल. येशूने बारा प्रेषितांची निवड केली व त्यांनी सुवार्तेचा प्रचार संपूर्ण जगभर केलेला आहे. म्हणून आज जगात सर्वधर्मामध्ये ख्रिस्ती लोकांची संख्या सर्वाधिक आहे. अशाप्रकारे येशूने दिलेल्या मोहरीच्या व खमिराच्या दाखल्याची पूर्णता होत असल्याचे दिसत आहे. देवराज्याची वाढ व्हावी म्हणून माझ्या हातून छोटी छोटी सत्कृत्ये घडत आहेत का ?
प्रार्थना :-हे प्रभू परमेश्वरा, तुझी वचने आमच्या जीवनाला पोषक व पवित्र बनविण्यास समर्थ आहेत. आम्हाला तुझ्या वचनात वाढण्यास कृपा दे, आमेन
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या