सामान्य काळातील
३०वा सप्ताह
बुधवार
२७ ऑक्टोबर २०२१
“अरुंद दरवाजाने आंत जाण्याचा प्रयत्न करा.
संत फ्रुमेन्शिअस
- महागुरू, वर्तनसाक्षी (३०८-३८०)
✝️
आपल्या जीवनात बाल्यावस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत आपण अनेक गोष्टी मिळविण्यासाठी धडपडत असतो. शाळा-कॉलेजच्या पदव्या, नोकरी व्यवसायातील यश, कौटुंबिक जीवनात स्थिरता येण्यासाठी प्रयत्न करणे आपण सोडत नाही. म्हणजेच जन्मापासून मरेपर्यंत सुखा-समाधाने जीवन जगण्यासाठी सर्वांचा आटापिटा चाललेला असतो. जीवन तसे पाहता सोपे नाही, त्यामध्ये अडचणी, संकटे, निराशा, अपयश व अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
प्रभू येशू म्हणत आहे, 'अरुंद दरवाजे आंत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा.' सुख, शांती, समाधान म्हणजेच तारणप्राप्तिचे प्रवेश दार अरुंद आहे, असे प्रभू म्हणतो. भौतिक मार्गाने आणि जगरहाटीच्या अनुकरणाने स्वर्गीय सुख आणि तारण होणे शक्य नाही. कारण जीवनाचा खरा मार्ग स्वतः प्रभू येशू आहे. म्हणजेच सार्वकालिक जीवनाचे प्रवेशद्वार खुद्द प्रभू येशू आहे. प्रभू येशूच्या शिकवणुकीनुसार व त्याने सांगितलेल्या मार्गाचा अवलंब केल्याशिवाय ह्या सर्व गोष्टी सोप्या होणार नाहीत. ख्रिस्ती जीवन सहज सोपे नाही, मात्र आपल्या जीवनाचा केंद्रबिंदु जर प्रभू येशू असेल तर सर्व काही शक्य आहे. प्रभू येशूची शिकवण आचरणात आणून प्रभू सांगतो त्याप्रमाणे अरुंद दरवाज्याने आपण नेटाने आंत जाण्याचा प्रयत्न केल्यास अरूंद दिसणारा दरवाजा आपोआप प्रशस्त व मोठा बनू शकतो. जीवन जगणे हा खूप खडतर प्रवास आहे मात्र मार्ग प्रभूचा असल्यास सर्व सहज सोपे बनते
✝️
पहिले वाचन : रोम ८:२६-३०
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"देवावर प्रीती करणाऱ्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात."
आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, परंतु आत्मा स्वतः अनिवाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो. पण अंतर्याम पारखणायला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण आत्मा पवित्रजनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो.
आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून त्या कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना अगोदरच नेमून ठेवले, तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा, हा हेतू होता. ज्यांना त्याने अगोदर नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १३: ४-७
प्रतिसाद : प्रभो, मी तुझ्या दयेवर विसंबून आहे.
१) परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे पाहा,
मला उत्तर दे. मला मृत्युनिद्रा येऊ नये
म्हणून माझे डोळे प्रकाशित कर,
नाही तर “मी ह्याला जिंकलं"
असे माझा वैरी म्हणेल. आणि माझ्यावर
पतनाबद्दल माझे शत्रू उल्हासतील.
२) मी तुझ्या दयेवर विसंबून आहे.
माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्हासेल.
परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत.
म्हणून मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभो, तुझ्या पुत्रांची वचने स्वीकारण्यासाठी आमचे अंतःकरण प्रफुल्लित कर.
शुभवर्तमान लूक १३:२२-२०
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील."
येशू गावोगावी आणि खेडोपाडी शिक्षण देत देत येरुशलेमकडे चालला होता. तेव्हा कोणाएकाने त्याला म्हटले, “प्रभो, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?" तो त्यांना म्हणाला, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. कारण मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकत म्हणू लागाल, प्रभुजी, आम्हांसाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हांला उत्तर देईल, तुम्ही कोठले आहा, हे मला माहीत नाही. तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, आम्ही तुमच्याबरोबर खाणेपिणे केले आणि तुम्ही आमच्या रस्त्यांवरशिक्षण दिले. परंतु तो म्हणेल, मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कोठले आहा हे मला माहीत नाही. अहो, सर्व अधर्म करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा. तुम्ही जेव्हा आब्राहाम, इसहाक, याकोब आणि सर्व संदेष्टे ह्यांना देवाच्या राज्यात असलेले आणि आपणास बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तुम्ही रडाल व दातओठ खाल. पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून, उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील आणि पाहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत आणि जे शेवटले होतील असे काही पहिले आहेत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: जर सुरूवात लहान असेल परंतु परिणाम चांगला असेल तर बऱ्याच जणांचे तारण उत्तर होईल की, काही मोजके असतील असा प्रश्न येशूला विचारण्यात आला आहे. त्याचे विरोधाभासी आहे. घर मालकाने अनेक लोकांना आमंत्रित केलेले आहे आणि काहींनी असे गृहीत धरले की, त्यांना सोप्पा असा प्रवेश देण्यात येईल. परंतु अशा व्यक्तींची फार निराशा होईल. कारण त्यांच्याकडे पाठ फिरवली जाईल. शेवटी जे दुरून येतील अशा व्यक्तींना घरात प्रवेश देण्यात येईल. अरूंद मार्ग आणि विस्तीर्ण मार्ग यांच्यात असलेला विरोधाभास आपल्याला दिसत आहे. आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू दोन मुद्दे स्पष्ट करतो, पहिला म्हणजे येशू आपल्या अनुयायांना अरुंद दरवाजाने जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. अरुंद मार्ग म्हणजे क्रुसाचा आणि कष्टाचा मार्ग. दुसरा म्हणजे शेवटी आश्चर्यकारक बदल घडतील. ते म्हणजे ज्यांना असे वाटते की त्यांना प्रवेश मिळेल अशांना प्रवेश दिला जाणार नाही आणि जे उरलेले आहेत ज्यांना असे वाटते की देवाच्या सहवासातून त्यांना वगळले आहे अशा लोकांना सर्वप्रथम देवराज्यात स्थान प्राप्त होईल. जीवनातील दुःखातून पळवाट काढण्यासाठी मी रुंद मार्गाचा उपयोग करतो ?
प्रार्थना :- हे प्रभू परमेश्वरा, तूच मार्ग व जीवन आहेस, आम्ही सर्वस्वी तुला शरण येतो. तू आमचा मार्ग सुकर बनव, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या