Marathi Bible Reading | Thursday 28th October 2021 |30th week in ordinary Time |

    सामान्य  काळातील 

३०वा सप्ताह  

गुरुवार   

२८ ऑक्टोबर   २०२१

येशू प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला."


संत सायमन व ज्यूड
-प्रेषित, रक्तसाक्षी (१ ले शतक)

 ✝️  

संत सायमन

खरे पाहता येशूचा एक शिष्य सायमन अथवा शिमोन ह्याच्याविषयी इतिहासात फारशी माहिती कुठेही उपलब्ध नाही. त्याला जिलोत म्हटलेला सिमोन (लूक ६:१५) किंवा शिमोन कनानी (मार्क ३:१८) असे म्हटलेले आहे. येशूने पुकारलेल्या प्रेषितांच्या यादीमध्ये शक्यतो त्याचा क्रम अकरावा लागलेला आढळतो.. जिलोत ह्या नावावरून एक तर त्याला मोशेच्या नियमशास्त्राची इतकी आवड असेल की त्याला वकील किंवा कायदेतज्ज्ञ म्हणून समाजात मान्यता मिळालेली असेल अथवा रोमच्या अवजड जोखडाखालून मुक्त होण्यासाठी बंड पुकारणा देशभक्त झिलट किंवा जिलोत पंथाशी तो संबंधित असावा. ग्रीक आणि कॉप्टिक लोकांच्या परंपरेनुसार सिमोन हा काना येथील लग्नामध्ये वरपक्षाचा होता. अथवा खुद्द वर होता. तेथे येशूने आपला पहिला चमत्कार केला.

पुढे सिमोनने येशूची सुवार्ता कुठे पसरविली, तो कुठे रक्तसाक्षी झाला त्याचे थडगे कुठे आहे ह्याविषयी इतिहासात कोणताही साक्षीपुरावा उपलब्ध नाही. कातडे कमावणारे व लाकूडतोड करणारे यांचा तो आश्रयदाता संत मानला जातो.

संत  ज्यूड

प्रभूचा भाऊ समजला जाणारा धाकटा याकोब ह्याचा ज्यूड हा भाऊ मानला जातो. म्हणजेच तो येशूचा चुलत भाऊ होय. ज्यूड तद्दय किंवा • यहुदा ह्याने नव्या करारात एक पत्र लिहिलेले आहे. संत ऑरिजेन ह्या धर्मपंडिताच्या म्हणण्यानुसार यहुदाने अगदी मोजक्या ओळीत फार मोठे धर्मतत्त्वज्ञान सांगितलेले आहे.

अखेरच्या भोजनाच्या वेळी ह्याच यहुदाने येशूला विचारले, “आपण स्वत: केवळ आम्हा शिष्यांनाच ह्या गोष्टी का सांगता? संपूर्ण जगाला का सांगत नाहीत?" तेव्हा तो त्यांना म्हणाला, "माझ्या आज्ञा पाळून माझ्याशी विश्वासू राहणाऱ्यांनाच मी प्रकट होत असतो” (योहान १४:२२).

संत ज्यूडने विशेषत: पॅलेस्टाईन येथे येशूची सुवार्ता पसरविली त्यानंतर तो पर्शिया व आर्मेनिया या ठिकाणी गेला व रक्तसाक्षी झाला.

पुढे डोमिशियन राजाने संत ज्यूडच्या नातवंडांना गालिलातून रोममध्ये पकडून आणले; परंतु जेव्हा ते राजकीय विरोधक नाहीत हे राजाला कळले तेव्हा त्याने त्यांना सोडून दिले.

संत ज्यूड हा हॉस्पिटलचा आणि निराशग्रस्तांचा आश्रयदाता संत मानला जातो. झांशी ह्या ठिकाणी त्याचे तीर्थस्थान आहे. वसईतील निर्मळ येथे डोंगरमावलीच्या शेजारी त्याची इमाज निराशग्रस्तांना आधार देत उभी आहे. अलिकडे त्याची भक्ती अधिक लोकप्रिय होत आहे.

संकटसमयी, दु:खात, अशक्तपणा अनेक प्रकारचा त्याग व प्रसंगी मरण सहन केले असतांना सुद्धा संतगणांद्वारे ख्रिस्ताचे राज्य प्रगती पथावर  राहिले. अशा सर्व स्थितीत आपण आपला सहभाग देऊन संतांचे कार्य चालू ठेवायचे आहे. कारण अशक्तपणात व संकटसमयी ख्रिस्तप्रभू आपल्या  अधिक जवळ असतो.


✝️

पहिले वाचन :इफिस २:१९-२२

वाचक :  पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"प्रेषित ह्या पायावर तुम्ही रचलेले आहा."

तुम्ही आतापासून परके आणि उपरे नाही, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक आणि देवाच्या घरचे आहा, प्रेषित आणि संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहा. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे, त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठायी वाढत वाढत पवित्र मंदिर होते, प्रभूच्या ठायी तुम्हीही आत्म्याच्याद्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहा.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र २०: २-५
प्रतिसाद :निशीदिनी त्यांचा स्वर पृथ्वी व्यापतो.

१) आकाश देवाचा महिमा वर्णिते, 
अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. 
दिवस दिवसाशी संवाद करतो, 
रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.

२) वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही,
 तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी व्यापतो,
 त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
 हे देवा, आम्ही तुझी स्तुती करतो,
तू प्रभू आहेस हे आम्ही मान्य करतो.
हे प्रभो, प्रेषितांच्या गौरवमय सहवासाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक  ६:२-१६

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन


"येशूने आपल्या शिष्यांमधून बारा जणांना निवडून  त्यांस प्रेषित असे नाव दिले. "

येशू प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यातून पुढील बाराजणांना निवडून त्यांना प्रेषित असे नावही दिले : शिमोन, ह्याला त्याने पेत्र हेही नाव दिले आणि त्याचा भाऊ आंद्रेया, याकोब, योहान, फिलीप, बार्थोलोम्यू, मत्तय, थॉमस, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन, याकोबाचा मुलगा यहूदा आणि जो पुढे विश्वासघातकी निघाला तो यहुदा इस्कर्योत.

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनआज आपण संत सायमन व संत ज्यूड ह्यांचा सण साजरा करीत आहोत. संत सायमन आणि संत ज्यूड ह्यांच्या जीवनाबद्दल आपल्याला |अल्पशी माहिती मिळते. फक्त खात्रीलायक ते दोघे येशूचे शिष्य होते व त्यांची नावे बारा प्रेषितांच्या यादीत नमूद करण्यात आलेली आहेत. दोघेही सर्वसाधारण माणसे होती परंतु येशूचे पाचारण त्यांना झाले व त्यांच्या जीवनाचा कायापलट झाला. प्रभूयेशूने त्यांच्या हृदयाला स्पर्श करून त्यांना परमेश्वराच्या उत्तुंग प्रेमाची जाणीव करून दिली. संत सायमन व संत ज्यूड ह्या दोघांना दोन नावांनी ओळखले जाते. सायमन ह्याला राष्ट्रभक्त किंवा जिलोत म्हणून संबोधण्यात येते. तर ज्यूडला तद्दय म्हणून ओळखण्यात येते. दोघांनी येशूची साक्ष देऊन हौतात्म्य पत्कारून ते रक्तसाक्षी झालेले आहेत. येशूची सुवार्ता पसरविण्यासाठी आपले संपूर्ण जीवन येशूला समर्पित केले व रक्त सांडून आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या जीवनातून आपण हे शिकू शकतो की सर्वसाधारण व्यक्तीसुद्धा संतासारखे पावित्र्याचे व विश्वासाचे जीवन जगू शकतात. ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे आपण आपले जीवन जगतो का ?
प्रार्थना :- हे प्रभू परमेश्वरा, तुझी संतगणाद्वारे आम्हाला प्रेरणा मिळते तुझे सुवार्ताकार्य करण्यास आम्हाला कृपा व शक्ती दे, आमेन,

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या