सामान्य काळातील
३०वा सप्ताह
शुक्रवार
२९ ऑक्टोबर २०२१
“त्याने (येशूने) त्याला जवळ घेऊन बरे केले. "
संत नार्सिसुस
महागुरू, वर्तनसाक्षी (११०-२२२)
✝️
'सर्वांवर अधिराज्य असलेला प्रभू येशू युगानुयुग धन्यवादित देव आहे.' असे संत पौल आजच्या पहिल्या वाचनात सांगत आहे. ह्याचाच अर्थ प्रभू येशू सर्वकाळ सर्वांसाठी सर्व काही आहे. त्याच्याठायी जीवनातील सर्व गोष्टी शक्य आहेत. तो नियमांचा प्रभू असून सर्व मानवी संप्रदाय आणि नियमांच्या पलिकडे आहे.
आजच्या शुभवर्तमानातील जलोदर झालेल्या माणसाला प्रभू येशूने शब्बाथ दिवशी बरे केले. ह्या प्रसंगी परुश्यांच्या घरी येशू भोजनासाठी गेला होता. मात्र शब्बाथाच्या नियमांपलिकडे देवाची दया कार्यरत असते हे प्रभूने सर्वांना पटवून दिले. विशेषत: जलोदर झालेल्या माणसाला येशूने जवळ घेऊन बरे केले. प्रभू येशू काळ, वेळ आणि सर्व नियमांच्यापलिकडे जाऊन त्याची अमर्याद दया व कृपा आपल्यावर प्रदर्शित करतो. आपल्या सभोवताली अनेक माणसे शारीरिक आजाराने त्रस्त आहेत. अशा सर्वांसाठी आपण प्रभूजवळ मध्यस्थी करू शकतो. शक्य झाल्यास अशा सर्व व्याधीग्रस्तांना प्रभूच्या वचनाची मेजवानी देऊन प्रभूच्या सहवासात घेऊन जाऊ शकतो.
असाध्य आजार असलेले, मानसिक व्याधीनी त्रस्त असलेले तसेच दुष्टात्म्यांच्या बंधनात असलेल्या सर्वांसाठी आज आपण विशेष प्रार्थना करु या. प्रभू दयाळू व कृपाळू आहे, त्याचा गुणकारी स्पर्श सर्वांना व्हावा म्हणून आपणत्याची उपासना व आराधना करु या. त्याला गौरवू या व उंचावू या.
✝️
पहिले वाचन :रोम ९:१-५
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"माझ्या बंधुजनांसाठी मी शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती."
मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझी सद्सद्विवेकबुद्धीही पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते की, मला मोठा खेद वाटतो आणि माझ्या अंतःकरणामध्ये अखंड वेदना आहेत. कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती. ते इस्राएली आहेत. दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्त्रदान, उपासना आणि अभिवचने ही त्यांची आहेत. महान पूर्वजही त्यांचे आहेत आणि त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे, तो परमश्रेष्ठ असून युगानुयुगे धन्यवादित देव आहे. आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १४८: १२-१५ , १९-२०
प्रतिसाद : हे येरुशलेम, परमेश्वराचा गौरव कर.
१) हे येरुशलेम, परमेश्वराचा गौरव कर,
हे सियोन, तू आपल्या देवाचे स्तवन कर.
त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत,
त्याने तुझ्या ठायी तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे.
२) तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरितो,
उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतो,
तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो.
त्याचा शब्द फार वेगाने धावतो.
३ )तो याकोबाला आपले वचन
इस्राएलला आपले नियम
आणि निर्णय जाहीर करतो.
कोणत्याही राष्ट्रांबरोबर त्याने असे वर्तन केले नाही.
त्याचे निर्णय ते जाणत नाहीत.
आलेलुया, आलेलुया !
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंतः चक्षू प्रकाशित करो, म्हणजे त्यामुळे त्यांच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही तुम्ही ओळखून घ्यावी.
शुभवर्तमान लूक १४:१-६
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुमच्यापैकी कोणाचा गाढव किंवा बैल विहिरीत पडला तर त्याला शब्बाथ दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय ?"
येशू एका शब्बाथ दिवशी परुश्यातील कोणाएका अधिकाऱ्याच्या घरी भोजनाला गेला, तेव्हा ते त्याच्या पाळतीवर बसले होते आणि पाहा, जलोदर झालेला कोणीएक माणूस त्याच्यासमोर होता. येशूने शास्त्र्यांना आणि परुश्यांना विचारले, शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही? तेव्हा ते गप्प राहिले. मग त्याने त्याला जवळ घेऊन बरे केले आणि जाऊ दिले. मग त्यांना म्हटले, तुमच्यापैकी कोणाचा गाढव किंवा बैल विहिरीत पडला तर तो त्याला शब्बाथ दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय? तेव्हा त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता येईना.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजच्या शुभवर्तमानात प्रभूयेशू जलोदर झालेल्या माणसाला बरे करतो व जवळ असलेल्या शास्त्री व परुश्यांस दोन प्रश्न विचारतो. त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे ते देऊ शकले नाहीत. चमत्कार केल्यानंतर काहीतरी प्रतिक्रिया लोकांकडून किंवा जो व्यक्ती बरा झालेला आहे त्यांच्याकडून येत असते. सर्वसामान्य प्रतिक्रिया अशी होती की, चमत्कार केल्यानंतर |लोकसमुदाय व रोग मुक्त झालेली व्यक्ती देवाचे आणि येशूचे गौरव व स्तुती करायचे. परंतु शास्त्री व परूशी बहुतेक वेळा क्रोध व संताप व्यक्त करायचे. परंतु आज प्रभू येशूने शब्बाथ दिवशी चमत्कार केलेला असतानासुद्धा ते कुठल्याहीप्रकारची प्रतिक्रिया देत नाहीत आणि दोन्ही प्रश्नांची उत्तरे त्यांना देता येत नाही. येशू आज स्पष्ट सांगत आहे की, मानवी प्राथमिकता ही शब्बाथ पाळण्यापेक्षा जे गरजवंत आहेत त्यांना जीवन देणे आहे. पाप बंधनातून मुक्त करून त्यांच्या समस्येचे निरसन करणे हे शब्बाथ पेक्षा अधिक सुखद आहे. माझ्या कौटुंबिक जीवनात मी प्रेमाने वागतो की नियम लादण्याचा प्रयत्न करतो ?
प्रार्थना :- हे प्रभू येशू, आमच्या सर्व आजारी बंधु भगिनींना आम्ही तुझ्या हातात सोपवितो त्यांना तुझ्या प्रेमाचा व करुणेचा स्पर्श कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या