सामान्य  काळातील 

३०वा सप्ताह  

शनिवार  

३० ऑक्टोबर   २०२१


'संत जेरार्ड माझेला

वर्तनसाक्षी (१७२६-१७५५)

"जो कोणी आपणाला उंचावतो तो नमवला जाईल आणि जो आपणाला नमवतो तो उंचावला जाईल.”

 ✝️  

 दक्षिण इटलीतील एका अत्यंत गरीब घराण्यात परंतु भक्तिमान वातावरणात जेरार्डचा जन्म झाला. त्याला मनन-चिंतन, एकांताची खूप आवड होती. अतिपवित्र साक्रामेंताविषयी तर त्याच्या मनात नितांत प्रेम होते. बराच वेळ तो भाकरीच्यारूपात हजर असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताशी मनमोकळेपणाने हितगूज करताना अनेकांना दिसलेला आहे.

तो म्हणत असे, केवळ देवासाठी छळ सहन करा म्हणजे पृथ्वीवरच स्वर्ग अवतरण्याचा परमानंद तुम्ही आपल्या जीवनात अनुभवल्याशिवाय राहणार नाहीत.

वयाच्या २३ व्या वर्षी त्याने रेडेम्प्टोरिस्ट संस्थेमध्ये प्रवेश केला. एक बंधू म्हणून काही काळ त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला आपल्या संस्थेत ठेवून घेतले गेले होते. परंतु त्या काळात त्याने शुद्धता, नम्रता आणि आज्ञाधारकपणा याचे आदर्श जीवनच सर्वांपुढे सादर केले.

आतापर्यंत संस्थेमध्ये दारिद्र्य, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकपणा अशी तीन व्रते स्वीकारली जात होती. जेरार्डने आपल्या वागणुकीने आणखी चौथ्या व्रताची भर घातली. ती म्हणजे जे काही आपण देवासाठी करतो ती आपली प्रार्थनाच असते. ह्याचे भान ठेवून सतत प्रार्थनेची जाणीव ठेवणे.

देवाने त्याला असामान्य आध्यात्मिक कृपादाने दिली होती. त्याला साक्षात्कार होत. अधूनमधून प्रार्थनेच्या वेळी त्याचे शरीर जमिनीपासून उंचावले जाई. एकाच वेळी तो दोन-दोन ठिकाणी उपस्थित राहू शके. संदेश देणे, आत्मे ओळखणे, अलौकिक ज्ञान इ. कलादाने त्याला प्राप्त झालेली होती. सैतान आणि निसर्गाच्या शक्तीवरही मात करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी आलेले होते. 

आपले शरीर त्याने फार मोठ्या प्रायश्चित्त आणि खडतर तपश्चर्येने व उपास तापासाने कह्यात आणलेले होते. उरल्यासुरल्या फावल्या वेळेत तो अतिपवित्र साक्रामेंताची भक्ती करीत असे. कधीकधी साक्रामेंताच्या पेटीसमोरून जाताना येशू आपल्याला बोलावीत आहे. असा आभास होई. तेव्हा तो गुडघे टेकून डोळ्यांत आसवे आणीत म्हणत असे, “हे प्रभो, तुझी परवानगी असेल तर मला माझ्या कामाला जाऊ दे. हे प्रभो, मला क्षमा कर.”त्याच्याहून वयाने मोठे असलेले धर्मगुरू प्रवचन देण्यासाठी मिशनकार्यावर जात असत, तेव्हा त्यांच्या प्रभावी प्रवचनापेक्षा आपल्या कळकळीच्या प्रार्थनेद्वारे आणि आग्रही मध्यस्थीने त्याने कठोर अंतःकरणाच्या पापी लोकांचे परिवर्तन करून दाखविलेले आहे. संत जेरार्ड वयाच्या २९ व्या वर्षी मरण पावले. त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर पुढील हृदयस्पर्शी शब्द लिहिलेले आढळतात, “इथे देवाच्या इच्छेप्रमाणे केले जाते. जोपर्यंत देवाची इच्छा आहे तोपर्यंत त्याच्याच इच्छेप्रमाणे केले जाईल.”

चिंतन : आपण सर्वदा अगदी आनंदाने देवाच्या इच्छेनुसार जीवन जगायला हवे. - संत जेरार्ड माझेला

असाध्य आजार असलेले, मानसिक व्याधीनी त्रस्त असलेले तसेच दुष्टात्म्यांच्या बंधनात असलेल्या सर्वांसाठी आज आपण विशेष प्रार्थना करु या. प्रभू दयाळू व कृपाळू आहे, त्याचा गुणकारी स्पर्श सर्वांना व्हावा म्हणून आपण त्याची उपासना व आराधना करु या. त्याला गौरवूया व उंचावू या.

✝️

पहिले वाचन :रोम  ११:१-२,११-१२, २५-२९

वाचक :  पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन

"यहुदी लोकांचा अव्हेर हा जर जगाचा समेट ठरतो, तर यहुदी लोकांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यातून जिवंत होणे ह्यापेक्षा कमी ठरणार नाही."

मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? कधीच नाही. कारण मीही इस्राएली, आब्राहामच्या कुळातला, बन्यामिनच्या वंशातला आहे. देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही.
तर मी विचारतो, यहुद्यांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? कधीच नाही! तर त्यांच्या ठायी ईर्ष्या निर्माण होण्यासाठी त्यांच्या अपराधाने परराष्ट्रीयांचे तारण झाले आहे. आता त्यांचा अपराध ही जर जगाची संपत्ती आणि त्यांचा हास ही जर परराष्ट्रीयांची सधनता आहे, तर त्यांची भरती झाल्यास ती सधनता किती तरी अधिक होईल.
बंधुजनहो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएल लोक अंशतः अंध झालेले आहेत, अशा रीतीने सर्व इस्राएल लोकांचे तारण होईल. शास्त्रात असे लिहिलेले आहे, "मुक्त करणारा सियोनातून येईल,
तो याकोबापासून अभक्ती दूर करील."
"जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन,
तेव्हा त्यांच्याबरोबर हाच माझा करार होईल."
सुवार्तेच्या दृष्टीने पाहता तुमच्यामुळे ते शत्रू आहेत, परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे प्रियजन आहेत. कारण देवाला आपल्या कृपादानांचा आणि पाचारणाचा अनुताप होत नाही.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ९४: १२-१५ ,१७-१८

प्रतिसाद : परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही.

१) हे परमेश्वरा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, 
ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस, 
तो धन्य. त्याला तू विपत्काली आराम देशील.

२)परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही. 
तो आपले वतन सोडून देणार नाही. 
न्यायी नीतिमानांकडे वळेल आणि 
सरळ मनाचे सर्वजण त्याला अनुसरतील.

३ ) परमेश्वराने मला सहाय्य केले नसते 
तर माझी वस्ती निःशब्दस्थानी केव्हाच झाली असती. 
माझा पाय घसरला असे मी म्हणालो, 
तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या दयेने मला आधार दिला.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
  तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक  १४:१,७-११

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

  “जो कोणी आपणाला उंचावतो तो नमवला जाईल आणि जो आपणाला नमवतो तो उंचावला जाईल."

येशू एका शब्बाथ दिवशी परुश्यातील कोणाएका अधिकाऱ्याच्या घरी भोजनाला गेला, तेव्हा ते त्याच्या पाळतीवर बसले होते.आमंत्रित लोक मुख्य मुख्य आसने कसे निवडून घेत आहेत हे पाहून येशू त्यांना दाखला देऊन म्हणाला: "कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस, कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या मा त्याने आमंत्रण केले असेल, मग ज्याने तुला आणि त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ह्यांना जागा दे, तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील, पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बैस, म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, मित्रा, वर येऊन बैस, म्हणजे तुझ्याबरोबर भोजनाला बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. कारण जो कोणी आपणाला उंचावतो तो नमवला जाईल आणि जो आपणाला नमवतो तो उंचावला जाईल.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनआजच्या दोन छोट्या दाखल्याद्वारे प्रभू महत्वाचा संदेश आपल्याला देत आहे की, स्वतःचे महत्व दाखवून समाजात प्रतिष्ठा व सन्मान प्राप्त होत नाही तर तो इतरांनी आपल्याला दिला पाहिजे. पुन्हा एकदा प्रभूयेशू आपणास नम्र | बनण्यासाठी पाचारण करीत आहे. ख्रिस्ती लोकांचे जीवन हे प्रामाणिकपणा आणि सदाचरणावर अवलंबून असले पाहिजे आणि समाजात आपले जे स्थान आहे ते इतरांकडून स्तुतीसुमने प्राप्त करून घेण्याद्वारे नसावे. आपले ख्रिस्ती ध्येय हे ख्रिस्तमय बनण्यासाठी आहे आणि सामाजिक मान व प्रतिष्ठा मिळवून घेण्यासाठी नव्हे. दोन्ही दाखल्यांद्वारे प्रभू येशू आपल्याला नम्र बनण्याचा आग्रह करीत आहे. जर आपण | स्वतःला उंचावण्याचा व मेजवानीत महत्वाच्या स्थानावर बसण्याचा प्रयत्न केला तर आपली फजिती होईल व लज्जास्पद परिस्थिती निर्माण होईल. जर नम्र होऊन आपण अगदी खालच्या जागेवर बसलो तर सन्मानाची जागा कदाचित आपल्याला प्राप्त होईल. येशू परमेश्वराच्या राज्यातील नवजीवनाचा एक नियम शिकवत आहे आणि तो म्हणजे आपण स्वतःची स्तुती किंवा प्रशंसा करू नये व स्व-केंद्रित बनू नये. जो नम्र आहे त्याला गौरव प्राप्त होईल. इतरांकडून स्तुती व प्रशंसा मिळविण्यास मी प्रयत्न करतो का ?

प्रार्थना :-  हे प्रभू येशू, आमच्या सर्व आजारी बंधु भगिनींना आम्ही तुझ्या हातात सोपवितो त्यांना तुझ्या प्रेमाचा व करुणेचा स्पर्श कर, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️