सामान्य  काळातील ३१वा रविवार 

३१ऑक्टोबर   २०२१ 




“तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, जिवाने व शक्तिने प्रीती कर."  

 ✝️  

 प्रीतिची सर्वोत्कृष्ट व महान अशी आज्ञा परमेश्वराने मोशेद्वारे इस्त्राएली  जनतेला दिली. त्याचबरोबर त्याचे विधी व नियम काटेकोरपणे पाळण्यास सांगितले. परमेश्वराने त्याच्या आज्ञा, नियम व विधी त्यांना त्यांच्या हृदयात साठवून ठेवण्यास सांगितले. 

आज एका शास्त्री माणसाने प्रभू येशूला प्रश्न केला  सर्वात पाहिली आज्ञा कोणती? प्रभू येशूने त्याला उत्तर देताना अनुवाद ग्रंथातून संदर्भ देत म्हटले, 'आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धिने व संपूर्ण शक्तीने प्रीति कर. ' परमेश्वर जो सर्व सृष्टीचा व मानवांचा निर्माता व जीवनदाता आहे. ज्या परमेश्वरेचे सर्व वैभव, सामर्थ्य अनाकलनीय आहे, त्यावर प्रीति करणे रास्त व योग्यच आहे. परमेश्वराने सर्वकाही निर्माण करताना त्याच्या प्रेमाचा अविष्कार केलेला आहे. तर मग त्या परमेश्वराला आपल्या जीवनात अग्रस्थान असणे आवश्यक आहे. 

आपण परमेश्वरावर किती प्रेम करतो? आपले शरीर, आपले मन  आपले हृदय, आपली शक्ती व आपला जीव सर्व काही परमेश्वाचे दिव्य दान आहे. म्हणूनच मनाने, हृदयाने, जिवाने व सर्व शक्तीनीशी परमेश्वरावर प्रेम करणे  महत्त्वाचे आहे. परमेश्वर आपल्या सर्वांवर प्रेम करतो तसे आपण त्यावर प्रेम करणे  रास्त आहे.

आपले जीवन परमेश्वराच्या प्रेमात वाढत असतानाच परस्पर संबंधाने समृद्ध होत असते म्हणूनच देवप्रीतिला परस्पर बंधूप्रीतिची जोड असणे महत्वाचे आहे. परमेश्वर प्रीतिच्या आणि परस्पर प्रीतीच्या उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेले आपले जीवन समृद्धपणे जगण्यासाठी सर्वस्वी देवाला शरण जाऊ या. .

✝️

पहिले वाचन : अनुवाद  ६:२-६

वाचक : अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन ६:२-६

"हे इस्त्राएल, ऐक, तू आपला देव पमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने प्रीती कर."

मोशे लोकसमुदायाला म्हणाला, परमेश्वराने जे सर्व विधी आणि आज्ञा मी तुला सांगत आहे त्या तू आणि तुझे पुत्रपौत्र ह्यांनी तुझा देव परमेश्वर ह्याचे भय बाळगून आमरण पाळाव्या म्हणजे तू दीर्घायू होशील. म्हणून हे इस्राएल, ऐक आणि त्या काळजीपूर्वक पाळ म्हणजे तुझे कल्याण होईल आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने दुधामधाचे प्रवाह असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तू बहुगुणित होशील.

हे इस्राएल, ऐक: आपला देव परमेश्वर हा एकमेव परमेश्वर आहे, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १८: २-४,४७,५१
प्रतिसाद :  हे परमेश्वरा, मी तुझ्यावर प्रेम करतो.

१ )हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, 
मी तुझ्यावर प्रेम करतो, 
परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, 
माझा मुक्तिदाता माझा देव, 
माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी घेतो.
 तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, 
माझा उंच बुरूज आहे. 
स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो,
 तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो.

२) परमेश्वर जिवंत आहे, 
त्या माझ्या दुर्गाला धन्यवाद असो, 
माझे तारण करणाऱ्या देवाचा महिमा वाढो. 
तो आपल्या राजाला मोठाले विजय देतो. 
आणि आपल्या अभिषिक्ताला वात्सल्य दाखवतो.



दुसरे वाचन इब्री  ७:२३-२७

वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन

"ख्रिस्त युगानुयुगे राहणारा असल्यामुळे त्याचे याजकपण अढळ आहे."

जुन्या कराराचे पुष्कळ याजक होऊन गेले, कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे. पण ख्रिस्त युगानुयुगे राहणारा असल्यामुळे त्याचे याजकपण अढळ आहे. ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारायला हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा आणि आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. त्याला त्या प्रमुख याजकाप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याची गरज नाही, कारण त्याने स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. खरोखर नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते, पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन युगानुयुगे परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमते.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे. 
 आलेलुया!


शुभवर्तमान मार्क  १२:२८-३४

वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

  "तू आपला देव परमेश्वर ह्यांच्यावर संपूर्ण मनाने प्रीती कर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर."

शास्त्र्यांपैकी एकजण पुढे आला आणि त्याने येशूला विचारले, “सर्वांत पहिली आज्ञा कोणती?” येशूने उत्तर दिले, “पहिली ही की, हे इस्रायल, ऐक, आपला देव परमेश्वर हा एकमेव परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर. ह्यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही." तो शास्त्री म्हणाला, "गुरुजी, आपण ठीक आणि खरे बोलतात. परमेश्वर एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यांवर प्रीती करणे, हे सर्व होमार्पण आणि यज्ञ ह्यांपेक्षा अधिक आहे." त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” तेव्हापासून त्याला आणखी काही प्रश्न विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही.

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:आजचे पहिले वाचन आणि शुभवर्तमान आपल्यासमोर यहुदी आणि ख्रिस्ती धर्माचा गाभा असलेल्या देवप्रीती व शेजारप्रीती ह्या दोन आज्ञा सादर करतात. तर दुसऱ्या वाचनात पुन्हा एकदा याजक बनून येशूने या दोन्ही स्वरूपाची प्रीती आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृतीत कशी उतरविली त्याचे वर्णन करण्यात आलेले आहे. या दोन आज्ञांच्या पालनाबाबत चार प्रकारचे लोक आपल्याला नव्या करारात भेटतात. 
१) फक्त देवप्रीती मानणारे व शेजारप्रीती डावलणारे : पुष्कळदा देव देव करणारे मात्र प्रत्यक्ष माणसातला देव ओळखण्यात कमी पडतात. येशूने दिलेल्या चांगल्या शोमरोन्याच्या दाखल्यातील याजक व लेवी हे अशाप्रकारच्या सदोष देवप्रीतीचे प्रतिनिधी होत. संत योहान आपल्या पहिल्या पत्रात म्हणतो, 'डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही' (४:२०). 
२) फक्त शेजारप्रीती मानणारे व देवप्रीती डावलणारे देवप्रीती म्हटल्यानंतर त्यामध्ये प्रार्थना व अध्यात्मसाधना तर आलीच परंतु त्यासाठी वेळ काढून एकांत साधावा लागतो. शांतता आणि संयम ह्यांची गरज असते. त्याऐवजीप्रत्यक्ष कृती करणे सोपे वाटल्यामुळे माणूस शेजारप्रीतीच्या नावाखाली स्वतःला कार्यमग्न ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र जी शेजारप्रीती देवप्रीतीवर उभारलेली नसते ती अल्पजिवी, पोकळ व आत्मकेंद्रित असू शकते. येशूने मार्थाला तिच्या दगदगीविषयी सुनावले ते ह्याच कारणास्तव. 
३) देवप्रीती नाही, शेजारप्रीतीही नाही, फक्त स्वतःची महत्वाकांक्षा जपणाऱ्या : अशा व्यक्ती ध्येयनिष्ठा जपणाऱ्या असतात परंतु त्या इतके ध्येयवेड्या असतात की त्यामुळे देव धर्म, अध्यात्म, गोरगरिबांची सेवा यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. हेरोद, पिलात, ज्युदासह्यांच्यासाठी पैसा, सत्ता, अधिकार याला देवापेक्षा व शेजाऱ्यांपेक्षा अधिक महत्त्व होते. 
४) देवप्रीती व शेजारप्रीती ह्यांची सांगड घालणारे : संत योसेफ, पवित्र मरिया, गालालीतील स्त्रिया, निकोदेमस व योसेफ अरिमथाईकर हे आपल्या जीवनात देवप्रीती व शेजारप्रीती ह्यांची सांगड उत्तमरित्या घालणाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. येशूला प्रश्न विचारणारा शास्त्रीदेखील या प्रकारात मोडत असावा. म्हणून येशूने त्याला म्हटले, 'तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.'

आत्मपरीक्षण : मी वरीलपैकी कोणत्या गटात मोडतो? माझ्या जीवनात देवप्रीती व शेजारप्रीती ह्यांच्यात सांगड घालण्यात कोणते अडथळे आहेत ?

प्रार्थना :- हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या प्रीतित वाढण्यास व परस्पर प्रीति करण्यास प्रेरणा दे, आमेन

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️