हे नवीन वर्ष आपल्या सर्वाना प्रभूच्या सहवासात
सुखाचे व भरभराटीचे जावो .
प्रभूजन्मानंतरचा आठवा दिवस
पवित्र देवमाता मरियेचा सोहळा
शनिवार दि. १जानेवारी २०२२
✝️
“मरीया योसेफ व बाळ ही त्यांना सापडली."
पवित्र देवमाता मरियेचा सोहळा
नववर्ष दिनाच्या पहिल्याच दिवशी परमेश्वर मोशेद्वारे इस्त्राएली जनतेला आशीर्वाद प्रदान करीत आहे. मात्र हा भव्य आशीर्वाद कसा असावा ह्याचे स्पष्टीकरण करताना म्हटले आहे की, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करा. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर कृपा करो, परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्नमुख करो अशी तुला शांति देवो, परमेश्वराचे नाव मुद्रित करुन हा भव्य आशीर्वाद आज आपणा सर्वांना मिळत आहे.
देवदुताने दिलेल्या संदेशाप्रमाणे मेंढपाळ बेथलेहेमात गेले आणि त्यांनी मरिया व योसेफ सोबत असलेल्या येशूबाळाचे दर्शन घेतले. पवित्र मरियेच्या जीवनात घटना असलेल्या सर्व अद्भूत घटना तिने आपल्या अंतःकरणात साठविल्या, कारण परमेश्वाठायी मरिया ही देवपुत्राची माता बनली होती. ख्रिस्तसभा आज 'मरिया, देवाची माता' हा सोहळा साजरा करीत आहे. देवाच्या तारणदायी योजनेत पूर्णपणे सहभागी झालेली पवित्र मरिया गाब्रियल दुताच्या संदेशापासून ते कालवरीच्या टेकडीपर्यंत देवाशी एकनिष्ठ राहीली. परमेश्वराची तारणदायी योजना तिला पूर्णपणे माहित होती म्हणूनच तिने परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या योजनेला प्रतिसाद दिला.
आपल्या जीवनात घडलेल्या प्रत्येक घटना मरियामातेने अत: करणात साठविल्या व त्यावर मनन चिंतन केले. देवाच्या इच्छेला प्राध्यान्य देऊन तिने योग्य ती वाट चोखाळली. म्हणूनच ख्रिस्तसभेने तिचा देवमाता मरिया असा सन्मान केला आहे.
✝️
पहिले वाचन गणना ६:२२-२७
वाचक :गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन
“त्यांनी इस्त्राएल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन."
परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोन त्याचे पुत्र यांना असे सांग, तुम्ही इस्राएल लोकांना आशीर्वाद देताना असे म्हणा : परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो, परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुला शांती देवो. या रीतीने त्यांनी इस्राएल लोकांवर माझे नाम मुद्रित करावे म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ६७:२-३,५,६,८
प्रतिसाद : हे देवा, आम्हांला आशीर्वाद दे.
१) हे परमेश्वरा, आम्हांवर दया कर.
आम्हांला आशीर्वाद दे.
तू आपला मुखप्रकाश आम्हांवर पाड.
यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा,
सर्व राष्ट्रांना तू सिद्ध केलेले तारण समजावे.
२) राष्ट्रे हर्षोत व जयघोष करोत कारण
तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करतोस व
पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवतोस.
३) हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत,
सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत.
देव आम्हांला आशीर्वाद देवो व
पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत.
दुसरे वाचन गलतीकरांस पत्र ४:४-७
वाचक : पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“देवाने आपल्या पुत्राला पाठवले, तो स्त्रीपासून जन्मलेला होता."
काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आम्हांला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहा, म्हणून देवाने अब्बा, बापा, अशी हाक मारणाऱ्यांना आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंत:करणात पाठवले आहे. यावरून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस आणि पुत्र आहेस तर देवाद्वारे वारसही आहेस.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
देव प्राचीन काळी निरनिराळ्या मार्गे संदेष्ट्यांच्याद्वारे आमच्या पूर्वजांशी बोलला परंतु ह्या अंतिम काळात तो त्याच्या पुत्राद्वारे आम्हांबरोबर बोलला आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक २:१६-२१
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मरिया, योसेफ व बाळ ही त्यांना सापडली.... आठवा दिवस आला तेव्हा त्याला येशू म्हणण्यात आले."
मेंढपाळ घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळही त्यांना सापडले. त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंत:करणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करीत परत गेले.
आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: उगवत्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण देवमाता पवित्र मरियेचा सण सोहळा साजरा करतो. बेथलेहेममध्ये मेंढपाळांना गुरांच्या गोठ्यात येशूबाळ आणि योसेफ ह्यांच्या बरोबर पवित्र मरियेचे दर्शन घडले. त्या दर्शनामुळे त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ते आनंद आणि उल्हास करीत रस्तोरस्ती येशूच्या जन्माची घोषणा करीत आपापल्या वस्तीत परतले. ख्रिस्तसभा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला पवित्र मरियेचे दर्शन घडविते. ह्यापेक्षा • मोठा आशीर्वाद तो कोणता! पवित्र मरियेचे दर्शन घेऊन आपण संपूर्ण वर्षाची वाटचाल करणार आहोत हे आपले परम भाग्य आहे. "हे मायाळू कुमारी मरिये" ह्या प्रार्थनेत आपण कबूल करतो की, पवित्र मरिया आपल्याला कधीच रिकाम्या हाताने परत पाठवीत नाही. ह्याच विश्वासाने आपण नवीन वर्षाला सामोरे जाणार आहोत. मेंढपाळांप्रमाणे आपणही ज्या येशूला पवित्र मरियेने जन्म दिला त्या येशूच्या जन्माची, त्याच्या जगावेगळ्या तारणदायी शिकवणीची घोषणा आपल्या शब्दांनी आणि आपल्या आदर्श वागण्याद्वारे करणार आहोत.
प्रार्थना :- :हे पवित्र देवमाते, तुझ्या मायेच्या पंखाखाली आम्हाला आश्रय दे व तुझे अनुकरण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आम्हासाठी तुझ्या पुत्राकडे विनंती कर, आमेन
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या