शुभवर्तमान मत्तय २:१-१२
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन २:१-१२ .
"आम्ही त्याचा तारा पाहून त्याला नमन करायला आलो आहोत."
राजा हेरोदच्या अमदानीत, यहूदिया प्रांतातल्या बेथलेहेम येथे येशूचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर काही मागी लोक पूर्वेकडून यरुशलेम येथे आले आणि विचारपूस करू लागले. “यहुद्यांचा राजा जन्माला आला आहे. तो कुठे आहे? आम्ही त्याचा तारा उगवलेला पाहिला म्हणून त्याला मुजरा करायला आम्ही आलोत.”हे ऐकताच राजा हेरोद आणि त्याबरोबर सारे यरुशलेम घाबरून गेले. त्याने यहुद्यांचे प्रमुख पुरोहित व शास्त्री जमवले आणि त्यांना विचारले, "ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हायचा आहे ?” “यहुदियातल्या बेथलेहेम" येथे ते म्हणाले; कारण संदेष्ट्यांने लिहिले आहे. "यहुदा प्रांतातल्या बेथलेहेमा, यहुदाच्या सत्ताधीशापेक्षा तू मुळीच कनिष्ठ नाहीस; कारण तुझ्यातूनच एक नेता उदयाला येईल. आणि तो माझ्या इस्राएल लोकांचा प्रतिपालक होईल."
मग हेरोदाने त्या पूर्वेकडल्या मागी लोकांना गुपचूप बोलावून घेतले आणि तारा नक्की केव्हा दिसू लागला याची वेळ विचारून घेतली. नंतर त्यांना बेथलेहेमला जाण्यास सांगून तो म्हणाला, “तुम्ही जा आणि त्या बाळाचा बारकाईने शोध करा. त्याचा पत्ता लागला की मला खबर द्या, म्हणजे मीपण येऊन त्याला मुजरा करीन.”
राजाच्या सांगण्याप्रमाणे ते निघाले. जाता जाता त्यांना पूर्वी जो तारा पूर्वेस उगवलेला दिसला होता तो पुन्हा दिसू लागला. तो त्यांच्या पुढे पुढे जात होता. मग जेथे ते बाळ होते तेथे तो वर थांबला. तारा पाहून त्यांना खूपच आनंद झाला होता. ते घरात गेले तेव्हा ते बाळ आपली आई मरिया हिच्याजवळ असलेले त्यांना आढळले. बाळाच्या पायावर डोके ठेवून त्यांनी त्याला नमन केले. आपल्या थैल्या सोडून त्याला सोने, ऊद व गंधरस यांचे नजराणे दिले. मग ‘हेरोदाकडे परत जाऊ नका,' अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या वाटेने आपल्या देशाला निघून गेले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: प्रभू येशू ख्रिस्त जरी बेथलेहेम येथे जन्माला आलेला असला, तो दाविदाच्या घराण्यात, यहुदा वंशात आणि यहुदी धर्मात व समाजात जरी जन्मलेला असला तरी सर्वांसाठी या जगात आलेला होता. हे सत्य आजच्या सोहळ्याद्वारे ख्रिस्तसभा साजरे करते. त्यासाठी आजच्या वाचनांमध्ये प्रकाशाचे प्रतिक वापरण्यात आलेले आहे. तीन प्रकारच्या लोकांनी हे प्रकटीकरण अनुभवले :
१. बाबिलोनहून परतलेले इस्राएली लोकः जगाच्या कल्याणास संतांच्या विभूती किंवा “बुडती हे जन न देखवे डोळा” ह्या उक्तीनुसार जेव्हा जेव्हा इस्राएली लोकांच्या जीवनात अडी-अडचणी व संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तेव्हा परमेश्वराने यशया, यिर्मया, यहेज्केल यासारखे संदेष्टे त्यांच्याकडे पाठविले. त्यांनी लोकांना निराशेच्या काळोखातून बाहेर पडण्यास मदत केली. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा लोकांसमोर असेच एक उज्ज्वल भविष्याचे स्वप्न सादर करतो. त्या स्वप्नात सर्वप्रकारचे लोक, राष्ट्रे, स्त्रिया, पुरुष, राजे, उंट, सोने, ऊद अशा सर्वांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ख्रिस्ताच्या प्रकट होण्याने ह्या सर्वांना एक नवा प्रकाशझोत लाभला, असे संदेष्टा म्हणतो.
२. विविध धर्मियांच्या विळख्यात सापडलेली इफिस येथील ख्रिस्तमंडळी : इफिसची अर्तमी (म्हणजे डायना देवी) थोर अशा घोषणांनी सदैव दुमदुमणारे एक मंदिर इफिसमध्ये होते. तेथील धर्मगुरू व संदेष्टे लोकांना देवाच्या नावाने पारमर्थिक स्वरूपाचा संदेश देत. अशा पार्श्वभूमीवर आपल्याला झालेले प्रकटीकरण अस्सल आहे असा दावा पौल करतो. हे प्रकटीकरण सर्वांसाठी विशेषतः परराष्ट्रीयांसाठी आहे असे तो स्पष्ट करतो. ३. राजाच्या शोधात असलेले तीन राजे : तीन मागी लोकांनी (परराष्ट्रीय) ताऱ्याचा मागोवा घेत येरूशलेमपर्यंत प्रवास केला. बायबलमधील भाकित ऐकून ते बेथलेहेमला गेले. येशूबाळाचे दर्शन झाल्यानंतर देवदूतांच्या सूचनेनुसार ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास गेले. ह्या संपूर्ण प्रवासात निसर्ग, बायबल, लोक, देवदूत आणि साक्षात पवित्र कुटुंब ही त्यांच्यासाठी प्रकटीकरणाची विविध साधने बनली.
आत्मपरीक्षण: येशू सर्वांसाठी जन्मला हे सत्य माझ्या इतरांशी असलेल्या संबंधावर, सुवार्ता प्रसार कार्यावर, मला होणाऱ्या प्रकटीकरणावर व इतर धर्माकडे पाहण्याचा माझा जो दृष्टिकोण आहे त्यावर कोणता प्रकाश पाडते ?
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या