Marathi Bible Reading | Monday 3rd January 2022 |


प्रभू येशूचे पवित्र नाव 

 सोमवार   दि. ३ जानेवारी  २०२२

✝️ 


 “पापाबद्दल पश्चात्ताप करा कारण स्वर्गराज्य जवळ आहे.”


✝️ 


कुरियाकोस एलायस चावरा

व्रतस्थ धर्मगुरू (१८०५-१८७१)
Born10 February 1805, Kainakary
Died3 January 1871, Koonammavu
Feast18 February (Roman Latin Catholic Church) 3 January (Syro-Malabar Church)
Canonized23 November 2014, Rome by Pope Francis

भारतातील केरळ राज्यामधील कयनाकारी येथे १० फेब्रुवारी १८०५ रोजी कुरियाकोस चावरा याचा जन्म झाला. सहा भावंडांमध्ये कुरियाकोस हे सहावे अपत्य होते. त्याचे आईवडिल सिरो मलाबार चर्चचे भक्तिमान कॅथोलिक होते. १८२९ साली धर्मगुरूपदाची दीक्षा स्वीकारल्यानंतर त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या फादर थॉमस पलाक्कल ह्यांचे सहाय्यक म्हणून ते मदत करू लागले. त्याचबरोबर अलिकडे “कार्मेलाईट्स ऑफ मेरी इमॅक्युलेट  (सी. एम्. आय.)" ह्या व्रतस्थांचे संस्थापक फा. थॉमस पोरूकारा ह्यांनाही ते सहाय्य करीत. सह-संस्थापकांच्या मृत्यूनंतर फादर कुरियाकोस ह्यांनी नवीन संघाची जबाबदारी स्वीकारली. आपल्या व्रतविधीच्या वेळी त्यांनी कुरियाकोस एलायस ऑफ द होली फॅमिली हे नाव धारण केले. इ. स. १८५५ साली ह्या संघाला अधिकृत मान्यता प्राप्त झाली त्यावेळी त्यांचा व्रतविधी संपन्न झाला.
ह्या संघाची पहिली शाखा मन्त्रानाम येथे उघडण्यात आली. तसेच फादर चावरा ह्यांच्या हयातीत केरळमध्ये आणखी पाच शाखा उघडण्यात आल्या. फादर चावरा हे विविध क्षेत्रांमध्ये अग्रगण्य होते. सेमिनरी सुरू करणे, शाळा, वृद्धाश्रमे उघडणे, नवख्रिस्तीयांसाठी धर्मशिक्षण वर्ग चालविणे, धर्मगुरू आणि लोकांसाठी तपसाधना आयोजित करणे अशी काही कार्ये पुढे त्यांच्या अनुयायांनीही सुरू ठेवण्यात यश संपादन केले.
आध्यात्मिक, धर्मशिक्षणपर व भक्ती-उपासनेची पुस्तके प्रकाशित करता यावीत म्हणून मोठ्या कष्टाने व अपार मेहनतीने फादर चावरा ह्यांनी छपाईचा कारखाना सुरू केला. पवित्र मिस्साच्या उपासनेमध्ये समानता व एकवाक्यता यावी म्हणून त्यानी उपासनेच्या नियमांचे पुस्तक प्रसिद्ध केले. ते खूप गाजले, धर्मगुरूंच्या एका प्रार्थनापुस्तकाचे व एका दिनदर्शिकेचे संपादनही त्यांनी केले. सिरीयन आणि लॅटीन उपासनाविधीत सहभागी होणाऱ्या केरळच्या कॅथोलिक पंथियांचे कल्याण व्हावे अशी जबरदस्त तळमळ त्यांच्या अंतर्यामी होती.
फादर कुरियाकोस हे अत्यंत प्रार्थनाशील वृत्तीचे होते. पवित्र मरियेवर त्यांची नितांत भक्ती होती. आजाऱ्यांना भेटी देणे त्यांना फार आवडे. संसर्गजन्य रोग झालेल्या रूग्णाईतांनाही ते प्रेमाने वागवीत. अशा आजाऱ्यामध्ये गरीब व गरजू जर असतील तर त्यांच्यावर फादर चावरा ह्यांची मेहेरनजर असायची.
फादर कुरियाकोस ३ जानेवारी १८७१ रोजी स्वर्गवासी झाले. त्यांचे अवशेष १८८९ साली मन्नानाम येथे आणण्यात आले. आज मन्नानाम हे केरळमधील भाविक यात्रेकरूंचे तीर्थक्षेत्र झाले आहे. ८ फेब्रुवारी १९८६ रोजी आपल्या भारतभेटीवर • असताना कोट्टायाम (केरळ) येथे पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी फादर कुरियाकोस ह्यांना धन्यवादित म्हणून घोषित केले.
चिंतन : एकमेकांवर प्रीती करा, परस्परांच्या दोषांवर पांघरूण घाला, क्षमा करा, जर आपण अशा प्रकारचे जीवन जगलात तर ह्या जगातच सार्वकालिक शांती आणि आनंदाचा आस्वाद तुम्हाला घेता येईल. ज्या दिवशी तुमच्या हातून काही विशेष कार्य घडले नसेल तो दिवस तुमच्या आयुष्यातून वजा करा. संत कुरियाकोस चावरा
✝️   

पहिले वाचन १ योहान ३:२२-४:६
वाचक :योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

“ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा."

आपण जे काही मागतो ते त्यांच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करतो. त्याची आज्ञा ही आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी. त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्याठायी राहातो व तो त्या माणसाच्या ठायी राहतो.
प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा. कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत. देवाचा आत्मा तर यावरून ओळखावा देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करतो तो तो देवापासून आहे. जो जो आत्मा येशूला कबूल करीत नाही, तो तो देवापासून नाही. हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे. तो येणार हे तुम्ही ऐकले आहे आणि तो जगात आताही आहे. मुलांनो, तुम्ही देवाचे आहा आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला आहे, कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हांत जो आहे तो मोठा आहे. ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते आणि जग त्यांचे ऐकून घेते. आपण देवाचे आहो. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. ह्यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  २:७-८,१०-११
प्रतिसाद :  राष्ट्राचे स्वामित्व मी तुला देईन.

१) प्रभू मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस. 
आज मी तुला जन्म दिला आहे. 
तू मागितलेस तर राष्ट्रे थेट पृथ्वीच्या सीमेपर्यंत 
तुझ्या स्वाधीन करीन.

२) तेव्हा अहो राजांनो, सुज्ञता बाळगा. 
पृथ्वीवरील सत्ताधीशांनो बोध घ्या. 
प्रभूची आदरयुक्त भीती बाळगा.
कंपित व्हा, त्याचे प्रभुत्व मान्य करा.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
 अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे 
आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत 
बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय  ४:१२-१७,२३-२५

वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे."

योहानला अटक झाल्याचे ऐकून येशू गालिलात गेला पण नाझरेथ येथे न राहता तो जबुलून व नफतालीच्य प्रदेशात गालील सरोवरालगतच्या कफर्णहूम येथे जाऊ राहिला. संदेष्टा यशया म्हणाला होता,"जबुलून प्रांत, नफताली प्रांत, समुद्राकडली वाट, यार्देनपलीकडे परराष्ट्रीयांचा गालील, काळोखात राहणाऱ्या लोकांनी एक तेजस्वी प्रकाश पाहिला. आणि मृत्यूच्या दाट छायेच्या प्रदेशात राहणाऱ्यांवर प्रकाश उजळला" या वाणीप्रमाणे घडावे म्हणून असे झाले.येथून पुढे येशू संदेश देऊ लागला, “पापाबद्दल पश्चात्ताप करा कारण स्वर्गराज्य जवळ आहे.”त्यानंतर येशू साऱ्या गालीलभर फिरला. तो त्यांच्या सभास्थानातून शिक्षण देत होता, देवराज्याच्या शुभसंदेशाची घोषणा करीत होता आणि लोकांना निरनिराळ्या रोगातून मुक्त करून त्यांची व्यंगे दूर करीत होता; त्यामुळे साऱ्या सिरिया देशभर त्याची कीर्ती पसरली. सगळे आजारी, निरनिराळ्या रोगांनी पछाडलेले व दुखणेकरी, भूतग्रस्त, फेपरेकरी व अर्धांगवायू झालेले अशांना येशूकडे आणण्यात आले व त्यांनी त्यांना बरे केले. गालील, दकापलीस, येरुशलेम, यहुदिया व यार्देनच्या पूर्वेकडला प्रदेश येथून लोकांच्या झुंडी येशूच्या मागे निघाल्या होत्या.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन:  “अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय आणि मृत्यूच्या छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवणे" हाच येशूच्या जगात येण्याचा उद्देश होता. हा अनुभव प्रत्येक माणसाला यावा म्हणून प्रत्येकाने आपल्या पापांचा पश्चात्ताप करण्याची गरज आहे. अंतःकरणात पाप ठेवून त्याच अंतःकरणात देवाच्या कृपेचे घर बनविणे, एकाच घरात अंधःकार आणि प्रकाश अनुभवणे, शक्य नाही. रॉकेलचे थेंब ग्लासात असतांना त्याच ग्लासात ओतलेले दूध शरीर स्वास्थ्यासाठी चांगले आहे असा समज करणे चुकीचे ठरेल. त्याचप्रमाणे पश्चात्ताप करून पापांची क्षमा मिळविल्याशिवाय आपल्याला शांती मिळेल असा विचार मनात बाळगणे अनुचित ठरेल. येशूने माणसांची नानाविध विघ्ने दूर केली, नानाविध आजार बरे केले. आजही आपली सर्व तऱ्हेची संकटे दूर करण्यास येशू समर्थ आहे. मात्र आपण आपल्या परीने आपल्या हातून घडलेल्या व घडणाऱ्या अपराधांबद्दल पश्चात्ताप करणे अगत्याचे आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी सुवार्ता आत्मसात करुन इतरांना सांगण्यास व तुला - अनुसरण्यास मला कृपा व शक्ती दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या