Marathi Bible Reading | Tuesday 4thJanuary 2022 |


मंगळवार  दि. ४ जानेवारी  २०२२

✝️ 

"सारेजण पोटभर जेवले. नंतर उरलेसुरले भाकरीचे तुकडे व मासे त्यांनी गोळा केले."


✝️


 
संत एलिझाबेथ ॲन बॅले

व्रतस्थ (१७७४-१८२१)

चिंतन : अंतोनिओ फिलिची ह्यांनी एलिझाबेधविषयी पुढील उद्गार काढले आहेत: “गरीब पातक्यांविषयी तिच्या मनात एक आगळीच कणव आणि ममता भरलेली होती. कोणत्याही व्यक्तीविषयी वाईट उद्गार काढणे तिला आवडत नसे. अशावेळी ती मौन धारण करणे पसंत करीत असे.”


'प्रीति देवापासून आहे, जो प्रीति करितो तो देवाला ओळखतो.' असे | आजच्या पहिल्या वाचनात म्हटले आहे. हेच प्रीतिचे दान देवाने आपल्या । प्रत्येकाला दिलेले आहे. प्रभू येशू देवपुत्र व साक्षात प्रेमस्वरूप देव आहे.  प्रभू येशूला लोकांचा कळवळा आला असे म्हटले आहे. प्रभूला  सर्वांची काळजी आहे. सर्वांना त्याच्या प्रेमाचा स्पर्श व अनुभव घायचा आहे. म्हणूनच आजच्या शुभवर्तमानात प्रभूने पाच भाकरी व दोन मासे ह्यांचा चमत्कार करुन पाच हजारांपेक्षा जास्त लोकांची भूक तृप्त केली. प्रभू येशूने  समुदायाचीआध्यात्मिक भूक भागविली.  प्रभू येशूने तर आपला प्राण समर्पण करुन मानवावरील नि:सिम प्रेम प्रकट केलेले आहे. आज प्रभू येशू जेव्हां शिष्यांना सांगतो, 'तुम्हीच त्यांना खावयास द्या.' तेव्हा प्रभू गरजवंतांची  गरज ओळखून त्यांना सहाय्य करण्यास आपल्याला आवाहन करीत आहे. प्रभू  येशूने आपल्यावर अनंत उपकार व प्रीति केली आहे व त्याची आज्ञा आहे की, आपण सुद्धा परस्परांवर प्रेम करावे. आपल्या  जीवनाद्वारे प्रभूचा गुणकारी स्पर्श, प्रेम व माया इतरांना अनुभवता यावे म्हणून सतत प्रयत्नशील बनण्यास प्रभूकडे प्रेरणा व कृपा मागू या. 

✝️   

पहिले वाचन १ योहान ४:७-१०
वाचक :योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
“देव प्रीती आहे."
प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही. कारण देव प्रीती आहे. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले आहे. ह्यासाठी की, त्याच्याद्वारे आपणांस जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच. आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हां आम्हांवर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ७२: १-४, ७-८
प्रतिसाद :   प्रभो, सगळे राजे तुझ्यासमोर  लोटांगण घालतील.

१) राजाला आपल्या न्यायनीतीचे दान दे, 
हे देवा, या राजपुत्राला आपली न्यायपरायणता दे; 
म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्य रीतीने न्यायनिवाडा करील.
 तुझ्या गरिबांना न्याय देईल.

२) देशाच्या सात्त्विकतेमुळे, जनतेला सुखसमृद्धी लाभो. 
जनतेतल्या गरिबांना तो न्याय देवो. 
गरजवंतांच्या मुलाबाळांना मदत करो.

३) त्याच्या कारकिर्दीत सात्त्विक उदयास येईल. 
चंद्र कायमचा लोपेपर्यंत सर्वत्र सुबत्ता नांदेल. 
एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत, 
युफ्रेटीस नदीपासून पृथ्वीच्या सीमेपर्यंत त्याचे साम्राज्य पसरेल.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालीलभर फिरला. 
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क  ६:३४-४४

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"येशू भाकऱ्यांचा चमत्कार करतो."

येशू किनाऱ्यावर उतरला तर तेथे लोकांची बरीच गर्दी जमलेली त्याला दिसली. येशूला त्यांचा कळवळा आला. कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची स्थिती झाली होती. तेव्हा त्याने अनेक गोष्टीविषयी त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केली.बराच उशीर झाल्यावर शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “ही जागा निर्जन आहे आणि बराच उशीर होत आहे. यांना आता जाऊ द्या म्हणजे ते आसपासच्या खेड्यात अगर गावात जाऊन काहीतरी विकत घेऊन खातील."पण येशू त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या." त्यावर ते येशूला म्हणाले, “आता आम्ही जाऊन दोनशे रुपयांच्या भाकऱ्या विकत आणून यांना खायला देऊ काय ?"“तुमच्याकडे किती भाकऱ्या आहेत ? जा, बघा बरे" येशूने विचारले. त्यांनी जाऊन पाहिले व म्हणाले, "पाच  भाकऱ्या आणि दोन मासे." मग तेथल्या हिरवळीवर सर्वांना गटागटाने बसण्याची येशूने आज्ञा केली. त्याप्रमाणे सारेजण शंभर शंभर व पन्नास पन्नास असे गट करून बसूले. मग येशूने त्या पाच भाकऱ्या व दोन मासे घेतले आणि वर स्वर्गाकडे पाहून देवाचे आभार मानले आणि भाकऱ्या मोडून लोकांना वाढण्यासाठी त्याने त्या शिष्यांजवळ दिल्या. ते दोन मासे देखील त्या सर्वांना त्यांनी वाटून दिले. सारेजण पोटभर जेवले. नंतर उरलेसुरले भाकरीचे तुकडे व मासे त्यांनी गोळा केले. ते बारा टोपल्या भरले. जेवणखाण करणाऱ्यांत पाच हजार पुरुष होते.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन:  माणसांच्या पोटाची भूक आणि आत्म्याची भूक पाहून येशूला कळवळा येतो. दोन्ही तऱ्हेच्या भुकेचे निवारण करण्यासाठी तो धावून येतो. आपण राजरोसपणे आपल्यासमोर दोन्ही तऱ्हेच्या भुकेचे विदारक चित्र पाहून आपल्यापरीने होता येईल तेवढे प्रयत्न करून माणसांची भूक भागविण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण येशूचे अनुकरण करीत असतो. ३० वर्षापूर्वी तलासरी मिशनमधील वरखंडा गावातील जागरूक कॅथोलिक पंच स्थानिक धर्मगुरूंना भेटले आणि त्यांना म्हणाले, “येथे आलेल्या मिशनऱ्यांनी आम्हाला धर्माची ओळख करून देण्यासाठी जिवापाड प्रयत्न केले. त्याचप्रमाणे शाळा काढून त्यांनी आम्हाला सुशिक्षित केले व आम्हाला आमच्या पायावर उभे केले. त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आता आमची तुम्हाला एकच विनंती आहे की, आम्हाला धर्मशिकवणीचा विसर पडत चालला आहे. म्हणून आमच्या मुलांच्या व आमच्या धर्मशिक्षणाकडे तुम्ही नव्याने लक्ष घालून आम्ही जी आध्यात्मिक भूक अनुभवीत आहोत ती भूक भागवा.” मिशन भागातील ह्या पंचांची कळकळ सर्व पालकांसाठी, धर्मशिक्षकांसाठी व पॅरीश कौऊन्सिलच्या सर्व सभासदांसाठी मार्गदर्शक ठरेल ह्यात शंका नाही.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, जे भुकेले, तान्हेले व प्रेमाचे भुकेले आहेत त्यांना तृप्त करण्यासाठी आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या