बुधवार दि. ५ जानेवारी २०२२
✝️
“धीर धरा, मी आहे, भिऊ नका."
✝️
संत जॉन नेपोम्युसिन न्यूमन
महागुरू, वर्तनसाक्षी (१८११-१८६०)
चिंतन : "मृत्यू माणसाला कधी आणि देवाच्या इच्छेनुसार कसा गाठील ह्याचा नेम नसल्याने माणसाने सदैव जागृत राहून मृत्यूला सामोरे जाण्यास तयार असले पाहिजे.” - संत जॉन न्यूमन
‘देव प्रीति आहे' आणि देवाच्या प्रीतिवरच मानवाचे अस्तित्व उभे आहे. देव मानवावर निखळ प्रेम करतो म्हणूनच मानवाने देवावर प्रीति करावी.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूला समुद्रावरुन चालत येताना त्याचे शिष्य पाहतात आणि गोंधळून जातात. मनातील गोंधळ, संशय आणि अविश्वास ह्यामुळे माणूस घाबरतो. शिष्यांचे तसेच झाले आणि त्यांना येशूची भीति वाटली. शिष्य संकटात आणि अडचणीत असताना प्रभू त्यांच्याजवळ त्यांना मदत करण्यास आला होता. म्हणजेच येशूची आपल्या शिष्यांवर प्रीति होती. प्रीतिच्या ठायी भीति नसते, म्हणूनच प्रभूने शिष्यांना धीर देत म्हटले, 'धीर धरा, मी आहे, भिऊ नका.' प्रभूने वादळ शांत केले व शिष्यांना प्रेमाने धीर दीला शिष्यांसारखीच स्थिती आपली असते. आपण ह्या वचनांद्वारे आपल्या जीवनावर चिंतन करु या. ‘भिऊ नका, पाहा, युगाच्या समाप्तिपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे' (मत्तय २८:२०).
आपल्या जीवनातील वादळे, दु:खे, संकटे, आजार, चिंता अशा सर्व प्रसंगी विश्वासाने प्रभूला सर्व समर्पित करुन त्याची कृपा मागू या.
✝️
पहिले वाचन १ योहान ४:११-१८
वाचक :योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
“आपण जर एकमेकांवर प्रीती केली तर प्रभू आपल्या ठायी पूर्णत्व पावतो."
प्रियजनहो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. देवाला कोणीही कधीही पाहिले नाही. आपण एकमेकांवर प्रीती करीत असलो तर देव आपल्या ठायी राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठायी पूर्णत्व पावली आहे.
आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो, हे आपण ह्यावरून ओळखतो की, त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठविले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे, असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठायी देव राहतो व तो देवाच्या ठायी राहतो. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यांमध्ये राहतो.
न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्याठायी धैर्य असावे. त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे, कारण जसा तो आहे तसे ह्या जगात आपणही आहो, प्रीतीच्या ठायी भीती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ७२: १-२, १०-१३
प्रतिसाद : प्रभो, सगळे राजे तुझ्यासमोर लोटांगण घालतील.
१) राजाला आपल्या न्यायनीतीचे दान दे,
हे देवा, या राजपुत्राला आपली न्यायपरायणता दे;
म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्य रीतीने न्यायनिवाडा करील.
तुझ्या गरिबांना न्याय देईल.
२) स्पेनचे व द्विपाचे राजे खंडणी देतील,
अरबस्थान व हबसाण यांचे राजे
नजराणे आणतील.
३) त्याचा धावा करणाऱ्या गरिबाला,
तसेच गरजवंत व असहाय्य यांनादेखील तो सोडवील.
गरीब व गरजवंत यांच्यावर तो दया करील.
गरजवंताच्या जिवांचे रक्षण करील.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला. धरून नेलेल्यांची सुटका करण्यासाठी त्याने मला पाठवले आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क ६:४५-५२
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशूला पाण्यावर चालताना त्यांनी पाहिले. "
येशूने आपल्या शिष्यांना मचव्यात बसून पुढे सरोवरापलीकडे बेथसैदा येथे पाठविले आणि स्वतः जमावाचा निरोप घेतला. त्यांना पाठवून दिल्यानंतर तो एका डोंगरावर प्रार्थना करायला गेला. संध्याकाळ झाली तेव्हा मचवा सरोवराच्या मध्यावर आला होता. एकटाच जमिनीवर होता. वारा तोंडचा असल्यामुळे शिष्य वल्ही मारून हैराण झाले आहेत असे त्याला दिसले. तेव्हा पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू पाण्यावरून चालत त्यांच्या बाजूला आला. त्यांना बाजूला टाकून येशू पुढे जाणार होता. पण त्याला पाण्यावर चालताना शिष्यांनी पाहिले तेव्हा भूत समजून ते ओरडले. सर्वांनी त्याला पाहिले होते व ते घाबरले होते. येशू लगेच त्यांना म्हणाला, "हिंमत बाळगा. मी आहे, भिऊ नका." मग तो त्यांच्याबरोबर मचव्यात आला, तेव्हा वारा पडला. शिष्यांची तर मती गुंग झाली होती. कारण भाकरीचे इंगित त्यांना समजले नव्हते. त्यांच्या मनात ते बिंबले नव्हते.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: ज्या वादळात येशूचे प्रेषित सापडले होते ते वादळ आज आपल्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या जीवनात उद्भवणाऱ्या नाना तऱ्हेच्या संकटांचे, वादळांचे, समस्यांचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे येशू प्रेषितांना सागरी वादळातून वाचविण्यासाठी आणि त्यांची भीती दूर करण्यासाठी धावला त्याचप्रमाणे. येशू आजही आपल्या जीवनातील वेगवेगळ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी व ज्या मनःशांतीसाठी आपण भुकेलेले आहोत ती भूक भागविण्यासाठी आपल्या सहाय्यास येईल. हाच आजच्या शुभवर्तमानाचा संदेश आहे. वादळात सापडलेल्या शिष्यांकडे येशू रात्रीच्या चौथ्या प्रहरी आला, येशू त्यावेळी येईल अशी प्रेषितांनी अपेक्षा केली नव्हती. त्यामुळे शिष्यांची तारांबळ उडाली. आपल्यावर अनपेक्षित संकट कोसळते तेव्हा आपली तारांबळ उडू नये, सैरावैरा धावण्याची पाळी आपल्यावर येऊ नये म्हणून येशू आपल्या जवळ आहे ही जाणीव सतत आपल्याला राहावी म्हणून आपली दररोजची प्रार्थना, बायबलचे वाचन नित्य नियमाने चालू ठेवण्याची आवश्यकता आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुजवरील श्रद्धा दृढ करण्यास व प्रीति करण्यास मला
प्रेरणा व शक्ती दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या