शुभवर्तमान लूक ४:१४-२२
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“आज हा शास्त्रलेख पूर्ण झाला आहे."
येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली. तो त्याच्या सभास्थानांमध्ये शिक्षण देई आणि सर्वजण त्याचा महिमा वर्णीत. मग ज्या नाझरेथात तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचायला उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले आहे :
“परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी."
मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली मग तो त्यांना म्हणू लागला की, "हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे." तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: येशू सभास्थानात उभा राहून आपला जगात येण्याचा एक महत्वाचा उद्देश लोकांना सांगतो. आपल्याला परिचित असलेल्या भाषेत आपण म्हणू की, “येशू लोकांसमोर आपला जाहीरनामा सादर करतो.” देशभरातल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी सर्व राजकीय पक्ष मतदारांसमोर आपले जाहीरनामे सादर करतात. मतदार मोठ्या उत्सुकतेने ते जाहीरनामें ऐकतात. ते ऐकून त्यांना आनंद होतो. कारण त्यामध्ये मतदारांना खूष करणारी बरीच आश्वासने असतात. परंतु पुष्कळ वेळा दिलेली आश्वासने पुरी केली जात नाहीत म्हणून लोकांचा भ्रमनिरास होतो. येशूने दिलेली आश्वासने दगडावरील रेषा होत्या. त्यामुळे कोणाचा भ्रमनिरास होणार नव्हता हे येशूने आपल्या तीन वर्षाच्या सामाजिक जीवनात दाखविले आणि तेच उद्दिष्ट त्याने स्थापन केलेल्या कॅथोलिक चर्चसमोर ठेवले. आजमितीस उपलब्ध असलेल्या ताज्या सर्वेक्षणांनुसार एकट्या भारतात १३२ कॅथोलिक धर्मप्रांत, १९० बिशप्स, ५०० पेक्षा जास्त व्रतस्थ संस्था, २१,०००च्या वर कॅथोलिक धर्मगुरु, ५८,००० हून अधिक व्रतस्थधर्मभगिनी व धर्मबंधू आणि येशूच्या शिकवणीने प्रभावित झालेले हजारो प्रापंचिक, २०,००० हून अधिक शैक्षणिक संस्थामध्ये, त्याहीपेक्षा जास्त दवाखाने व इस्पितळांमध्ये व इतर सामाजिक संस्थांमध्ये येशूची आश्वासने तडीस नेण्यात कार्यरत आहेत.
प्रार्थना : हे प्रभू येशू, आमच्या शब्दाद्वारे व कृतिद्वारे देवराज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी आम्हाला, धैर्याचा आत्मा बहाल कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या