Marathi Bible Reading | Friday 7th January 2022 | After Epiphany

प्रकटीकरणानंतरचा सप्ताह 

शुक्रवार दि. ७ जानेवारी  २०२२
✝️ 
माझी इच्छा आहे, “शुद्ध हो.” आणि लागलेच त्याचे कुष्ठ गेले. 

✝️

 पेन्याफोर्टचा संत रेमंड -
 मठाधिकारी वर्तनसाक्षी (११७५-१२७५)  

चिंतन: या जगातील राजेमहाराजे स्वतःपुरती संपत्ती साठविण्यात गुंग असतात. ऐश्वर्यसंपन्न असा विश्वाचा राजा मात्र उधळ्या पुत्राच्या बापाप्रमाणे आपल्या प्रजेला सर्व काही पुरविण्यात गुंग असतो.- पेन्याफोर्टचा संत रेमंड

प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या व त्याची बलिदानाची साक्ष प्रमाण मानून, पवित्र आत्म्यद्वारे त्याच्या सुवार्तेची साक्ष सर्वांना देण्यासाठी आपल्या  सर्वांना पहिल्या वाचनात आवाहन करण्यात आले आहे.
प्रभू येशूची दया दृष्टी त्या त्या कुष्ठरोग्यावर  पडली आणि समाजाने बहिष्कृत केलेल्या त्या कुष्ठरोग्याला स्पर्श करुन म्हटले, 'माझी इच्छा आहे, शुद्ध हो.' त्या कुष्ठरोग्याचा आजार बरा झाला, त्या  कुष्ठरोग्यावरील अस्पृश्यतेचा कलंक प्रभू येशूने पुसून टाकला. त्याला  समाजात पुन्हा सन्मानाने जगण्याची आशा प्राप्त झाली. शुभवर्तमानात आपण  पाहतो की त्यानंतर पुष्कळ माणसे आपले आजार बरे करण्यासाठी प्रभू येशू  जवळ आले. प्रभू येशूच्या स्पर्शाने आपल्या सर्वांचे आजार व व्याधी बरे होऊ शकतात व आपले शुद्धिकरण होऊ शकते, मात्र आपल्या प्रभूवरील विश्वास दृढ असायला हवा.
आज आपण आपल्या जीवनावर चिंतन करु या की, आपण कुष्ठरोगी नसाल परंतु आपली पाप प्रवृत्ती कुष्टरोग्यापेक्षा भयंकर परिस्थितीत आपल्याला  घेऊन जाऊ शकते, म्हणूनच आपल्या प्रत्येकाला शुद्ध होण्याची गरज आहे. शुभवर्तमानातील कुष्ठरोग्याप्रमाणे आपण सर्वस्वी प्रभूला शरण जाऊ या. पश्चातापी अंत:करणाने पाप स्वीकार करु या आणि प्रभूच्या इच्छेप्रमाणे पवित्र व परोपकारी जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील बनू या. 

✝️   

पहिले वाचन १ योहान ५:५-१३
वाचक :योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
“आत्मा, पाणी व रक्त."

येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे? जो पाण्याच्याद्वारे व रक्ताच्याद्वारे आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त पाण्याने केवळ नव्हे तर पाण्याने व रक्तानेही आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे. साक्ष देणारे तिघे आहेत. आत्मा, पाणी व रक्त ह्या तिघांची साक्ष एकच आहे. आपण माणसाची साक्ष स्वीकारतो, पण तिच्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे. जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली तीच ही त्याची साक्ष आहे. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठायीच साक्ष आहे. ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड ठरविले आहे कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. ती साक्ष हीच आहे, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही.
देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांला सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी हे तुम्हांला लिहिले आहे.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  १४७: १२-१५,१९-२०
प्रतिसाद :    हे येरुशलेमा, प्रभूचे गुणगान कर 

१) हे येरुशलेमा, प्रभूचे गुणगान कर !
हे सियोन, तुझ्या देवाचे स्तवन कर !
तुझ्या वेशींचे अडसर त्याने मजबूत राखले आहेत. 
तुझ्यातल्या नागरिकांना आशीर्वाद दिला आहे.

२) तुझ्या सीमेवर तो शांतता राखतो,
तुला सकस गहू पुरवतो, तो पृथ्वीवर हुकूम सोडतो. 
त्याचा शब्द वेगाने धावत येतो. 

३) आपला संदेश त्याने याकोबला, 
आपले नियम व संकेत इस्राएलला जाहीर केले. 
कुठल्याही राष्ट्रासाठी त्याने असे केले नाही. 
त्याचे संकेत त्यांना माहीत नाहीत.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
आम्हांमध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक  ५:१२-१६

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

   “लागलेच त्याचे कुष्ठ गेले."

येशू एका गावी असता पाहा, तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की, “प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करायला आपण समर्थ आहा." तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, माझी इच्छा आहे, “शुद्ध हो.” आणि लागलेच त्याचे कुष्ठ गेले. मग त्याने त्याला निक्षून सांगितले, कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी दान अर्पण कर. तथापि येशूविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले आणि पुष्कळ लोकसमुदाय त्याचे ऐकायला व आपले रोग बरे करून घ्यायला जमू लागले. पण तो अरण्यात अधूनमधून एकान्ती जाऊन प्रार्थना करीत असे.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन:  आजच्या शुभवर्तमानातला कुष्ठरोगी येशूच्या माणसांना व्याधीमुक्त करण्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो. तो येशूला भेटतो. आजारमुक्त होण्यासाठी येशूची मनधरणी करतो. आणि येशू त्याला बरे करतो. त्याचा कुष्ठरोग नाहीसा होतो. येशू दयासागर आहे, त्याच्या दयेला किनाराही नाही आणि क्षितीजही नाही. त्याची दया सर्व प्राणीमात्रांसाठी नेहमी उपलब्ध असते. मागणाऱ्याने त्याच्याकडे विश्वासाने मागत राहावे आणि येशूने ते देत राहावे हीच येशूच्या औदार्याची रीत आहे. त्यामुळेच लोकसमुदाय त्याचे ऐकावयास व आपले आजार बरे करावयास त्याच्याजवळ येत असत. ख्रिस्तसभा दरवर्षी “दैवी दयेचा रविवार" मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात साजरा करून येशूच्या दयेला पारावार नाही, तो माणसांना आपल्या दयेच्या वेंगेत घेण्यास रात्रदिवस तयार असतो, ह्या सत्याकडे आपले लक्ष वेधते. दुसरे महायुद्ध चालू असतांना जखमींना मदत करण्याच्या हेतूने बेरविक नावाच्या एक नर्सने आवश्यक औषधे आपल्या घरात आणून ठेवली आणि स्वतःच्या अक्षराने लिहिलेला कागद घराच्या बाहेरील भिंतीवर चिकटवून ठेवला. त्या कागदावर तिने लिहिले होते, “जखमींना मदत हवी असेल तर माझा दरवाजा खटखटावा.” येशूने आपल्या दयेचे दरवाजे नेहमीच उघडे असतात हे सांगण्यासाठी “ठोका म्हणजे (मी माझा) दरवाजा उघडीन” असे सांगितल्याचे शुभवर्तमानात आपण वाचतो. (मत्तय ७:७) लूक ११, ९)

प्रार्थना :   हे प्रभू येशू, सर्व अशुद्धेपासून मला मुक्त कर व तुझी साक्ष जगाला
देण्यास आमचा विश्वास दृढ कर, आमेन.. 

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या