सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १४९: १-६,९
प्रतिसाद : प्रभू आपल्या लोकांवर प्रसन्न आहे.
१) एखादे नवीन गीत गाऊन गुणगान करा.
त्याच्या भक्तजनांच्या मेळाव्यात त्याचे स्तवन करा.
इस्राएलला त्याचा निर्माणकर्ता आनंदित करो.
सियोनच्या नागरिकांना त्यांच्या राजामुळे आनंद देवो.
२) नृत्य करीत ते त्याच्या नामाचा महिमा वर्णोत.
ते डफ व वीणा वाजवून त्याची स्तुती गावोत.
कारण प्रभू आपल्या लोकांवर प्रसन्न आहे;
नम्र जनांना तो विजयाने भूषवितो.
३) भक्तजनांना विजयाचा उन्माद चढो.
अंथरूणांवर त्यांना आनंदाने गजर करू द्या.
त्यांना मुक्तकंठाने देवाचे स्तवन करू द्या.
हे साऱ्या भक्तजनांचे भूषण आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
यहुदियांना प्रकट झालेल्या ख्रिस्ताचा गौरव असो, जगात ज्यावर विश्वास ठेवला गेला त्या ख्रिस्ताचा गौरव असो.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान ३:२२-३०
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“वराच्या मित्राला वराच्या वाणीने आनंद होतो."
येशू आणि त्याचे शिष्य यहुदा प्रांतात आले आणि तेथे त्यांच्याबरोबर राहून तो बाप्तिस्मा करीत होता. योहानही शालिमाजवळचे एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता, कारण तेथे पाणी मुबलक होते. आणि लोक येऊन बाप्तिस्मा घेत असत, कारण योहान तोपर्यंत कैदेत पडला नव्हता.
मग योहानच्या शिष्यांचा एका यहुद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला. ते योहानकडे येऊन त्याला म्हणाले, "गुरुजी, पाहा, यार्देनच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता, ज्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे तो बाप्तिस्मा करतो आणि सर्व लोक त्याच्याकडे जातात." योहानने उत्तर दिले, “मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही. मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्यापुढे पाठवलेला आहे असे मी म्हणालो होतो, ह्याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहा. वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे. त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धी व्हावी व माझा हास व्हावा हे अवश्य आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आपल्या चांगल्या कामाबद्दल किंवा आपल्या स्वभावातील चांगल्या गुणांबद्दल माणसे आपली स्तुती करतात तेव्हा आपल्याला आनंद होणे स्वाभाविक आहे. वास्तविक अशा स्तुतीची आपल्याला अधिक गुणसंपन्न होण्यासाठी गरजही असते. मात्र इतरांच्या तुलनेत आपण अधिक चांगले आहोत असे आपल्याला सांगितले जाते तेव्हा त्या स्तुतीमुळे आपण वाहवत जाऊ नये. अशा स्तुतीमुळे माणूस वाहवत जातो तेव्हा तो गर्विष्ठपणाच्या गढूळ पाण्याच्या डोहात पडण्याची शक्यता असते. स्तुती करणाऱ्या माणसात आपल्याविषयी सद्भावना असू शकते किंवा आपल्याच घरातल्या किंवा जवळच्या माणसांशी अपवित्र स्पर्धा करून एकमेकांमध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी आपल्यासमोर फेकलेला फास असू शकतो. स्तुती करण्याचा आभास निर्माण करून एकमेकातील संबंध बिघडविल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. भावाभावामध्ये, समाज सेवकांमध्ये केवळ आपली पोळी भाजण्यासाठी समाजकंटकांनी ओकलेल्या स्तुती- वजा विषामुळे अनेक गुण्यागोविंद्याने नांदणारी कुटुंबे उध्वस्त झाली आहेत व समाजात दुही पसरून समाजाच्या प्रगतीला खीळ बसली आहे. आजच्या शुभवर्तमानात वर्णन केलेले संत जॉन बॅप्टिस्टचे वर्णन अशावेळी आपल्याला मार्गदर्शक ठरते. यहुद्यांनी एकतर अजाणपणे किंवा जाणून बुजून जॉनच्या मनात हेवा निर्माण करणारे शब्द वापरले पण जॉन त्या शब्दांनी मनातल्या मनात खूष होण्याचे सोडाच पण येशू माझ्यापेक्षा खूप मोठा आहे असे सांगून त्याने त्यांच्या कृत्याला कायमची खीळ घातली.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, सर्वदा तुझा सन्मान व गौरव करण्यास प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या