Marathi Bible Reading | Baptism of the Lord | Sunday 9th January 2022 |

प्रकटीकरणानंतरचा रविवार 

प्रभूच्या स्नानसंस्काराचा सण

  दि. ९ जानेवारी  २०२२
✝️ 
 'तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्निने करील

✝️


प्रभूच्या स्नानसंस्काराचा सण


ख्रिस्तसभा आज प्रभू येशूचा बाप्तिस्मा सोहळा साजरा करीत आहे. प्रभू येशूच्या बाप्तिस्मा बरोबरच नाताळ पर्व संपून सामान्य काळाला सुरुवात होते. आजच्या पहिल्या वाचनात म्हटले आहे की, 'मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील.' आजच्या प्रभूच्या बाप्तिस्माद्वारे प्रभू येशू देवाचा पुत्र व अखिल मानवजातीचा तारणारा असल्याचे खुद्द परमेश्वराने प्रकट केले आहे.

प्रभू येशूचा बाप्तिस्मा तीन प्रकारच्या विविध बाप्तिस्माविषयी आपल्याला चिंतन करण्यास प्रवृत्त करतो. यार्देन नदीतील बाप्तिस्मा म्हणजे पापांपासून शुद्धिकरण क्रुसावरील बलिदानाचा बाप्तिस्मा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या बाप्तिस्माद्वारे आपली सर्वांची पापे स्वदेही क्रुसावर वाहून नेली; क्रुस म्हणजे सर्व पापांचे समूळ उच्चाटन. तसेच पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हाच बाप्तिस्मा आपल्याला प्रेरणादायी मार्गदर्शन करुन नवजीवनात घेऊन जातो. प्रत्येक बाप्तिस्मा हा ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. 
 प्रभू येशूने बाप्तिस्मा स्वीकारल्यानंतर देवराज्याची घोषणा करुन सुवार्ता प्रसाराला सुरुवात केली. पुनरुत्थान सणाच्या दिवशी आपल्या बाप्तिस्माच्या वचनांचे नुतनीकरण करण्यात येते.
बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताच्या वैभवी राजेपण, याजकपण आणि संदष्ट्येपणात सहभागी झालो आहोत. पवित्र आत्माठायी सर्वस्वी समर्पित करुन प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी व त्याची  साक्ष जगाला देण्यासाठी प्रभूकडे प्रेरणा व बळ मागू या.


✝️   

पहिले वाचन यशया  ४०:१-५,९-११
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 

सांत्वन करा, माझ्या लोकांचें सांत्वन करा, असें तुमचा देव म्हणतो.  यरु शलेमेच्या मनाला धीर येईल असे बोला, तिला पुकारून सांगा, तुझें युद्ध संपलें आहे. तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे; परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे.
 घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की, अरण्यांत परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानांत सरळ राजमार्ग करा.  प्रत्येक खोरें उंच होवो, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होवो; उंचसखल असेल तें सपाट होवो व खडकाळीचें मैदान होवो;  म्हणजे परमेश्वराचें गौरव प्रगट होईल आणि सर्व मानवजाति एकत्र मिळून ते पाहील, कारण हें बोलणें परमेश्वराच्या तोंडचें आहे. सीयोनेस सुवार्ता सांगणाऱ्या , उंच डोंगरावर चढ; यरुशलेमेस सुवार्ता सांगणाऱ्या, ' आपला स्वर जोराने उंच कर; कर उंच, भिऊं नको; यहूदाच्या नगरांस म्हण, तुमचा देव पाहा.  पाहा, प्रभु परमेश्वर पराक्रम्या सारखा येत आहे, त्याचा भुज त्याचें प्रभुत्व चालवील; पाहा, वेतन त्याजजवळ आहे, व प्रतिफळ त्याच्या हातीं आहे. मेंढपाळा प्रमाणें तो आपल्या कळपास चारील, कोंकरें आपल्या कवेत घेऊन उराशीं धरून वाहील, आणि पोरें पाजणाऱ्यांस संभाळून नेईल.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  १०४: १-४,२४-२५,२७-३०
प्रतिसाद :   हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. 
 हे परमेश्वरा, माझ्या देवा, तूं परमथोर आहेस;

१) हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. 
 हे परमेश्वरा, माझ्या देवा, तूं परमथोर आहेस;
तूं मान व महिमा ह्यांनी मंडित आहेस.
तूं पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करितोस 
कनातीप्रमाणे आकाश विस्तारितोस;

२) आपल्या माड्यांच्या तुळया जलांच्या ठायीं बसवितोस.
मेघांना आपला रथ करितोस,
वायूंच्या पंखांवर आरोहण करून जातोस,
वायूंना आपले दूत करितोस, अग्नि व ज्वाला 
ह्यांना आपले सेवक करितोस. 

३) हे परमेश्वरा, तुझीं कृत्यें किती विविध आहेत !
तीं सर्व तूं सूज्ञतेनें केलीं तुझ्या समृद्धीनें पृथ्वी भरलेली आहे.
हा समुद्र अफाट व विस्तीर्ण आहे, 
त्यांत लहानमोठे असंख्य जलचर विहार करितात. 
पहा, त्यांत गलबतें चालतात, 
त्यांत क्रीडा करण्यासाठी 
तू निर्माण केलेला लिव्याथान' तेथे आहे.

४)तू त्यांस त्यांचे अन्न यथाकाली देतोस 
म्हणून ते सर्व तुझी वाट पाहतात.
जें तू त्यांस घालितोस तें ते घेतात;
तूं आपली मूठ उघडितोस तेव्हां उत्तम
पदार्थांनी त्यांची तृप्ति होते. 

५) तूं आपलें तोंड लपवितोस तेव्हां ते व्याकुळ होतात;
तूं त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हां ते मरतात व मातीस मिळतात.
तूं आपला आत्मा पाठवितोस तेव्हां ते उत्पन्न होतात, ल
व तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करितोस.

दुसरे वाचन तिताला पत्र   २:११-१४,३:४-७
वाचक: पौलाचे  तिताला पत्र या पुस्तकातून घेतलेले वाचन 

कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे; तो आपल्याला असें शिकवितों की,  धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचें गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगांत मर्यादेनें, नीतीनें, व सुभक्तीने वागावें.  त्याने स्वतःला आपल्याकरितां दिलें, ह्यासाठी की, 'त्याने खंडणी भरून’ ‘आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावें,' आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले ‘स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. 'परंतु जेव्हा आपला तारणारा देव ह्याची दया व मनुष्यांवरील प्रेम प्रगट झालें,  तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचें स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणांस तारिलें.  त्यानें तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारें आपल्यावर विपुलपणे ओतला आहे.  ह्यासाठी की, आपण त्याच्या कृपेनें नीतिमान् ठरून आशा धरल्याप्रमाणे  युगानुयुगाच्या जीवनाचे वारीस व्हावें.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
 योहानाने उत्तर दिले ,'माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षां समर्थ आहे, तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक  ३:१५-१६,२१-२२

वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"येशू बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता स्वर्ग उघडला. "

लोक वाट पाहत असत व हाच ख्रिस्त असेल काय असा सर्वजण योहानविषयी आपल्या मनात विचार करीत असत आणि योहान त्या सर्वाना सांगत असे, "मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु जो माझ्यापेक्षा अधिक समर्थ आहे, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील.”

सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला. येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले, पवित्र आत्मा कबुतराच्या रूपात त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी ऐकू आली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: “माझ्या बाप्तिस्म्यामुळे मी केवळ ख्रिस्ती बनलो नाही तर ख्रिस्त बनलो" असे उद्गार संत अगस्तीन ह्यांनी काढलेले आहेत.येशूच्या बाप्तिस्म्याचा सण साजरा करीत असताना आजच्या प्रत्येक वाचनामधून आपल्याला चिंतनासाठी प्रत्येकी एक विचार मिळतो. 
१. नवी दृष्टीः 'दृष्टी तशी सृष्टी, ह्या वचनानुसार माणूस ज्या दृष्टिकोणातून जीवनाकडे पाहातो त्याप्रमाणे त्याला जीवनाचे दर्शन घडत असते. यहुदी जनता बाबिलोन येथे ५० वर्षे हद्दपार अवस्थेत होती. त्यांचे धार्मिक व सामाजिक जीवन पार विस्कळीत झालेले होते. आध्यात्मिकदृष्ट्या ते अंतर्यामी कमकुवत व उदासीन बनत चालले होते. अशा पार्श्वभूमीवर यशया संदेष्टा त्यांना आशेचा संदेश देतो. त्या संघर्षाच्या काळातही त्यांनी आनंद व हर्ष साजरा करावा असे तो त्यांना सुचवितो. कारण त्यांच्या दुःखाचे दिवस संपलेले आहेत. त्यांना आता विजयशाली जीवन जगायचे आहे. अशी उमेद तो त्यांच्यात निर्माण करतो. बाप्तिस्म्यामध्ये आपण 'जुने जाऊ द्या मरणा लागूनी, जाळूनी पुरूनी टाका, अशाप्रकारे जुन्या वाईट जीवनशैलीला मूठमाती देतो आणि नवे सदाचारी पवित्र जीवन जगण्यासाठी नवी दृष्टी धारण करतो. 
२. दृढ श्रद्धा : बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे आपण ख्रिस्ती धर्मश्रद्धेत प्रवेश करतो. त्यानंतर हीच श्रद्धा दृढ व्हावी अशा हेतूनेआपल्याला ख्रिस्तशरीर व दृढीकरण ही साक्रामेंते दिली जातात. आजच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे योहान लोकांना पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत होता. परंतु पापांची क्षमा मिळवून श्रद्धेत दृढ व्हायचे असेल तर त्यासाठी पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेण्याची गरज होती. आपल्या बाप्तिस्म्याद्वारे आपण प्रत्येक जण कसे परमेश्वराचे प्रिय लेकरे बनतो ते आजचा सोहळा सूचित करतो. 
३. पवित्र त्रैक्याठायी नवजीवन : आजच्या दुसऱ्या वाचनात परमेश्वर पक्षपाती नाहीतो सर्वोचर प्रेमळ पित्याप्रमाणे आपल्या पवित्र आत्म्याचा वर्षाव करतो. हे सत्य पेत्र प्रकट करतो. बाप्तिस्म्याद्वारे आपण देवपित्याची लेकरे बनतो. पवित्र आत्म्याचे मंदिर बनतो व ख्रिस्ताच्या शरीराचे (खिस्तसभेचे) अवयव बनतो. पवित्र त्रैवय आपल्याठायी वसती करू लागते. त्या पवित्र त्रैक्याठायी नवजीवन जगत आपण आपले जीवन फुलवायचे असते.
आत्मपरीक्षण : बाप्तिस्मा स्वीकारल्यामुळे माझ्या जीवनात नेमका कोणता फरक पडलेला आहे? मी सैतानाचा धिक्कार करतो का? देवावरील श्रद्धेने जीवन जगतो का ?

प्रार्थना :   हे प्रभू परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याने मला भरुन टाक तसेच सर्व बंधनातून आणि तुझी सुवार्ता पसरविण्यास प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या