प्रभू येशू ख्रिस्ताने योहान बाप्तिस्ताद्वारे बाप्तिस्मा स्वीकारून देवाच्या संकल्पाप्रमाणे पवित्र आत्म्याचा स्वीकार केला. देवपित्याची योजना अमलात आणण्यापूर्वी येशूने चाळीस दिवस उपवास व तपसाधनेत घालविले. तद्नंतरच प्रभू येशूने आपल्या देवराज्याच्या कार्याचा प्रारंभ केला. विशेष म्हणजे प्रभूने गालीलात घोषणा केली की, ‘काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे.'
प्रभू येशूने देवराज्याची घोषणा केली मात्र देवराज्यात प्रवेश मिळविण्यासाठी आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करुन अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत आंतरिक परिवर्तन होऊ शकत नाही. अंतःकरणाचे परिवर्तन झाल्यानंतरच देवाची सुवार्ता समजू शकते. प्रभू येशूने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आणि अनेकांचे जीवन परिवर्तन झाले. आज पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त देवराज्याचे कार्य करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला आवाहन करीत आहे. प्रभूने पश्चात्ताप करण्याची संधी आपल्याला दिली आहे. पश्चात्ताप करुन पूर्णपणे प्रभूच्या वचनावर म्हणजेच देवाच्या सुवार्तेवर विश्वास ठेवू या. देवराज्याचे सहभागीदार बनण्यासाठी आपल्या जीवनाचे परिवर्तन करण्यास कृपा मागू या. विश्वासाने सुवार्तेचा स्वीकार करुन प्रभूची साक्ष देण्यासाठी कार्यरत बनू या.
✝️
पहिले वाचन शमुवेल १:१-८
वाचक :शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“परमेश्वराने तिला मूलबाळ दिले नव्हते म्हणून हन्नाची सवत तिला टोचून बोलत असे."
एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामाथाईम सोफीम या गावात कोणी एक मनुष्य राहात होता. त्याचे नाव एलकाना असे होते. तो एफ्राइम वंशातला असून त्याच्या वडिलांचे नाव यरोहाम, आजोबांचे नाव एलीहू, पणजोबांचे नाव तोहू, आणि खापरपणजोबांचे नाव सूफ असे होते. एलकानाला दोन बायका होत्या. एकीचे नाव हन्ना आणि दुसरीचे नाव पनिन्ना असे होते. पनिन्नेला मुलेबाळे होती, पण हन्नेला मूल नव्हते.
हा मनुष्य सेनाधीश परमेश्वराची उपासना करायला आणि यज्ञ करायला आपल्या नगराहून निघून शिलो इथे दरवर्षी जात असे. एलीचे दोन मुलगे हफनी आणि फिनहास हे परमेश्वराचे याजक तेथे असत. एलकाना यज्ञ करी त्या दिवशी तो आपली बायको पनिन्ना हिला आणि तिच्या सर्व मुलांमुलींना हिस्से देत असे. हन्नेला मात्र तो एकच हिस्सा देई. जरी ती त्याची आवडती होती तरी परमेश्वराने तिला मूलबाळ दिले नव्हते. म्हणून तिची सवत तिला मनस्वी चिडवी आणि तिची मानहानी करी. असे वर्षानुवर्षे चालले होते. परमेश्वराच्या मंदिरात हन्ना जात असे • तेव्हा प्रत्येक वेळी पनिन्ना तिला छळत असे. मग हन्ना रडे आणि जेवत नसे. तिचा पती एलकाना तिला म्हणाला, "हन्ना, तू का रडतेस ? तू का जेवत नाहीस? तू मनाला का लावून घेतेस ? मी तुला दहा मुलांपेक्षा अधिक नाही काय?
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११६: १२-१९
प्रतिसाद : प्रभो, मी तुला आभारप्रदर्शक यज्ञ अर्पण करीन.
१) प्रभूच्या अनंत उपकारांबद्दल
मी त्याचा कसा उतराई होऊ ?
माझ्या उद्धाराचे पेयार्पण घेऊन
मी येईन आणि प्रभूच्या नामाचा धावा करीन.
२) प्रभूला केलेले नवस मी त्याच्या
साऱ्या प्रजेसमक्ष फेडीन. प्रभूच्या भक्तांचे
मरण त्यांच्या दृष्टीने अमोल आहे.
३ मी तर तुझा दास आहे ना प्रभू ?
मी तुझ्या सेविकेचा पुत्र आहे.
तू माझी बंधने सोडली आहेत.
मी तुला आभारप्रदर्शक यज्ञ अर्पण करीन.
प्रभूच्या नामाचा धावा करीन.
४ प्रभूला केलेले नवस, मी त्याच्या
साऱ्या प्रजेसमक्ष, प्रभूच्या मंदिरातल्या चौकात,
येरुशलेम नगरात फेडीन.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे प्रभो, तुझे शब्द हृदयाला आनंदित करतात, ते नेत्रांना प्रकाश देतात.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क १:१४-२०
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १:१४-२०
“पश्चाताप करा आणि शुभवर्तमानावर विश्वास ठेवा."
योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाचे शुभवर्तमान प्रकट करीत गालिलात आला आणि म्हणाला, "काळाची पूर्णता झाली आहे आणि देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा आणि शुभवर्तमानावर विश्वास ठेवा."
नंतर गालिल समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते आणि येशू त्यांना म्हणाला, "माझ्यामागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन.” मग ते लागलेच जाळी सोडून त्याला अनुसरले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले आणि त्याने त्यांना लागलेच बोलावले. मग ते आपला बाप जब्दी ह्याला भाडोत्री चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्यामागे गेले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: समुद्रात मासळी पकडणाऱ्या साध्या भोळ्या माणसांना त्यांच्या ध्यानीमनी नसताना शुभवर्तमान पसरविण्याची प्रचंड मोहीम राबविण्यासाठी येशू बोलावितो, ती माणसे येशूच्या हाकेला ओ देतात आणि ते येशूची मोहीम प्रसंगी स्वतःचे रक्त सांडून तडीस नेण्यात यशस्वी ठरतात. आपणसुद्धा सुरूवातीला अशक्य वाटणाऱ्या व आपले भविष्य उज्वल करणाऱ्या गोष्टी आपले प्रयत्न आणि परमेश्वराचा आशीर्वाद ह्या द्वारे शक्य करू शकतो. एका धर्मग्रामाच्या पूर्वसंध्याकाळी एक गरीब गोवेकर स्वयंपाकी आपल्या पंधरा वर्षाच्या शाळकरी मुलाला बरोबर घेऊन धर्मगुरूंच्या स्वयंपाक घरात दाखल झाला. रात्री सणाच्या स्वयंपाकाची तयारी करीत असताना तो दारूच्या नशेत आपल्या मुलाला म्हणाला, “पोरा, आपण शेणातले किडे रे. आपण असेच गरीब राहाणार.” वडिलांचे ते निराशाजनक शब्द ऐकून मुलगा म्हणाला, “पप्पा, शेणातला किडा शेणातच राहात नाही.” थोड्याच वर्षांनी जे धर्मगुरूंनी त्या मुलाला आपल्या कुटुंबाबरोबर थाटामाटात राहाताना पाहिले. त्या रात्री वडिलांच्या निराशावादाला प्रतिसाद देत पराकाष्ठेचे करून त्या मुलाने यशोमंदिराकडे वाटचाल करून आपल्यासमोर एक सुंदर आदर्श उभा करून ठेवला आहे. देवराज्याची घोषणा करण्यासाठी आपले मदतनीस निवडताना येशूने गरीब-श्रीमंत, अशिक्षित-सुशिक्षित असा भेदभाव दाखविला नाही. मत्तयसारख्या जकातदाराला तसेच मच्छिमारीवर आपला उदरनिर्वाह करणारे परंतु त्यावेळच्या उच्चभ्रू समाजाच्या खिजगणतीत नसलेले कोळी त्याने निवडले आणि त्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे त्यांचे नाव आजही दोन हजार वर्षानंतर दिगंतापर्यंत गाजत आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला अनुसरण्यास व देवराज्याची सुवार्ता पसरविण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या