सामान्यकाळातील पहिला सप्ताह
मंगळवार दि. ११ जानेवारी २०२२
✝️
“तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला आणि त्याच्यातून निघून गेला.”
✝️
संत थिओडोसियस
वर्तनसाक्षी (४२३-५२९)
संत थिओडोसिअस ह्यांच्या मठाचे ब्रीदवाक्य होते, “मरणाचा विचार नजरेसमोर असू दया. तुम्ही केव्हाही पाप करणार नाही."
आजच्या पहिल्या वाचनात पाहतो की, हन्नाने कळकळीने आणि अंतःकरणाच्या गाभाऱ्यापासून परमेश्वराकडे साकडे घातले. देवाबरोबर जणू आंतरिक संवाद साधला आणि देवाने तिची प्रार्थना ऐकली.
चमत्काराद्वारे प्रभू येशू देव आहे व त्याचा अधिकार सर्वव्यापी आहे हे स्पष्ट झाले आहे. प्रभू येशूने एका माणसातील अशुद्ध आत्म्याला बाहेर काढले. तत्पूर्वी त्या अशुद्ध आत्म्याने प्रभू येशू विषयी साक्ष देताना म्हटले, 'तू कोण आहेस हे मला ठावूक आहे, देवाचा पवित्र तो तूच.' अशुद्ध आत्म्याने येशू देवाचा पवित्र आहे अशी कबुली दिला. सैतान जरी ह्या जगाचा देव आणि आकाशातील सत्तेचा अधिपती असला तरी त्या सैतानाला प्रभू येशूच्या पायाखाली ठेवण्यात आले, म्हणूनच येशूच्या नावाने व ख्रिस्ताच्या अधिकाराने माणसातील अशुद्ध आत्मे पळून जातात. संत पौल म्हणतो, 'देवाने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, घनीपण, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या त्या सर्वाहून त्याला उंच करुन स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले' (इफिस १:२०-२३).
कोणताही अशुद्ध आत्मा किंवा सैतानी शक्तीचा प्रभाव आपल्यावर सत्ता चालवू शकत नाही. प्रभू येशूच्या नावात व वाचनात सामर्थ्य आहे व त्याच्या नावामुळे सर्व काही शक्य आहे. आपण आज सैतानी बंधनात असलेल्या आपल्या बंधु-भगिनींसाठी येशूच्या नावाने प्रार्थना करु या.
✝️
पहिले वाचन शमुवेल १:९-२०
वाचक :शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“परमेश्वराला हन्नाची आठवण होती आणि तिने शमुवेलला जन्म दिला. "
शिलो येथे जेवण आटोपल्यावर हन्ना तेथून उठून गेली. त्या वेळेस एली याजक परमेश्वराच्या मंदिराच्या दारात आपल्या आसनावर बसला होता. तिने अत्यंत दुःखित अंतःकरणाने परमेश्वराची करुणा भाकली आणि ती ढसाढसा रडली. तिने नवस केला आणि म्हणाली, "हे सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या ह्या दासीला न विसरता पुत्रसंतान देण्याची कृपा करशील तर मी तो परमेश्वराला कायमचा वाहीन, त्याच्या डोक्याला वस्तरा लागणार नाही."
ह्याप्रमाणे बराच वेळ तिची प्रार्थना चालली असताना एलीचे तिच्या मुखाकडे लक्ष होते. हन्ना मनातल्या मनात बोलत होती. तिच्या ओठांची हालचाल होत होती पण तिचे शब्द मात्र ऐकू येत नव्हते, त्यामुळे ती नशेत असावी असा एलीचा समज झाला. एली तिला म्हणाला, “कोठवर या नशेत राहणार तू ? हा दारूचा अंमल उतरू दे." "नाही महाराज,” तिने उत्तर दिले. "मी एक भग्नहृदयी स्त्री आहे. मी काही द्राक्षरस किंवा दारू प्याले नाही. परमेश्वरासमोर मी माझे मन मोकळे करीत होते. आपल्या दासीला कुचकामी स्त्री समजू नका. चिंता अनावर झाल्यामुळे आणि शोकावेगाने मी इतका वेळ बोलत होते." तेव्हा एली तिला म्हणाला, "तू शांतीने जा. इस्राएलच्या देवाकडे तू केलेली याचना तो पुरी शांतीने जा. इस्राएलच्या देवाकडे तू केलेली याचना तो पुरी करो." ती त्याला म्हणाली, “ह्या दासीवर आपली कृपादृष्टी असू द्या." मग ती तेथून निघून गेली आणि जेवली. त्यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही.
दुसऱ्या दिवशी पहाटेस सर्वजण उठले आणि परमेश्वराची उपासना करून रामा येथील आपल्या घरी गेले. एलकाना आणि त्याची बायको हन्ना ह्यांची परमेश्वराला आठवण होती. नंतर हन्नाला दिवस गेले आणि यथासमयी तिला मुलगा झाला, "तो परमेश्वराकडून मागून घेतलेला होता." म्हणून तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १शमुवेल २:१,४-५, ६-७,८
प्रतिसाद : प्रभूठायी माझे मन उल्हासले आहे.
१ )प्रभूठायी माझे मन उल्हासले आहे,
प्रभूठायी मला सामर्थ्य प्राप्त झाले आहे.
माझे मुख माझ्या शत्रूंचा धिक्कार करीत आहे,
कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे.
२) "शूर वीरांची धनुष्ये भंगून गेली आहेत,
पण दुर्बळांना नवीन सामर्थ्य देण्यात आले आहे.
जे पोटभर खात होते ते भाकरीच्या तुकड्यासाठी
मोलमजुरी करीत आहेत, पण जे भुकेले होते
ते तृप्त झाले आहेत. वंध्येने सातांना जन्म दिला आहे,
पण बहुपुत्रवती झुरणीस लागली आहे."
३) “परमेश्वर प्राणहरण करतो आणि जीवदानही देतो,
तो अधोलोकी पाठवतो आणि ऊर्ध्वलोकीही आणतो.
परमेश्वर निर्धन करतो तसाच सधनही करतो,
तो खाली ओढतो तसाच वरही उचलतो."
४) "तो कंगालांना धुळीतून उठवतो,
तो दरिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून उभे करतो,
मग ते सरदारांच्या शेजारी बसतात
आणि वैभवी सिंहासन त्यांना प्राप्त होते."
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव. मला सरळ मार्गाने ने
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क १:२१-२८
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १:२१-२८
“येशूने अधिकारयुक्त वाणीने त्यांना शिकवले."
येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमास गेले आणि लागलेच त्याने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवीत होता. त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो ओरडून म्हणाला “हे येशू नाझरेथकरा तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करावयास आलास काय ? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच.” परंतु येशूने त्याला धमकावून म्हटले, “गप्प राहा आणि ह्याच्यातून नीघ. तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला आणि त्याच्यातून निघून गेला. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकांस विचारू लागले, “हे आहे तरी काय? काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण! हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात." ही त्याची कीर्ती लागलीच गालिलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: येशू अधिकारवाणीने शिकवितो असे आजच्या शुभवर्तमानात सांगितले आहे. अधिकारवाणीने शिकविण्याचा गोड परिणाम काय असतो हे बायबलमधील स्तोत्रसंहितेतील ११९व्या स्तोत्राचे आपल्याला स्मरण करून देते. त्यात स्तोत्रकार परमेश्वराला संबोधून म्हणतो, “तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! तुझे वचन माझ्या पावलांकरता दिव्यासारखे व माझ्या |मार्गावर प्रकाशासारखे आहे.” नेमके हेच भावतरंग येशूच्या श्रोत्यांच्या काळजात उमटलेले आपण पाहातो. येशूचे शब्द ऐकल्यावर व त्या शब्दांवर भक्तीने मनन केल्यावर आपलीही मने आगळ्यावेगळ्या आनंदाने हेलावली जावी ह्यासाठी ख्रिस्तसभा सातत्याने प्रयत्न करीत असते. त्याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे एखादे धर्मगुरू नव्याने एवाद्या धर्मग्रामाचा पदभार सांभाळतात तो प्रसंगः धर्मप्रांताच्या बिशपांसमोर किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींसमोर तमाम धर्मग्रामस्थाच्या उपस्थितीत धर्मगुरू वेदीवरून एकटेच "प्रेषितांचा विश्वासांगिकार” या प्रार्थनेचे शब्द उच्चारतात. त्या शब्दांमध्ये येशूने २०००वर्षापूर्वी जे शिकविले ते प्रेषितांनी संक्षिप्तपणे गठीत केले आहे. ते शब्द धर्मगुरूंना उच्चारायला सांगून त्यांच्याकडून कबूल करवून घेतात की, जे येशूने अधिकारवाणीने शिकविले तेच धर्मगुरू वेदीवरून त्यांच्या कार्यकाळात |शिकवितील व त्यामुळे धर्मग्रामस्थांना येशूने जे अधिकार वाणीने शिकविले तेच आपल्या चर्चमध्ये ऐकायला मिळेल व त्याच्या प्रभावामुळे येशूच्या शिकवणीशी जे सुसंगत नाही त्यापासून त्यांचा बचाव होईल.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या तारणदायी सामर्थ्यावर आणि तुझ्या वचनावर संपूर्ण विश्वास ठेवून तुझे अनुकरण करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या